दिलीप प्रभावळकर : 75th Birthday


ज्या माणसांशिवाय मराठी चित्रपटसृष्टी अपूर्ण आहे, ज्यांना पडद्यावर बघितलं तरी घरातलं माणूस भेटल्याची जाणीव होते ते दिलीप प्रभावळकर... जन्माला येतांनाच ते आपल्याभोवती प्रभावळ घेऊन आले... मराठी चित्रपटसृष्टीतले बिग बॉस... बघताक्षणी आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर बायडिफॉल्ट व्हावा अश्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा, प्रभावळकरांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस... !
..
साडेपाच - सहा फुट उंची, गौरवर्ण आणि चेहऱ्यावर असलेला अभिजात आत्मविश्वास... या रुपासह प्रभावळकर चित्रपटसृष्टीत अवतरले... एखाद्याच्या बाबतीत निसर्ग भरभरुन देतो - प्रभावळकरांच्या डोक्यावरचं टक्कलही त्यांच्या व्यक्तीमत्वाला चार चाँद लावणारं, साजेसं आहे... ! शुद्ध मराठी, कणखर आवाज, न आणि ण, श आणि ष, ट आणि ञ यांतील फरकासह असणारी आणि विरामचिन्हांचा आदर करणारी सुस्पष्ट शब्दफेक, भारदस्त देखणं रुप या बळावर प्रभावळकर मराठी अभिनयातले सुपरस्टार झाले..
..
चि. वि. जोशी लिखीत चिमणराव गुंड्याभाऊ मध्ये प्रभावळकरांनी बाळ कर्वे यांच्यासह कोकणस्थ भट चिमणराव साकारले... सत्तरच्या दशकातील मराठी मध्यमवर्गीय माणूस आणि मित्रासमवेत असणारी त्यांची जुगलबंदी यामूळे चिमणराव गुंड्याभाऊ पहिली टिव्ही सिरीयल प्रचंड लोकप्रिय झाली... त्यांची मालिकेतील लक्षात राहणारी अजून एक  भूमिका म्हणजे "श्रीयूत गंगाधर टिपरे"... जून्या झी मराठीवर जेव्हा मराठी मालिकांचा दर्जा सर्वोच्च प्रमाणावर होता तेव्हा दिलीप प्रभावळकरांच्याच लोकसत्तेतील स्तंभावरुन या मालीकेची निर्मीती झाली... टिपरे कुटूंबात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आणि त्यातून जगण्याची शिकवण हा त्या मालिकेचा गाभा होता. प्रभावळकरांनी साकारलेले आजोबा मालिका बंद झाल्यानंतर १५ वर्षांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताय... "चूक भूल द्यावी"यात प्रभावळकर पुन्हा आजोबांच्याच रुपात अवतरले, पण यावेळी खट्याळ म्हाताऱ्याच्या रुपाने ! 
..
हिरो म्हणून अभिनेत्रींच्या गळ्यात हात टाकून नाचणं त्यांना कधीच जमलं नाही, ना आपल्या किंवा त्यांच्या सुदैवाने त्यांना तश्या भूमिका मिळाल्या... भूत त ते आजोबा व्हाया गांधी अश्या अनेक सोन्यायासारख्या भूमिका मिळाल्या प्रभावळकरांनी प्रत्येकच भूमिकेचं सोनंच केलं... विनोदी अंगाने गंभीर पात्र साकारण्याचं आव्हान केवळ प्रभावळकरच पेलू शकतात... चौकट राजामधील मंद मुलगा आणि त्याचं निरागस प्रेम त्यांनी जितक्या आत्मियतेने सांभाळलं, कथा दोन गणपतरावांची मधील शिस्तप्रिय गणपतरावही जिवंत केले... भूत झाले तर त्यांना पाहून खऱ्या भूताचीही हातभर फाटावी असा जिवंतपणा त्यांच्यात आहे... झपाटलेलातलं तात्या विंचूचं भूत, पछाडलेलातले दूर्गे सूड दूर्गे सूड म्हणत भूत झालेले खडूस क्रूर इनामदार आठवलंतरी चर्र होतं... ! विनोदी भूमिकांसाठी लागणारं अचूक टायमिंग प्रभावळकरांकडे परफेक्ट आहे... हास्यसम्राट दिलीप प्रभावळकर काय आहेत हे अनूभवण्यासाठी तीन-चार चित्रपट बघणं पुरेसे आहेत... "छक्के पंजे" यातल्या मराठी मास्तराची भूमिका, निशाणी डावा अंगठामधील शिक्षणाधीकारी, आणि सुधीर जोशी - रमेश भाटकर यांच्यासोबतचा लपवा-छपवी... कुठलाही आचरटपणा नाही, द्वयार्थी शब्द नाही किंवा अश्लीलता नाही... स्टँडर्ड जोक्स म्हणजे काय ? तर प्रभावळकर त्याचं विद्यापीठ आहेत... ! 
...

अगं बाई अरेच्चामध्ये मूकेपणे केलेला त्यांचा संवादही काळजाला भिडतो... प्रभावळकर जे आजोबा साकारतात ते पाहून हिंदीतल्या आलोकनाथांनाही कॉम्प्लेक्स येईल... नारबाची वाडी, बोक्या सातबंडे हे चित्रपट यासाठीच हिट ठरतात.. प्रभावळकर आजोबांचं लग्न लावणारी नातवंडही कुठल्यातरी चित्रपटात दाखवलीय, त्याचं नाव गुपचिळी का काहीतरी ते नाही आठवत... 
..
आजोबा म्हणून लक्षात राहणारा आणखी एक चित्रपट आहे - ज्यात त्यांचं निधन झालेलं असतं, पण सुकन्या कुलकर्णी ते जिवंत आहेत असं भासवून लग्नाचा वाढदिवस साजरा करतात... मुक्ता बर्वे त्यांच्याशी बोलते तेव्हा मृत शरीराचे गुणधर्म आपल्या अभिनयाने प्रभावळकरांनी तंतोतंत जिवंत केलेत... अगदी हल्लीच आलेला दशक्रीया हा गंभीर चित्रपटही त्यांच्याच अभिनयाने परीपक्व झालाय... मोरयातले हॉटेलवाले काकाही त्याच ठेवणीतले..!
...
लगे रहो मुन्नाभाईमध्ये साकारलेले गांधी म्हणजे त्यांची आजपर्यंतची माईलस्टोन भूमिका ठरली... 
..
प्रभावळकर आजोबांबद्दल कितीही लिहीलं तरीही अपूर्ण वाटावं... लहानपणापासून त्यांचे चित्रपट बघत मोठे झालो, आपण लिहून थकणार पण ही प्रभावळकरलीला संपणार नाही - थकणार नाही... !
शरीराने वृद्ध झाले, मनाने कधीच नाही... वयाच्या पंच्चाहत्तरीतही हा माणूस जोशाने एक से एक भूमिका साकारतोय...
प्रभावळकर हे खऱ्या अर्थाने सूपरस्टार आहेत... 
देव त्यांना ठणठणीत आरोग्य, भव्य आयुष्य देवो...
चिमणराव ते गांधी... यांसारख्या अनेक नवीन चित्रपटांतून त्यांचं पून्हा दर्शन होवो आणि हे अष्टपैलू, गोड व्यक्तीमत्व दिर्घायू होवो, 
या प्रार्थनेसह -
अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा.. आणि,
त्यांच्या तब्बल पन्नास वर्षांच्या कारकिर्दीला दंडवत... !
तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved