गुरुपोर्णीमा २०२०
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही -
गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात,
फक्त विश्वास असावा...!
तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...!
हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...!
...
गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...!
...
आपला प्रत्येक अनुभव गुरुस्थानी असतो - अनुभव, जो आपल्याला काय बरोबर काय चुक हे शिकवत असतो.
अनुभव देणारे गुरु असतात...!
बाळ चालायला शिकतं, धडपडतं... आई-वडील त्याला धडपडू देतात, पण दुखापत होवू देत नाही... धडपडून उभं राहण्याचा आत्मविश्वास मात्र देतात... गुरु म्हणजे हेच...!
अनुभवाने समृद्ध करतात...
संसारात असतांना सन्मार्गाने भौतिक आयुष्य जगण्यासाठी - प्रपंचासाठी आणि त्यातून आध्यात्मिक वाटेवर चालण्यासाठी... त्या वाटेवर चालतांना आत्मज्ञानाच्या दृष्टीने आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी... आणि षट्चक्र सिद्ध झालीत की निर्गुणात स्थिर होण्यासाठी ती सिद्धता होते...! हा प्रवास सोपा नक्कीच नसतो, खुप वेळही लागतो, खडतर असतो - मात्र अनुभवण्याचा असतो...!
गुरुंसमोर काहीच मागण्याची गरज नसते, सांभाळून घ्या म्हणण्याचीही नाही... त्यांच्यासमोर विश्वासाने दोन हात जोडले तेवढंच पुरे. आपल्यासाठी जे योग्य ते सगळं ते करतातच !
...
दत्तमहाराजांच्या सानिध्यात आल्यानंतर ते आपली जबाबदारी त्यांच्या शिष्यावर सोपवतात... मग ते त्यांचे अवतार असतील, नवनाथ आणि त्यांचे चौऱ्याऐंशी सिद्ध असतील किंवा दत्तमहाराजांच्या गुरुपरंपरेतील अनेक महंत, योगी, संत किंवा त्यांचे शिष्य असतील... नशीबात असेल तर आपल्याला अनुग्रह मिळतो... ! ... नशीबात असेल तरच ! नशीबात नसेल तर कितीही प्रयत्न करा... काहीही करा, अनुग्रह मिळत नाही...! दत्तपरंपरेत किंवा नाथपरंपरेत एक गोष्ट मात्र जबरदस्त आहे, तुम्ही एका शक्तीला शरण गेलात तर दत्तमहाराज आपल्या प्रत्येक शक्तीसह, प्रत्येक आयुधासह आपल्याबरोबर उभे राहतात... म्हणजे तुम्हाला अनुग्रह कुणाकडूनही मिळाला तरी छत्र मात्र दत्तमहाराजांचं असणार...! नाना महाराज तराणेकरही आपले वाटतात, शंकर महाराजही आपले वाटतात... नवनाथांवरही हक्क येतो आणि आपलं गाऱ्हाणं वासुदेवानंद सरस्वतीही ऐकून घेतात... भेद असा नाहीच...!
...
माझ्या आयुष्याला दत्तमहाराजांचा परिसस्पर्श झालाय...! गजानन महाराज, कृष्णदास काका माऊली अर्थात आगाशे काका - त्यांच्या माध्यामातून नाना महाराज तराणेकर आणि शंकर महाराज या त्रैमुर्तीच्या कृपाछ्त्राखाली मी सुरक्षित आहे... ! अर्थात या परंपरेचं मूळ दत्तमहाराजच...!
...
गजानन महाराज सकारात्मकतेचा सोर्स आहेत... त्यांच्यासमोर एखादा प्रश्न ठेवला तर तो मार्गी लागणारच हा विश्वास आहे... ! शेगांव म्हणजे सेकंड होम वाटतं... हक्काचं ठीकाण... ! महाराजांना हक्कानं हवं ते मागू शकतो आणि ते देतात हा विश्वास आहे...!
...
पुण्यात होतो तेव्हा धनकवडीहून जातांना अचानक शंकर महाराजांच्या मठात जायची इच्छा झाली... कसं - काय माहीत नाही... पूर्वी कधी ओळखही नाही... गाडी थांबवली... गेलो...! मी त्यादिवशी जे अनुभवलं ते जबरदस्त होतं. विलक्षण शक्ती होती... ! त्या मठातली प्रत्येक गोष्ट मला ओळखीची वाटत होती... आणि महाराजांसमोर गेल्यानंतर तर एखादं आपलं माणूस बऱ्याच वर्षांनी भेटावं असं... मी महाराजांना आधी भेटलोय, पाहीलंय असं वाटत होतं...! त्यांच्यासमोर बसून "किती वेळ लागला भेटायला महाराज" हेच पहिलं वाक्य बोललेलो ... ! मलाच समजलं नाही... तिथून निघतांना मी जे समाधान अनुभवत होतो ते जबरदस्त होतं... एक वर्तुळ पुर्ण झाल्यासारखं...! नंतर जेव्हा जेव्हा महाराजांनी बोलावलं तेव्हा गेलो.
...
अनुग्रह मिळणं हा आपल्यासाठी ड्राइविंग फोर्स ठरतो... वळण लागतं...! आपलं स्टेअरिंग त्यांच्या हाती दिलं जातं...! खामगांवला गेल्यावर अनुग्रह घेण्याची इच्छा झाली, आणि काकांनी ती इच्छा लगेच पुर्णही केली...!
त्याआधी वेगवेगळे दृष्टांतही दिलेले, पण ते दृष्टांत समजून घेणं माझ्या शक्तीबाहेरचं होतं... अनुग्रह मिळाला त्या दिवसानंतर माझं आयुष्य खऱ्या अर्थाने मार्गावर आलंय... स्थिर झालंय...! हा मार्ग अनुभवांचा आहे...
अनुभवांना चमत्कार म्हणता येत नाही... मग ते दरवेळी गुरुमंत्र करतांना अंगावर सर्रर्रकन येणारे शहारे असू देत, की छोट्या छोट्या गोष्टीतही आपल्याला सांभाळलेलं असू देत...! त्यांच्यावर सोडलं की आपण निर्धास्त होतो हेच खरं...! विश्वास ठेवला की सगळं साध्य आहे...!
...
काही गोष्टी विज्ञानाच्या कसोट्यांवर सिद्ध होत नाहीत... त्या असतात हे मात्र खरं ... अनुभव येतात, अनुभूती येते... त्याच दैवी असतात.
गुरु चमत्कार करत नाहीत, गुरु आत्मविश्वास देतात,
योग्य मार्ग दाखवतात, त्या मार्गावर चालण्याचं बळ देतात... चुकू देतात - पण चुक झाल्यानंतर तिचे परिणाम अनुभवू देतात आणि ती चूक सुधारण्याची संधी देतात...!
गुरु आपल्याला चालण्याची शक्ती देतात, आपण धडपडलो तर सावरतात... खरं तर - मार्गातले अडथळे दिसावे म्हणून आपल्या पावलापुढे प्रकाश देत चालणारे गुरु असतात...! आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ते कुठल्याही रूपात भेटू शकतात...! कधी कुणा व्यक्तीच्या रूपात, कधी अनुभवाच्या.
कधी समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकात, दासबोधात उत्तर मिळतं तर कधी भगवद्गीतेत...!
...
विश्वास असला की अनुभूती मिळतेच... गुरुचरीत्राच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आणि शेवटी तेच सांगीतलंय...
"अरे ! काही करू नकोस , तुझ्या सद्गुरुना शरण जा. तुझी श्रद्धा, भक्ती, एकाग्रता एवढी वाढव की त्या सद्गुरुनी सांगितलेला प्रत्येक शब्द फुलासारखा झेलता आला पाहिजे... कदाचित त्या फुलात काटे असतील ते तुला टोचतील, तरीसुद्धा तू तक्रार करू नकोस. कारण ते काटेसुद्धा तुझ्या अंतिम हितासाठीच असतील..."
...
गुरुपोर्णीमा हा एकच दिवस नव्हे, तर प्रत्येक क्षण न क्षण त्या शक्तीच्या अधीन आहे...
...
- तेजस कुळकर्णी
..