पु. ल.

१२ जून २०००
पु. ल.
या देवाचं अवतारकार्य संपला तो दिवस...!
.
शोधीसी मानवा राऊळी मंदिरी,
नांदतो देव हा आपुल्या अंतरी...
त्याला पु. ल. तरी अपवाद कसे ठरतील...?
पुलं तुम्हाला पुण्यात रुपालीच्या पहील्या मजल्यावर तर शोधूनही सापडणार नाहीत... पु.ल. त्यांच्या पुस्तकांची पारायणं करुनही भेटणार नाही...
हा देव तुम्हाला अवतीभवती मात्र चराचरात दिसेल...
.
दातांच्या जागी छापखान्यातले खिळे बसवलेला आणि जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचे क्लासेस उघडलेय अश्या सखाराम गटणेच्या रुपात...
उघड्या तोँडाच्या पण तितक्याच प्रेमळ माणसांच्या अंतू बर्व्याच्या रुपात...
सोसायटीच्या मिटीँग्समध्ये...
मराठी शाळाशाळांत तर असंख्य चितळे मास्तर भेटतील...
रावसाहेब तर गल्लीगल्लीत - घराघरात,
घर म्हणून अख्खं गाव दाखवणाऱ्‍यांत पुलंची अनेक पात्र भेटतात...
पोष्टातल्या काऊंटरमागच्या माणसाच्या टक्कलावर केस आले की आज सुद्धा मराठी माणूस त्याची बदली झाल्याचं लगेच ओळखतो...
पहीली परदेशवारी आठवून बघा... पुलंना मिळाले तेच सल्ले आपल्यालाही मिळतात...
लग्नकार्यात येणारा नारायण हल्ली कुणाच्या मयतालाही दिसतो...
.
तुम्ही मुंबईत विरारला राहतांना अनाहूत पाहूण्यांना ठाण्याला उतरण्याचा आजही सल्ला देतात,
पुण्यात कुठल्याश्या सत्काराला गेल्यानंतर फेसबुकवर सेल्फी पोस्ट करुन सार्वजनिक पुणेकर होण्याकडे एक पाऊल टाकतात,
दिल्लीतल्या माणसाला नागपुरी संत्रीला येण्याचं आमंत्रणही देतात,
आणि नाशिककर मंडळी मात्र यात थोडे वेगळे, त्यांचं वैशिष्ठ धुळे आणि मुंबईच्या स्वभावाची सरमिसळ...!
.
पुलंची म्हैस हल्ली राजकीय म्हैस झालीय...
.
बाकी एक मात्र बरं झालं...
पुलं शरीराने लवकर गेले.
राजकारणी गटारगंगा हातातल्या मोबाईलमध्ये येण्याआधी पुलं गेले, वाचले !
या गोँधळात तुम्हाला एखादं पात्र दिसलं नसतं तर नवल ! आणि त्या पात्राच्या समर्थकांनी विरोधकांनी तुमच्यावर आपल्या सोयीचा शिक्का मारुन तुमचं अख्खं साहित्यतप एका क्षणात निकालात काढलं असतं -
पुलं कदाचित प्रतिगामी पुलं किँवा पुरोगामी पुलं या शिक्क्याने जखडले गेले असते आणि तबला वाजवतंय की मांडी खाजवतंय हे न कळणाऱ्‍या एखाद्या षिंच्यानं देखील तुम्हाला अक्कल शिकवली असती...
तुमच्याच शब्दांतून जिवंत झालेले रावसाहेब, पानवाला, अंतू बर्वा, सखाराम गटणे, चितळे मास्तर, नारायण, पोलीस, पेस्तन, रुस्तम तुमच्यावरच हसले असते !
त्यामुळे पुलं, तुम्ही तुमचं अवतारकार्य लवकर संपवलं ते बरं केलंत... !
.
पुलं शरीराने गेले -
पण,
पुलं अजरामर आहेत...
पुलं चिरंतन आहेत... !
- तेजस कुळकर्णी.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved