गुरुचरीत्र पारायण


अनुष्ठानाने अनुभव येतो  आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं...
आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते...
..
"दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...!
..
सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-विचार यांना शुद्धता मिळते... त्या दरम्यान अनुभूती मिळते तो एक क्षण येतो जेव्हा माणसाच्या रूपात जन्म घेतल्याचं सार्थक झाल्यासारखंही वाटतं...
..
गुरुसानिध्यात माणूस घडतो... ते एकटं सोडत नाहीत... त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते जन्मोजन्मी सांभाळतातच, त्यातही उत्तमोत्तम देतात... उदाहरण घ्या -
मी पारायण करतो... दत्तमहाराजांच्या ठिकाणी मी सगळे प्रश्न सोडले आहेत... थोडक्यात - मी दत्त सावलीत आहे... ! भरभरुन मिळालं, मिळतंय...
तर, प्रेमात पडलो, लग्न ठरलं - लग्न झालं... जिच्याशी झालं तिच्या माहेरी प्रचंड दत्त भक्ती आहे... दर दशमी ते द्वादशीला गुरुचरीत्राचं पुर्ण पारायण होतं... तेजस्विनी स्वतः खामगांवच्या कृष्णानंद सरस्वती (अरविंद आगाशे काका) यांची अनुग्रहीत आहे. आणि त्यांच्या घरी आगाशे काकांच्या पादुकांचं मंदिर आहे... पारायणाचे सातही दिवस तिचा उत्साह, धावपळ जबरदस्त असते...
..
गुरुचरीत्र काय सांगतं ? 
काय शिकवतं ?
विश्वनिर्मिती कशी झाली समजतं, वेदांत काय सांगितलंय - चारी वेदांचे सार जाणतात, अनुसयेचं पातिव्रत्य ईश्वरभक्ती सांगितलं, रावणाचं गर्वहरण - त्रिविक्रमभारतीचं आणि दोन ब्राह्मणांचं गर्वहरण आपल्यातला गर्व दूर करतं, माता-पिता-गुरु भक्ती दृढ करतं, कर्म महत्वाचं हे सांगतं, आपलं कर्मच आपला हिशोब करतं हे कळतं, महानंदेचा आणि भस्म महिमेचा अध्याय आपल्याला प्रामाणिकपणा शिकवतं, कच-देवयानीचा अध्याय कुठे बिनडोकपणा टाळून शहाणपणा करावा हे सांगतो, परीट आणि श्रीशैलयात्रेचा अध्याय एकनिष्ठता शिकवतो, छत्तीसावा सगळ्यांत मोठा अध्याय अंथरुण पाहून पाय पसरावे ही अक्कल देतो... विप्राची समाराधना अध्याय मनापासून केलेल्या दानाचे कौतूक करतो, नरहरी वाळलेल्या लाकडाला पाणी घालतो आणि शेतकरी शेत कापून टाकतो यांत गुरुंवाक्यावरचा विश्वास दिसतो... एखाद्यावर विश्वास ठेवला तर पूर्ण ठेवावा नाहीतर ठेवू नये, अन्यथा फजिती होते हे कविश्वराच्या आख्यान्यात दिसतं... विश्वकर्मा अध्यायात असाध्य ते साध्य होण्यासाठी प्रयत्न हा एकमेव उपाय असल्याचं जाणवतं... गुरुचरीत्रातून भूतदया जागते... नरहरी कवी, श्रीशैल्यम आध्यायात ईश्वर रुप अनेक पण परमात्मा एक आहे अश्या एकची परमात्म्याचे दर्शन गुरुचरीत्र घडवतात... गुरुचरीत्राचा प्रत्येक अध्याय गुरुंची कृपा, गुरु सानिध्य शिष्यासमवेत सदैव आहे याचा अनुभव देतात...!
..
कर्मकांड, भक्तीमहिमा, प्रचिती हे तर आहेच - 
पण गुरुचरीत्र व्यवहारज्ञान देतं...
दृष्टीकोन देतं...!
मन शुद्ध करतं, बळकट करतं.
भगवद्गीतेचा भावार्थ आपल्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर गुरुचरीत्र वाचावं...!
..
विश्वास असेल तर दत्त, 
आणि दत्त आहेत तर अनुभूती आहेच...
चमत्कार म्हणा, अनुभव म्हणा - महाराज सोबत आहेत याचा दृष्टांत मिळतोच मिळतो... त्यांच्याठायी डोकं टेकवलं की भवसागर पार झाला...!
गुरुचरीत्रात दिलंय...
म्हणे सरस्वती गंगाधर | गुरुचरीत्र अतिमनोहर I
ऐकतां पावती पैलपार I संसारसागर तरावया ॥
श्री गुरुचरीत्र ऐकता I सकळाभीष्टें तत्वता I 
लाधती म्हणोनी सर्वथा I ऐका म्हणे नामधारक ॥


© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved