जगजितसिंह
दुःख, विरह हे सुद्धा अनुभवण्याची गोष्ट आहे हे त्यांनी पटवून दिलं... त्यांनी प्रेमात पडलेल्या काळजाची तार छेडली तसंच प्रेमभंगातल्या दुःखातून पाझरणाऱ्या अश्रूंचं गीत केलं... एकीकडे प्रेमाची थंडगार वाऱ्याची झुळूक दाखवली, दुसरीकडे विरहातली हूरहूर ... "सॉंसे देकर अपनी संगीत अमर कर दो"... म्हणत या माणसानं गझल अमर केली...
..
संध्याकाळ पासून चढत जाणारी रात्र, थंडगार वारा, मंद प्रकाश - आणि जगजितसिंगांची गझल... हि अनुभवण्याची गोष्ट आहे... "प्यार का पहला खत" पासून सुरुवात करायची, तुम को देखा तो ये खयाल आया, झुकी झुकी सी नजर, सरफरोश मधलं होशवालोको खबर है क्या, तेरी खुशबू मे बसे खत, तुम इतना जो मुस्कूरा रहे हो" ही गाणी करत करत संध्याकाळ संपता संपता - "कही दूर जब दिन ढल जाऐ" वर यायचं... गझल ही नशा आहे... रात्र चढते तशी गझल चढणार... जगजितसिंगांचा गंभीर आवाज - आणि रात्र... हा एकांत हवाहवासा वाटणारा, अनुभवण्यासारखा असतो... चढत्या रात्रीसोबत "होठो से छू लो तूम...." ऐकायचं. कुठलीही गझल एकदाच ऐकून मन भरणार नाही - पून्हा पून्हा ऐकायचं... "होठो से" तर ऐकायचंच... मन भरलं की "वो कागज की कश्ती'', तूम पास आ रहे हो, तेरे आने की खबर, कल चौदहवीकी रात थी, तू नही तो जिंदगी, दिल ही तो है पर्यंत... ! मग जगजितसिंग स्पेशल सुरू होतं... दर्द के फूल भी आणि "इक प्यार का नगमा है..." ... मन शांत होतं... शून्यात जातं... कधीतरी संध्याकाळी घरात "ये तेरा घर ये मेरा घर" खूप सारा आनंद घेऊन येतो, तर कधीतरी "हे राम हे राम" मनात शांतता... !
..
जगजितसिंगांमूळे गझल घराघरात पोहचली, उर्दू शायरी जी फक्त नवाबांच्या मैफीलीत गायली जात ती सामान्य लोकांपर्यंत आली. त्यामूळे भारतीय गझलांना, संगीताला नवी ओळख मिळाली. या गझलांनी अनेकांचा प्रेमभंग सुसह्य केला, त्यांना पुन्हा नव्याने उभं केलं...
.
६ वर्षांपूर्वी - १० ऑक्टोंबर २०११ रोजी ब्रेन हॅमरेजनी ही मैफील संपली...
चिट्ठी ना कोई सन्देश
जाने वो कौन सा देश
जहाँ तुम चले गए ...
- तेजस कुळकर्णी