शुक्रतारा अस्तला...
सकाळी अरुण दाते गेल्याची बातमी आली आणि जवळचं माणूस गेल्यावर येतं ते पाणी आलं डोळ्यात... ज्या माणसाची गाणी ऐकत लहानाचं मोठं झालो, प्रेमातल्या गुजगोष्टी ज्यांच्या गाण्याने बहरल्या, ज्यांच्या आवाजाने कितीही मोठ्या संकटात जन्मावर जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, ज्यांच्या आवाजाच्या सानिध्यात शेकडो किमीचा प्रवासही जवळचा वाटायचा त्या आवाजाचं असं शांत होणं चटका लावणारं आहे... हि बातमी खोटी ठरो म्हणून मनातल्या मनात देवाचा धावाही झाला. पण अवतार सुद्धा संपतात, आणि अरुण दाते आपल्या दुर्दैवाने अमर नाहीत. . मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळे काकांचे संगीत आणि शब्दांना-संगीताला लाभलेला अरुण दातेंचा मखमली आवाज... त्रिमूर्तीने केवळ गाण्यासाठी अवतार घेतलेला असावा असा सुरेल संगम... किती भरभरून द्यावं एखाद्याने ? आपली झोळी भरली, पण त्या त्रिमूर्तीचा हात आखडला नाही. आज फक्त दाते गेले नाहीत, तर मराठीचं पितृत्व हरवलंय, मराठी गाण्याचा आवाज शांत झालाय... खळे-दाते-पाडगावकर त्रिमूर्तीमधला शेवटचा देवही आज निजधामाला गेला... या तिघांचे एकमेकांशी खरंच स्वर्गातले संबंध असावेत... एकमेकाच्या मनातलं गाणं ओळ...