अखेरचा क्षण मृत्यूचा थंडगार स्पर्श
.काल रात्री माझ्या एका मित्राची नव्वदीतली आजी देवाघरी गेली. नव्वद वर्षांची होती, शरीर पूर्ण गेलेलं तरीही शेवटच्या क्षणापर्यंत मेंदू आणि वाचा तल्लख होती. तिचा शेवटचा अगदी जीव जायच्या वेळेचा क्षण मला प्रत्यक्ष बघता आला. शेवटचा क्षण कसा असतो, इतक्या वर्षाचं आयुष्य संपत असतं, जे जे माझं माझं म्हणून जमवलं ते इथेच सोडून जायचं असतं, पुढे काय असेल याची एक उत्सुकता अश्या असंख्य भावनांचे काहूर त्यावेळी मनात उठत असावं. त्या आजींच्या शेवटच्या क्षणाचं पूर्ण निरीक्षण केलं. त्यांची वाचा आणि मेंदू शेवटपर्यंत शाबूत होता त्यामुळे नेमक काय होतंय हे जाणून घेण सोप्प झालं.
.
शेवट जसा जसा जवळ येत होता तसा आजूबाजूंच्या मंडळींची हुरहूर वाढत होती. संपूर्ण शांत आणि भयाण वातावरण. नकळत कुणाच्यातरी मुखातून हुंदका बाहेर पडायचा. आजीं घरभर नजर फिरवत होत्या. त्यांच्या मुलांकडे, मुलींकडे वैगेरे बघत होत्या. खुणेनेच त्यांना शांत व्हा असा इशारा केला. त्यांच्या मोठ्या मुलाने शांतपणे विचारलं, "काही हवंय का आई??" आजी सगळी शक्ती एकवटून "मी खूप थकलीय आणि मला झोप येतेय" इतकंच बोलल्या, आणि समोरच लावलेल्या त्या मित्राच्या आजोबांच्या फोटोकडे बघतांना त्यांचे घळाघळा अश्रु वाहू लागलेत. एकवार सगळ्यांकडे मायाळू नजरेने बघून आजीँनी डोळे मिटले. त्यांच्या मुलाने तोँडात टाकलेल्या पाण्याचा बुडबुडा निघाला आणि आजी गेल्याचं समजलं.
.
मला त्या आजीँच्या शेवटच्या क्षणांचा उलगडा होत गेला. त्यांच्या अश्रुंचा, त्या सगळ्यांकडे बघण्याच्या नजरेचा. आपल्याला ज्यांनी सांभाळलं त्यांच्याविषयीची कृतज्ञता त्या नजरेत होती. आणि नंतर एक एक स्टेप मागे जातांना त्यांना त्यांचं आयुष्य फ्लॅशबॅक झालं असेल. त्या क्षणातच त्यांना त्यांचं लग्न, वैवाहीक आयुष्य, माहेर, बालपण या सगळ्या गोष्टी आठवल्या असतील आणि त्याचे हे आनंदाश्रू असतील. कदाचित त्यांच्या आधी देवाघरी गेलेला त्यांचा नवरा, आईवडील, भाऊबहीणी यांना त्या समोर बघत असतील...! मला माझ्या आत्याचं आठवतंय, ती जाणार त्या दिवशी (आधी गेलेले) माझी आजी, आत्याचा मुलगा आणि मुलगी यांचं नाव घेत होती, त्यांच्याशी बोलत होती. अर्थात हा झाला शेवटचा क्षण !! वेदनांचं काय ? मरणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास होतो त्याचं काय ?
.
तर आजीँचं शेवटचं वाक्य होतं, "मी खुप थकलीय, आणि मला खूप झोप येतेय." ! आपण जितक्या सहजपणे झोपतो तितक्याच शांतपणे मृत्यू येत असावा. कारण त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता.
.
"मृत्यू" या घाबरवणाऱ्या शब्दातही भव्यता, सुरेखता, उदात्तपणा आहे. कवी गोविँद म्हणतात तसं "जुनी इंद्रीय, जुना पसारा सर्व सर्व झडणार... , नव्या शक्तीचे, नव्या तनुचे पंख मला फुटणार… सुंदर मी होणार !