Guilt for forever

= Guilt for forever =
माझी पणजी, माईआजी गेल्या तेव्हा मी ८ - ९ वर्षांचा असेन. त्या गेल्या, पण जन्मभराचा एक अपराध माझा जीव घेतो. दसरा आणि त्यानंतरचा हा दिवस आला की माझं मन सैरभैर होतं, बेचैन होतं. कधीही न भरून निघणारी, प्रायश्चित्त घेता न येणारी हूरहूर दाटते...
.
माईआजी वर्षभर बेडवरच झोपून होत्या, पण त्यांचं बोलणं व्यवस्थित होतं... दसऱ्यालाही दुपारी १२-१२:३० पर्यंत सगळं चांगलं होतं... दसऱ्याचा दिवस म्हणजे आमच्याकडे नवरात्राचे उपवास संपून कुळधर्म असतो. आईनं माईआजींना सकाळी चहा, नाश्ता दिला... दुपारी १ वाजता त्यांना मी पाणी दिलं... पाणी देतांनाच "भूक लागलीय, जेवायला वाढायला सांग" असं अडखळत बोल्ल्या... त्यांना दुसऱ्या मजल्यावर एका रुम मध्ये ठेवलेलं. तिथून खाली किचनमध्ये आलो... आई त्यांचंच ताट वाढत होती, माईआजींच्या जेवणाकरता आम्ही तेव्हा  सोवळं, नैवेद्य हा विचार करत नव्हतो... त्यांना देणं नेहमीच महत्वाचं होतं... मी आईला सांगणं ते तिचं वाढणं यात पंधरा मिनिटं गेले, त्यांचं ताट घेऊन आई वर आली तोवर माईआजी कोमात गेलेल्या... हाका मारल्या, डॉक्टर्स बोलावले, प्रार्थना केली पण ती घटीका समीप होती - दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच ती माऊली आम्हाला सोडून गेली...
..
म्हणायला फक्त दहा - पंधरा मिनिटं होती, पण माईआजी न जेवता गेली... तिची घाई तेव्हा मला समजली नाही, मी तिच्याजवळ दहा मिनिटं लवकर गेलो असतो, तिची घाई तेव्हा मला समजली असती तर दोन घास त्या माऊलीच्या पोटात गेले असते, तृप्त होऊन गेली असती... प्रसंग कोरला गेला, समज आली तसा गडद झाला. माझ्यामुळे त्या न जेवता गेल्या, मनात ही जखम नेहमीसाठी झाली. कधीकधी स्वप्नात येवून त्यांच्या भूकेची जाणीव करुन देतात, हक्कानं मागतात. तिने दिलं तर भरभरुनच दिलंय - पण त्या म्हाताऱ्या जीवाला शेवटचे दोन घास आपण देवू शकलो नाही याचं शल्य बोचतं... नेहमीसाठीचं... मी मरेपर्यंत ते जाणार नाही...
..
मातृगया, त्र्यंबकेश्वर, काशी, बद्रीनाथ सगळीकडे जाऊन श्राद्ध केलं, नेहमी करतो... तिच्यापर्यंत ते पोहचतं की नाही माहीत नाही, पण मनातल्या Guilt ला उपाय नाही... क्षयातिथीला दरवर्षी या दिवशी तिचं श्राद्ध करतात, तिचं ताट वाढून वर ठेवतांना तिथे दोन मिनिटं बसतो - माई आजी जेवायला ये, पोटभर खा, पाणी पी, तृप्त हो... आजही केलं. ती येत असेलही... पण त्या राहीलेल्या दोन घासांचं ऋण काहीकेल्या फिटणार नाही... जन्मभराचं ओझं आहे, हे दोन दिवस त्या ओझ्यानं डोळे पाणावलेले असतात. जेवण जात नाही.
..
त्यानंतर कुणी काहीही मागीतलं तरी आधी त्या माणसाची गरज पूर्ण करायला धडपडतो. कुणीही भूकेलं, तहानलेलं जावू नये, खूप भयाण फिलींग असते ही ... जाणारा माणूस, जाणारी वेळ निघून जाते, उरते फक्त हतबलता, ओझं आणि त्या ओझ्यानं डोळ्यातलं पाणी.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved