दिपःज्योती नमोस्तूते

मुंबईत या फ्लॅट आधी मी ज्या फ्लॅटमध्ये रहायचो तिथली ही गोष्ट... आता मी हल्ली एक महिन्यापूर्वीच इथे शिफ्ट केलंय. हा फ्लॅट मोठा आणि बऱ्यापैकी वरच्या मजल्यावर आहे... पण इथे सेफ वाटतं... ! आधी ज्या फ्लॅटमध्ये होतो तिथे गडबड होती... !
.
मी सात वर्षांपासून धुळ्याबाहेर एकटा राहतोय, आधी पुण्यात - मग मुंबईत आधीच्या फ्लॅट मध्ये... आणि आता या ! भिती वाटणं, दडपण येणं या गोष्टी कधीच जाणवल्या नाहीत... घरात रोज देवपूजा करतो, गणपती अथर्वशीर्ष - व्यंकटेश स्त्रोत्र - गायत्री मंत्र - महालक्ष्मी अष्टक - रामरक्षा आणि हनुमान वडवानल स्त्रोस्त्र हे नित्यनियमाने करुन मगच ऑफीस करता घराबाहेर पडतो ... देवघरात देवांसह गुरूचरीत्र ग्रंथ, गजानन महाराजांची मुर्ती आहे... ! अंगावर यज्ञोपवित आहे... भिती तशी नसतेच... एकटा असलो तरी मस्त रिलॅक्स राहतो... !
..
पण साधारण ऑगस्ट पासून त्या घरात रात्री झोपतांना काहीतरी स्ट्रेस जाणवायचा.... दडपण... उगाच काहीतरी टेंशन असल्यासारखं ! ... आधी वाटलं बिजनेस टेंशन मुळे असेल, दिवसभराच्या कामाचा ताण वगैरे, पण सगळं आलबेल असतांनाही झोप उडालेली असायची... भलते सलते भास व्हायचे, अभद्र विचार यायचे... कधी नव्हे ते रात्री एकटं झोपतांना भिती वाटायची... ! आधी कधीच काहीच वाटलं नाही, पण मागच्या तीन चार महिन्यांत व्हायला लागलेलं. पॅरानॉर्मल गोष्टी म्हणाव्या तर तसला काहीच प्रकार नव्हता, म्हणजे हिंट मिळत नव्हती... घरात आल्यानंतर पोटात गोळा यावा असं काहीतरी. ! मी स्वतः चक्रावलेला - मी कां घाबरतोय ? ... अचानकच भिती वाटायची... कारण नसतांना... जिथे रात्र संपू नये असं वाटतं तिथे कधी एकदा सकाळ होतेय असं व्हायचं... ! सात वर्ष घाबरलो नाही, तिथे आत्ताच काय होतंय ?
..
दोन महिने काढले असेच...
एक दिवस संध्याकाळी उशीरा घरी आलो....
रोजसारखा दिवा लावला... सकाळी घाईत राहीलेलं सगळं म्हणलं... दिवा चालू होता.
रात्री लाईटस् बंद केले -
पण तेव्हा रोजच्यासारखं जड वाटलं नाही. त्या दिव्याचा प्रकाश कापूर जाळला तो वास आणि उदीच्या उदबत्तीचा वास असं सगळं संपुर्ण घरभर पसरलं होतं... !
प्रसन्न वाटत होतं !
मनात सेफ वाटत होतं... या दिव्याच्या प्रकाशात आपण आहोत... कुणीच काहीच बिघडवू शकत नाही ही हा विश्वास होता... शांतता वाटत होती... झोपही शांत लागली. ! ..
छान वाटलं.
मी नंतर गजाननमहाराजांचा आणि मोहिनीराज देवीचा फोटो बेडरुमच्या भिंतीवर लावला... !
रोज संध्याकाळी जास्त वेळ चालेल अश्या हिशोबाने दिवा लावायचो... ! आणि तो चालू असेपर्यंत पटकन झोपायचो ... भिती, दडपण वगैरे सगळं तिथेच संपलं !
ते घर सोडून आता नवीन घरी आलोय.
..
इथे तसं भिती वगैरे वाटत नाही...
पण त्या घरातलं आठवलं कारण,
इथे मोहिनीराज देवीचं नवरात्र सुरुय, अखंड दिवा वगैरे आहे. त्या दिव्याचा प्रकाश घरात पसरतो... रात्री खुप शांत झोपही त्यामूळे लागली ... सेफ वाटतं ! त्या प्रकाशाच्या सानिध्यांत असतांना कुठलंही संकट आपल्यापर्यंत येत नाही हा विश्वास असतो ! ...
कुठल्यातरी एका ठिकाणी आपलं मन शांत होतं -
विश्वासाची जागा अनुभूती घेते. दिव्याचा प्रकाश हा विश्वास आहे, त्यातून मिळणारी शांती, शक्ती ही अनुभूती !
ती पुन्हा मिळाली !
!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved