अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpeyi


दि. २८ मे १९९६, संसदेत एक ऐतिहासिक क्षण साजरा होणार होता... संसदेच्या आजपर्यंतच्या इतिहासातली एक महत्वपूर्व घटना घडणार होती... सभापती होते पी. ए. संगम्मा. अनेक पक्षांचा टेकू घेऊन निर्माण झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला बहूमत सिद्ध करायचं होतं, ऐनवेळी धोका झाला - आणि बहूमत नसल्याचे जाणून वाजपेयींनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला... पण तत्पूर्वी त्यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केलेल्या काँग्रेस सरकारची संसदेतच पुराव्यासकट न भूतो न भविष्यती अशी पिसं काढून "मै यहाँसे सिधा राष्ट्रपती महोदयके पास अपना इस्तिफा सौंपने जा रहा हूँ".... म्हणत निघाले देखील ! कॉंग्रेस सरकारला तेव्हा बसलेला धक्का इतका जबरदस्त होता, पुढची आठ वर्ष ते त्यातून सावरले नाहीत ... केवळ तेरा दिवसांचं वाजपेयी सरकार पडलं - सुर्यास्त वाटला - पण प्रत्यक्ष्यात ते ढग होते, ते हटले आणि भाजपाचा लख्खं प्रकाश पडला... या रथाचे सारथी होते अटल बिहारी वाजपेयीजी... !
..
१९९८-१९९९
तेव्हा मी पाच-सहा वर्षांचा होतो...
थोडीफार समज आली, तेव्हा हा देश आहे, यासाठी कुणी एक पंतप्रधान असतात, ज्यांचे फोटो सगळीकडे दिसतात - आणि ते खूप मोठे असतात... इतकंच कळायचं... टिव्हीवर ते दिसतात, पांढरा किंवा बदामी कुर्ता आणि पांढरीशुभ्र धोती घालतात आणि त्यांचं नाव "अटल बिहारी वाजपेयी" आहे, हे कुणी विचारलं तर सांगता येत होतं... "प्रधानमंत्री" म्हणजे पॉवरफूल माणूस, अटलजींचं घरातल्या वृद्ध माणसासारखं व्यक्तीमत्व त्या वयात खूप प्रभाव पाडून गेलं... सात आठ वर्षांच्या वयात इतकं राजकारण, देशातील घडामोडी वगैरे कळत नव्हतं, पण ते खुप विलक्षण आहेत हे जाणवायचं... आपण इतरांपेक्षा खूप हुशार आहोत - आपल्याला मोठ्यांसारखं कळतं हे दाखवायला बातम्या बघत टिव्हीसमोर बसलेलो असायचो, आणि त्यामुळेच "अटल बिहारी वाजपेयी" या व्यक्तीमत्वाने मनावर गारुड केलं... ते राष्ट्रपुरुष, राष्ट्रपिता, ऋषीतूल्य आहेत हे कळण्यासाठी मनमोहन सरकारचं भयंकर सरकार भोगून २०१४ उजाडावं लागलं... !
..

 "अटल बिहारी वाजपेयी" ...
ज्यांचं नाव ऐकलं तरीही मनात आदराची भावना निर्माण होते... जे देशाचे पंतप्रधान होते... आणि ज्यांनी देशाहितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले... संघाशी जोडला गेलो तेव्हापासून तर वाजपेयीजी खऱ्याअर्थाने राष्ट्रपिता म्हणून मनातल्या आदरस्थानी आहेत... योग्य, स्वच्छ आणि सुशासन देणारा व्यक्ती पंतप्रधान म्हणून देशाला एक टर्म लाभला, त्यांची कारकिर्द आपल्या हयातीत अनुभवता आली हा नशिबाचा भाग आहे... !
त्यांच्या नेतृत्वगुणाची ओळख करून घ्यायचीय ?
गैरकॉंग्रेसी सरकार, २४ वेगवेगळे पक्ष आणि तब्बल ८१ मंत्र्यांचं मंत्रीमंडळ : ५ वर्ष सहज पूर्ण केले, त्यात कुठल्याच पक्षाने त्यांना विरोध केला नाही... त्यांच्या व्यक्तीमत्वाचा पंतप्रधान म्हणून जबरदस्त प्रभाव पडायचा... अगदी इतर देशांचे प्रधान सुद्धा त्यांच्या व्यक्तीमत्वाने दचकून असायचे... भारताची प्रतिमा जगात उंचावण्यासाठी अटलजींच्या परराष्ट्रनितीचा, राजकीय कौशल्याचा, संयमी-अभ्यासू परीपक्व राजकारणाचा प्रचंड फायदा झाला... मोदीजी आज जे करताय तो कळस आहे, पण त्या मंदिराचा पाया वाजपेयीजींनी रचलाय.
..
१९९२ डिसेंबर ! ... घटना माझ्या जन्मापूर्वीची - किंबहूना त्या दंगली सुरु असतांनाच माझा जन्म झाला त्यामूळे जिव्हाळ्याची... आम्ही अयोध्येहून येतांना तिथली कारसेवाची सिडी आणलेली... त्यात कारसेवकांना संबोधित करतांना अटलजी दिसले... !...
हल्लीच कलामांच्या पुस्तकातही पोखरणच्या परमाणू चाचणीतल्या प्रकरणात भेटले... कलाम, जॉर्ज फर्नांडीस यांच्यासमवेत पोखरण चाचणी यशस्वी झाल्यानंतरचा आणि त्यातून अमेरीका-पाकीस्तानची जिरवल्याचा आनंद साजरा करतांना.. !
पाकीस्तानबरोबरची दिल्ली ते लाहौर सदा ए सरहद नावाची बस दिसली - मैत्रीचा हात दिला... पण त्याच पाकीस्तानला कारगील युद्धात भारताने धूळ चारली... अटल बिहारी वाजपेयी तेव्हा पंतप्रधान म्हणून खंबीर होते... !
वाजपेयींच्या कार्यकाळातच भारताची घौडदौड विकसनशील देशाकडे सुरु झाली... भारतात रस्त्यांचे जाळे निर्माण करुन स्वर्ण चर्तुभूज अंतर्गत चारही महानगरं जोडली... प्रधानमंत्री ग्रामसडक योजना वगैरे त्यांच्याच काळातले... पंतप्रधान म्हणून ते ग्रेट होतेच... त्यांची कारकीर्द इथे मांडणंही शक्य नाही, पण माणूस म्हणून ते कणखर होते... !
..
वाजपेयी कसले जबरदस्त बोलायचे... ऐकत रहावं...
ओघवती शुद्ध हिंदी, मुद्देसुद आणि अभ्यासपूर्ण मांडणी, संयमी वक्तव्य... ! राष्ट्रवाद आणि देशभक्ती त्यांच्या मुखातून संततधारेने वहायची... त्यांच्या कितीतरी भाषणांची पारायणं केलीयेत... ! प्रत्येक शब्दातला गॅप, कुठल्या शब्दावर जोर द्यायचा आणि कुठे मिश्किल टिप द्यायची हे त्यांच्यातला प्रभावी वक्ता जाणायचा... त्यांची भाषणं बघा - वाह्यातपणा नाही, तथ्यहीन टिका नाही किंवा फालतू आवेश नाही... म्हणून तर ते अजातशत्रू होते... विरोधीपक्षांतले लोकंही अगदी सहज मित्रत्वाचा नात्याने हट्ट करायचे -
कालच एक किस्सा वाचला... लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी वाजपेयींना एक पत्र लिहून नाराजी दर्शवली होती... कारण होतं - लोकसभेत ते भेदभाव करतात असा आरोप भाजपा खासदारांनी केला होता, त्यावर अटलजींचीही सही होती, सोमनाथ चॅटर्जी तसं करणार नाहीत, पण भाजपाची पक्षनिष्ठा जपण्यासाठी अटलजींनी सही केली हे पटवलं, आणि हसत-खेळत सोमनाथजींची नाराजी दूर केली... हेच सोमनाथ चॅटर्जी सभापती असतांना २००९ मध्ये कुठल्यातरी मतदानावेळी अटलजी सभागृहात आले तेव्हा भावूक झालेले आणि उभे राहणार होते हे साऱ्या देशाने पाहीलं...
..
संघामूळे अटलजी समजले, कळले आणि शिकवले देखील... !
..
वाजपेयींनी २००९ मध्ये राजकीय संन्यास घेतला, नंतर दिसले नाहीत,  तर पुढे २०१४ मध्ये त्यांना भारतरत्न मिळाला तेव्हाच टिव्हीवर आले... वयाची नव्वदी आणि त्यात श्रीरामाचा फोटो मागे लावून खुर्चीवर बसलेले... भारतरत्न देण्यासाठी राष्ट्रपती त्यांच्या घरी गेले...  असा सन्मान सहज मिळत नाही...! वाजपेयी खरे राष्ट्रपुरुष इथेच ठरतात... हा ऋषी पुरस्काराचा भुकेला कधीच नव्हता, आपल्या सुदैवाने त्यांना भारतरत्न हयातीत मिळालं... आणि साक्षात त्यांनी ते हाताने स्विकारलं ...
२०१४ मध्येच मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी वाजपेयींची घरी भेट घेतली, आणि बहुमतातलं भाजपा सरकार पाहून त्यांना भरुन आलेलंही जाणवलं... भाजपाचे ते संस्थापक सदस्य, आणि त्याच भाजपाने त्यांच्या हयातीत अनपेक्षित यश मिळवलं... भाजपाच्या जीवनाचं सार्थक झालं... त्यांनी पक्षाची पायाभरणी केली, त्या पक्षाच्या वाढीसाठी झटले आणि त्याच भाजपाचं यश बघण्याचंही भाग्य त्यांना जिवंतपणी लाभलं... हा निसर्गानेच त्यांचा सन्मान केलाय...!
..
वाजपेयी कवी मनाचे होते...
"स्कूल चले हम..."... ऐकलंय ?
भारत एक राष्ट्रपुरुष है ? ...
प्रखर देशभक्ती जागृत होणार... अभिमान वाटणारच !
त्यांचं हळवं मन त्यांची शक्ती होती... !
..
त्यांच्याबद्दल लिहीतांना मन भरत नाही...
ना शांत होत...
देशाची सेवा करुन आज त्यांच्या देहाचा देवाकडे प्रवास सुरु झाला...
शरीर वृद्ध झालं... आणि संपलं...
मनाने ते कधीच जाणार नाहीत !
ऋषीतूल्य माणूस गेला, आधारवड हरपला...
त्यांच्या जाण्याचं वाईट वाटतंय, ते वाटणारच...
पण त्यांची शिकवण, त्यांचा अंश सदैव प्रत्येक भारतीयांत असेल...
ते नावाप्रमाणे अटल आहेत...!
...
"भारत को लेकर मेरी एक दृष्टि है- ऐसा भारत जो भूख, भय, निरक्षरता और अभाव से मुक्त हो।"
त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवणं आपलं कर्तव्य आहे -
"मेरी कविता जंग का ऐलान है, पराजय की प्रस्तावना नहीं। वह हारे हुए सिपाही का नैराश्य-निनाद नहीं, जूझते योद्धा का जय-संकल्प है। वह निराशा का स्वर नहीं, आत्मविश्वास का जयघोष है"
यांसह !
..
ज्यांनी आमचं आयुष्य सुखी करण्याचा पाया रचला त्या राष्ट्रऋषींना भावपूर्ण श्रद्धांजली !
असा माणूस पुन्हा पुन्हा होत नाही !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved