Fact behind Poladpur Accident

मुंबई: पोलादपूर बस दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या बचावलेले कोकण कृषी विद्यापीठाचे अधीक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी अपघाताचा थरार एबीपी माझावर सांगितला.

या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी मीच आहे. अपघात झाला, बस कोसळली त्यावेळी तिथे कोणीही नव्हती. त्यामुळे माध्यमांमधून जे काही अॅनिमेशन किंवा प्रत्यक्षदर्शी म्हणून दाखवलं जात आहे, ते सगळं झूठ आहे. लोकांच्या भावनांशी खेळू नका, वाट्टेल ते दाखवू नका, वाट्टेल ते बोलू नका, असा संताप प्रकाश सावंत देसाई यांनी व्यक्त केला.

प्रकाश सावंत देसाई यांनी याबाबत सातत्याने मराठीतील एका वृत्तवाहिनीचे नाव घेतलं. त्या वृत्तवाहिनीने जे घडलं नाही ते दाखवलं. मी उडी मारली, मला दोरी टाकून वर घेण्यात आलं असं सांगितलं जात होतं. पण प्रसिद्धीसाठी ती वाहिनी काहीही दाखवत होती. आमच्या भावनांशी खेळत होती, त्यामुळे प्रचंड चीड, राग येत होता, असं प्रकाश सावंत देसाई म्हणाले.

आसपास कोणी नव्हताच, तर ड्रायव्हर मागे बघत होता हे तुम्हाला कसं कळलं? मी प्रत्यक्षदर्शी आहे, मी जे सांगतोय तेच खरं आहे. मातीतून गाडी घसरली ते थेट खाली कोसळली, असं प्रकाश सावंत देसाईंनी सांगितलं.

दररोज दिसणारे चेहऱ्या माझ्यासमोर घरंगळत गेले. त्यांचे चेहरे डोळ्यासमोरुन जात नाहीत. मी जिवंत आहे यावर विश्वास नाही तर 30 लोक गेलेत हेच सत्य डोळ्यासमोर येतंय. रात्रभर झोप लागत नाही. इकडून तिकडे सतत कूस बदलत राहतो, असं प्रकाश सावंत देसाईंनी सांगितलं.

अपघात नेमका कसा घडला?

जिथे अपघात घडला तिथे रेलिंग तयार करण्यासाठी ड्रिल मारले आहेत. पाच-सहा होल आहेत. डांबरी रस्त्याच्या बाजूलाच आहेत. त्या खड्डयाची माती रस्त्यावरच बाजूला काढून ठेवली आहे. त्या मातीवर बसचा टायर गेला ते गाडी घसरतच गेली. डाव्याबाजूला कुठे कठडा नाही, रेलिंग नाही, जर ते असते तर आज हा अपघात झाला नसता. गाडीला वेग नव्हता, गाडी नियंत्रणात होती, असं प्रकाश सावंत देसाई म्हणाले.

प्रकाश सावंत देसाई कोणत्या सीटवर होते?

मातीवरुन गाडी आधी थोडीशी घसरली ते मला जाणवलं. मी त्यावेळी ड्रायव्हरच्या बाजूला क्लीनर सीटवर होतो. डावा टायर खाली उतरला ते थेट बस दरीत कोसळली. दरीत एका झाडावर बस आदळली आणि पुढची काच फुटली. गाडी आदळली आणि मी डोळे मिटले. मी डॅशबोर्ड आणि सीटच्या मध्ये पडलो. गाडी पडल्यानंतर काही आधार नसल्याने बस तशीच आडवी होऊन पलटी झाली. बस पलटी होऊन गडगडत गेली, त्यात मी ही गिरक्या घेतल्या. मी डोळे उघडून पाहिलं तर सगळेच फिरत होते.

मरण समोर दिसल्यावर हत्तीचं बळ येतं म्हणतात, तसं मी जे हातात दिसेल ते पकडण्याचा प्रयत्न केला. बसची पुढची काच फुटली असल्याने, माझ्या हातात झाडाची फांदी आली, ती मी घट्ट धरुन ठेवली. माझं दैव बलवत्तर म्हणून फांदी धरल्याने मी तिथेच राहिलो. माझ्या डोळ्या देखत बस खाली घरंगळत गेली. आपटण्याचे दोन तीन आवाज आले. नंतर आवाज बंद झाले.

किंकाळ्या मारल्या

गाडीचा आवाज बंद झाल्यानंतर मी किंकाळ्या मारत होतो, मित्रांना आवाज देत होतो. जिवाच्या आकांताने ओरडत होतो. पण कुणीही हाक दिली नाही.

मी पकडलेलं ते झाड बऱ्यापैकी मजबूत होतं. एक चप्पल पायात होती, ती टाकून दिली. मातीत पाय रोवून, हात रुतवत हळूहळू वर आलो. ज्याठिकाणी  ज्या झाडाला गाडी अडकली होती, त्याठिकाणी आलो. काही फांद्या बस आदळल्याने पसरल्या होत्या, त्यामुळे तिथे आधाराला जागा होती. तिथे मी दोन मिनिटे बसलो. वर बघितलं तेव्हा दोन माणसं धावत आलेली दिसली. ती माणसं खाली बघत होती, त्यांना मी दिसत नव्हतो.

मी तिथून थोडा वर गेलो आणि त्या माणसांना हाक दिली आणि वर घेण्यास सांगितलं. त्यांच्यापैकी एक होता दिलीप तळेकर. ते मूळचे पोलादपूरचेच, पण मुंबईत पश्चिम रेल्वेत कामाला आहेत. त्यांचा मोबाईल घेतला. मात्र त्यांचा अॅपल फोन ऑपरेट होत नव्हता. त्यांच्यासोबत दुसरा माणूस होता.. त्यांच्या मोबाईलवरुन मी सर्वात आधी माझा दापोलीतील सहकारी अजित जाधव यांना कॉल केला, दापोली पोलिसांना कॉल करुन पटापट माहिती दिली. रेस्क्यू ऑपरेशन करण्यास सांगितलं.

11.30 ते 12.10 काय घडलं?

आमची बस सुमारे साडे अकराच्या सुमारास खाली कोसळली. मी वर चढून पहिला फोन केला तेव्हा साधारण 12.05 ते 12.10 झाले असावेत. 20-25 मिनिटात ट्रेकर्स येऊन खाली उतरण्यास सुरुवातही झाली होती.

मला दोरी टाकली नाही

मी एका वाहिनीवर पाहिलं की वाघमारे नावाचा इसम सांगत होता, मी दोरी टाकून त्यांना वर घेतलं वगैरे.. ते सगळं झूठ आहे.  कदाचित त्याला राष्ट्रपती पुरस्कार हवा असेल म्हणून हे सांगत असेल. तळेकर नावाच्या माणसाने मला मदत केली.

मी जे आता सांगतोय, तेच खरंय. जे तर्कवितर्क लढवून सांगतायेत ते सगळं झूठ आहे. अॅनिमेटड बस अशी गेली तशी गेली असं सांगतायेत ते पण खोटं आहे.

उडी मारायला संधी कुठे होती?

मी उडी मारली सांगतात, पण मला तशी संधी कुठे होती? समोरच्या फुटलेल्या काचेतून उडी मारली असती, तर मीच खाईत गेलो असतो. बरं एव्हढं प्रसंगावधान माणसालं असतं का? सीटच्या खिडक्या खांद्यापर्यंत होत्या. सव्वा फूटाच्या खिडकीतून 80 किलोंचा माणूस उडी कशी मारेल? त्यामुळे वस्तूस्थितीच्या नावे जे काही पसरवलं जातंय, ते झूठ आहे.

मलाही लागल्याचं आज मला जाणवतंय, पण माझ्या जखमा महत्त्वाच्या नाहीत, 30 कुटुंबाच्या वेदना मोठ्या आहेत.

तो प्रसंग दिसतोय, राहून राहून आठवतंय, रक्त दिसतंय, झोप लागत नाही.. रात्रभर इकडून तिकडे वळत असतो.

मी सर्वांच्या कुटुंबाकडे जाणं ही माझी जबाबदारी आहे. आमचे चांगले संबंध, घरगुती संबंध आहेत..त्यात भावना अडकलेल्या आहेत.

काल मी अडीच तीनला दापोलीला आलो. आज ऑफिसला जायचं होतं पण माझी इच्छा नाही. त्या इमारतीत पुन्हा जायचं धाडस होईल की नाही माहित नाही.

श्री सांवत ह्यांनी सत्य परिस्थिति कथन केलीये. उगच कुठल्याही अफवा पसरवू नये. ते आता कुठल्या परिस्थितितून जात असतील ह्याची कल्पना करणं अशक्य आहे

Please respect his feelings

Copy paste
अज्ञात सोर्सकडून साभार ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved