दत्त

दत्त या एका नावाने आयुष्याला वळण दिलंय.
दत्त महाराजांना शरण गेलेल्या भक्तांच्या आयुष्याचं स्टिअरिंग महाराज आपल्या हातात घेतात, आणि त्या माणसाचा आध्यात्माकडून अनुभूतीकडचा प्रवास सुरू होतो. दत्त महाराज म्हणावं तर सगुण स्वरूप - कारण दत्त तेजाने समृद्ध गुरू परंपरा आणि सदेह दर्शन देणारे सद्गुरु आहेत, आणि म्हणावं तर निर्गुण स्वरूप - कारण गाणगापूर, नृसिंहवाडी, कारंजा ते गुरुशिखर गिरनार मध्ये महाराजांच्या निर्गुण पादुका भक्तांना अनुभूती देत आहेत. दत्त महाराज म्हणजे सगुण - निर्गुण या स्वरूपाच्या पलीकडे, साक्षात चैतन्य आहेत.
.
दत्त महाराज आपल्या शिष्याला कधीही एकटं सोडत नाहीत. मूळ श्री दत्त महाराज (ग्रंथ : दत्तमहात्म्य), श्रीपाद श्रीवल्लभ (स्थान : पिठापुर, ग्रंथ : श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र) , नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (स्थान : गाणगापूर, ग्रंथ : श्री गुरुचरित्र) या अवतारांमधून समृद्ध झालेली गुरू परंपरा आणि साक्षात दत्त स्वरूप असलेले संत यांपैकी कुठल्याही माध्यमातून दत्त महाराज आपल्या भक्ताला पंखाखाली घेतात. सद्गुरू कुणीही असू देत, मूळ दत्त महाराज आहेत. त्या माणसाचे कर्म, नशिब, प्रारब्ध हा खेळ थांबून दत्ततत्वाशी एकरूपता येते. माणिक प्रभू, स्वामी समर्थ, नवनाथ, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अखंड परंपरा आहे.
.
दत्त महाराज संयम शिकवणारे आहेत. त्यांच्या सानिध्यात असताना आधार वाटतो. ते भवसागरात आपली नौका भरकटू देत नाही. महत्वाचं म्हणजे चुकू देत नाही. सद्गुरू म्हणतात, मला शरण आलेला आहेस ना, मग तुझ्या प्रत्येक श्वासावर आमचं लक्ष आणि आमचं नियंत्रण असणार. तुला नेमून दिलेलं काम करायची इच्छा ठेव, ते सुद्धा आम्हीच करून घेऊ. 
.
दत्त महाराज आपल्या भक्ताला षड़रिपूंपासून हळू हळू एक एक पाऊल दूर नेतात. दत्त महाराज योग, क्रिया, ध्यान यांचे प्रतीक आहेत. आपल्या सप्तचक्रावर त्यांचा आधीकार आहे. दत्त ही एक शक्ती आहे. त्रिमूर्ती असल्याने सगळ्यांचं मूळ आहे. ब्रह्मचारी असाल तर वैराग्याचा परमोच्च बिंदू, आणि गृहस्थ असाल तर नित्यकर्म साधून आध्यात्म देणारे दत्त महाराज आहेत. खऱ्या अर्थाने सर्वव्यापी.
.
अनुसया, जिच्या पतीव्रतेच्या तेजात प्रचंड ताकद होती. तिला चालतांना त्रास होवू नये म्हणून धरणी मऊ व्हायची, तिला तळपू नये म्हणून सुर्य मंद व्हायचा अश्या अनुसयेची परिक्षा पाहण्यासाठी त्रिदेव आले. आणि तिची नजर पडताच त्यांची बाळं झाली. पुढे ब्रह्मा चंद्र झाले, शिव दुर्वास झाले त्यांनी विष्णूना आपली शक्ती दिली. विष्णू दत्त म्हणून अनुसयेच्या जवळ राहीले. दत्त महाराजांनी पुढे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती असे अवतार घेतले. त्यानंतर अंशात्मक अवतार झाले.
.
वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त गुरूंची अनेक स्तोत्रे आणि छोटे छोटे मंत्र रचलेले आहेत. डोळे बंद करून करुणा त्रिपदी फक्त ऐका. महाराज समोर असतील तुमच्या. घोरातकष्टात स्तोत्र, दत्तबीज मंत्र, जयलाभ स्तोत्र यात प्रचंड ताकद आहे. "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा मंत्र सलग नामधून सारखा म्हणत राहिलो तरीही लय लागते. चैतन्य अनुभवता येतं.
.
अनुभव - अनुभूती सांगू नये म्हणतात. दत्त महाराज पावलोपावली सोबत असल्याची प्रचिती देतात. क्षण न क्षण त्यांच्या अनुभूतीने पवित्र आहे. काय आणि किती सांगावं? 
.
सगळ्या दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या खूप शुभेच्छा. महाराज तुमच्या सगळ्या शुभ ईच्छा पूर्ण करो.

- तेजस कुळकर्णी 
.
फोटो : राजा रवी वर्मा यांनी साकारलेले दत्तजन्माचे चित्र.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved