शिक्षक दिन
= शिक्षक दिन =
... रफूचक्कर ...
अकरावी - बारावीला धुळ्यात असतांना अकरावीचं कॉलेज वगैरे सुरु झाल्यानंतर शोधमोहिम सुरु झाली क्लाससाठी... धुळ्यात भरमसाठ क्लासेस आहेत, एक-एका क्लासमध्ये शंभर स्टुडंटस् एका बॅचला, परत पीसीएमबी वेगवेगळा क्लास - असा पसारा वाढवण्यापेक्षा लहान क्लास, एकाच ठिकाणी सगळे विषय मिळावे ही इच्छा पुर्ण झाली, आणि प्रा. दि. अ. नावाचा माणूस सापडला... धुळ्यात इंदीरा गार्डन पासून थोडं पुढे गेल्यावर प्रमोद नगरच्या अलीकडे एका घराच्या आऊटहाऊसमध्ये ते क्लास घ्यायचे...!
..
अॅडमिशन - ओळख वगैरे सोपस्कार पार पडले, आणि क्लास सुरु झाला... साडेचार फूटी वामनमूर्ती, सावळा वर्ण, चेहऱ्यावर हलकंसं हसू, तोंडात सिगारेट आणि खाली लूना... हा माणूस शिक्षक म्हणून जबरदस्त आहे हे पहिल्या तीन-चार दिवसातच समजलं... गणित आणि फिजीक्सवर त्यांची कमांड वर्ल्डक्लास होती... आयआयटी एंट्रन्स क्लासेसला शिकवणारा माणूस अकरावी-बारावीला शिकवतोय - गणित-फिजीक्सचा बेस त्यांनी असा केला, नंतर त्याशिवाय जगणं कठीण वाटू लागलं... Trigonometry खेळणं वाटायचं... दरम्यान मी, गणेश, मनोज, निखील आणि एक ज्यु. राज ठाकरे, बाकीचे तिघं असा आमचा सात-आठ जणांचा गृप तयार झाला... अकरावीचं पहिलं टर्म संपेपर्यंत पक्के मुरलो... गणिताचा प्रॉब्लेम समोर आला की चटकन त्याचं सोल्यूशन डोळ्यासमोर येणं तेव्हापासून सुरु झालं... त्यांचं अक्षर, शिकवण्याची पद्धत याचे आम्ही फॅन झालो... एकदा ते सर गाडीवरुन आणि त्यांचा लिहीता हात गळ्यात पडला, तरीही डाव्या हाताने कुठलाही फरक न होता ते लिहायचे ... तेव्हा ज्यू. आईनस्टाईन वगैरेही वाटले होते...
..
दरम्यान त्यांचं कुठल्यातरी कारणाने आर्थिक गाडं सटकलं, आणि उधार पैसे मागणं सुरु झालं... अकरावीत असतांना ते थोडंफार दिसायचं, पण बारावी सुरु झाली तसं जास्त बिघडलेलं असावं... फी व्यतिरीक्त उधारीसाठी त्यांनी प्रत्येकाचं अक्षरशः पाया वगैरे पडण्याचे प्रकार केले... रोज क्लासमध्ये घेणेकरी येत, शिव्या देत, मारहाण करत... आम्हा आठही जणांना हे नवीन नव्हतं त्यामूळे त्यांनाही काही वाटत नसावं... ताण घालवण्यासाठी त्यांनी सिगारेटसचे पाकीटंचं पाकीटं घेणं सुरु केलं... त्यांची लूना गाडीही उचलून नेली... वाईट परिस्थिती होती... कधी पूर्ण दिवस क्लास घेवून अचानक चार दिवस सुट्टया देत... बारावीचं वर्ष, सीईटी वगैरे असल्याने टेंशन येत होतं, पण हा माणूस प्रसंगी दिवसभर बसवून सिलॅबस संपवेल याची खात्री होती ... तसा प्रयत्नही केला आणि ५०-६० टक्के पूर्णही केला...
..
साधारण ऑगस्ट २००९, एक दिवस सकाळी मेसेज आला... "सर इज आऊट ऑफ सिटी, कम टू द क्लास ऑन मंडे..."...
सोमवारी सकाळी ६ वाजेच्या बॅचला गेल्यावर क्लास आणि घर बंद दिसलं... शेजारच्या बाईला विचारलं, तर "ते बिऱ्हाड घेवून गेले..." इतकाच निरोप मिळाला... म्हणावं तर अपेक्षित - म्हणावं तर अनपेक्षित... फोन अर्थातच बंद... ! बारावीचं वर्ष, अर्ध टर्म जवळपास संपलेलं... नाही म्हणायला जमीन हादरलीच... ! प्रा. दि. अ. हे चाप्टर इथे थांबलं... सावरलो... पुढे नवीन क्लास, सेल्फ स्टडी वगैरे करुन आम्ही आठही जणांनी बारावीचं कार्य पार पाडलं...
...
एक बुद्धीमान माणूस, अष्टपैलू माणूस होते, वि.वा. शिरवाडकरांची पायाशी बसून सेवा करायचे, गणिताचे नवे प्रमेय शोधायचे... नवीन सिलॅबस होता, काही गणितांवर कॉलेजमधले टिचर्स दोन दोन लेक्चर्स डोकं फोडायचे तिथे हा माणूस दुसऱ्या मिनिटाला सोल्यूशन देऊन मोकळा ! नासा, इस्रो मध्ये त्यांचे मैत्र होते... आदर्श घ्यावा असा माणूस... पण परिस्थितीने घात केला... ते पळून गेले त्यानंतर पंधरा-एक दिवस शिव्या घातल्या... अर्थातच ते चुकले हेच खरंय... आमच्या भवितव्याशी खेळणं होत होतं... ! आमचं नशीब ठिकाणावर होतं म्हणून तारलो गेलो... - माणूस म्हणून त्यांची प्रतिमा तेव्हा ढासळली...
.
आता खुप पुढे आल्यानंतर जाणवतं -
गणित त्यांच्यामूळे आवडतं...
साईन कॉस त्यांच्यामूळे खेळणं वाटतं...
इक्वेशन्सची गंमत त्यांच्यामूळे येते...
तुम्ही बारावी सहज पास व्हाल, हे त्यांनी शिकवलं...
प्रत्येक गोष्टीतलं फिजीक्स शोधण्याची नजर त्यांनी दिली...
फक्त जर पळून जाण्याचा निर्णय त्यांनी चार महिन्यांनी उशीरा घेतला असता तर कदाचित ते आईनस्टाईनतूल्य वगैरे होवून अढळपदी विराजमान झाले असते...
..
जिवंत आहेत - नाहीत माहीत नाही,
असतील तर - त्यांच्या विवंचना संपाव्या, आणि त्या प्रचंड ज्ञानी माणसाचं आयुष्य सुखाने पुढे जावं...
गेले असतील तर त्यांना पुढचा जन्म असाच विद्वानी मिळावा...
पैश्याच्या अडचणीने त्यांचा घात केला.
..
... माणूस म्हणून नसतील, शिक्षक म्हणून ते ग्रेटच आहेत !