मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग ३
#अनुभूती
#मी_अनुभवलेले_गजानन_महाराज - भाग ३
हाजीअली
मागच्या चार वर्षांत शेगांवला जाण्यासाठी खूप मोठ्ठा गॅप पडला. अनेक अडचणी येत गेल्या. अपघात, आत्याच्या संपुर्ण कुटूंबाचं निधन, घराचं बांधकाम... जावू जावू होत होतं, पण जाता येत नव्हतं... मनात विचार आला की "महाराज बोलावतील तेव्हाच आपल्याला जायला मिळेल" हेच असायचं... त्यांनी ऐकलं - आणि एक दिवस मुंबईत महाराजांची अनुभूती मिळाली... ते सर्वत्र आहेत, सोबत आहेत, आणि वेळोवेळी ते सिद्ध करतात.
..
पुणे सोडून काही स्वप्न घेवून मुंबईत येण्याची ती वेळ. स्टार्टअप वर उभा, मनात नाही म्हणलं तरी धडकं असतंच... सुरुवात होण्याआधी शेगांवला जायची इच्छा होती, पण काही ना काही कारणाने शक्य होत नव्हतं... टाईमलाईन फास्ट पळत होती, शेगांवला जाणं शक्य झालं नाही... मुंबईत आलो.
..
ऑफीसच्या पहिल्या दिवशी महाराजांच्या फोटोसमोर उभा राहून प्रार्थना केली, "तुम्ही बोलवाल तेव्हाच दर्शन होईल, पण हा व्यवसाय तुमच्यावर सोपवलाय... लक्ष असु द्या..."... ! त्याच दिवशी दुपारी हाजीअली दर्ग्यावरून जातांना दर्शन घेतलं... आणि एक चादर चढवली... दिवस मावळला, रात्र झाली...
..
स्वप्नात मी शेगांवमध्ये होतो... समाधी समोर... जी चादर मी हाजीअली दर्ग्यावर चढवली, तीच महाराजांनी अंगावर पांघरली होती... माझं तुझ्यावर लक्ष आहेच... !...
गडबडून जाग आली ... मला आत्ता तो क्षण शब्दात मांडणं अशक्य आहे, पण त्यावेळी जे अनुभवलं ते आजपण अंगावर शहारे आणतात... ते सर्वत्र आहेत... ते मनात आहेत...
हाजीअली - महाराज हे कनेक्शन काय, कसं मला अजुनही उमगलं नाही,... ते समजणारही नाही... पण जे दिसलं ते खुप बळ देणारं ठरलं... !
..
स्वप्नातल्या दोन गोष्टी मी अनुभवल्यात. ही एक, दुसरी उद्याच्या भागात.