खुनी गणपती Khuni Ganapati


"खुनी गणपती" ...

नांव वाचून आश्चर्य वाटलं नं ? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे... ! फोटोत दिसतंय ते खुनी गणपतीची - खुनी मशिदीजवळ होते ती ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा...! 
.
१८९५ मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक १००० वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी विरोध झाला... त्याचं रुपांतर हाणामारीत झालं आणि ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, जखमी झाले... आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वकतले तथा खून पडनात"... या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नांव प्रचलीत झालं...!
त्यावेळी ५ दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता...
..
पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं.
ब्रिटीशांकडून २२८ रुपये दोन्ही गटांना दिले जातात. आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली.
..
दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. यावेळी पारंपारीक टाळ-मृदुंगाच्या गजरात तिनपावली, बारापावली नृत्य होत, बरोबर सायंकाळी ५ वाजता, म्हणजेच नमाजची अजान होतांना खुनी गणपतीची पालखी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते... मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीतूनच एक धर्माधिकारी येतो, तिथूनच आरतीचं ताट आणि गुलाबाच्या फुलांचा हार आणून मशिदीतर्फे गणपतीची आरती केली जाते... एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरु होते... ! तिथे आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो...
..
याठीकाणी आल्यानंतर पालखी जड होत असल्याचाही अनुभव सांगतात. ! मूर्ती एकसारखी असते. 
..
हिंदू मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे. आणि दोन्ही धर्मीयांनी ती जपलीय... ! आठ-दहा लाखाच्या आमच्या महानगरात - धुळ्यात जुने धुळे सोडलं तर बाप्पाचं हे आगळं रुप जास्त कुणाला माहित नाही... जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी प्रथा जपलीय. त्यामूळे इव्हेंट होण्यापासून वाचलंय - जसं १८९५-१८९६ मध्ये होतं तसंच तंतोतंत आजही पाळलं जातंय... धुळ्यात आल्यानंतर, जुने धुळे विचारलं की खुनी मशिद हाच बसथांबा असतो... जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय, तस जुन्या धुळ्याने हिंदूबहूल कॉलनीतली / पेठेतली मशिदही पावित्र्याने जपलीय.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved