Kalaam and I

मी आणि कलाम
मी सहावीत असतांना कलामांची तोँडओळख झालेली. वृत्तपत्रांतून, टिव्हीवर ते राष्ट्रपती झाल्याच्या बातम्या वाचलेल्या... तेव्हा कुणीतरी विलक्षण हूषार माणूस राष्ट्रपती झाल्याचं फक्त कळत होतं. नंतर हळू हळू त्यांचं कार्य, विद्यार्थ्याँविषयीची भावना आणि विज्ञाननिष्ठता या गोष्टी समजत गेल्या. राष्ट्रपती म्हणून ते खूप चांगलं कार्य करतायेत असं ऐकू येत होतं. मध्ये मध्ये व्हिजन २०२० कानावरुन जात होतं.
.
त्याचदरम्यान "अग्निपंख" ऐकण्यात आलं... विज्ञानाची आवड, वैज्ञानिकांबद्दल कुतूहल आणि कुणी विचारलं तर सांगता यायला हवं यासाठी ते पुस्तक मिळवून वाचून काढलं... कलामांचं गारुड झालं... Kalaam and kids, And dream comes in true, Kalaam and Me वाचण्यात आलं... आणि डॉ. कलाम या माणसानं मला अक्षरश: वेड लावलं... ISRO, रामेश्वरम, मिसाईल्स, पोखरण, न्यूक्लीअर पॉवर आणि २०२० या गोष्टीँची पारायणं सुरु झाली... या विलक्षण माणसाला आयुष्यात एकदातरी भेटायची प्रबळ इच्छा निर्माण झाली.
.
ते राष्ट्रपतीपद सोडतांनाचा दोन बॅग्जबरोबरचा फोटो पाहून कलाम हे माझ्यासाठी आयडॉल पासून देवतूल्य झाले...
.
कलामांचं शक्य तितकं वाचणं, ऐकणं सुरु होतं. भेटायची इच्छा तिव्र होत होती. आणि याच दरम्यान राष्ट्रीय बालविज्ञान परीषदेचा मंच मिळाला... झपाटल्यागत जीव तोडून काम केलं... "पाणी" विषय घेऊन मी जिल्हा, विभाग, राज्य ओलांडून Zone चं अहमदाबाद गाठलं, आणि पुढची स्टेप दिल्लीतलं राष्ट्रपती भवन... पण Zone स्तरावरच्या एका मार्कासाठी दिल्ली हुकली आणि कलामांना भेटण्याचं स्वप्न आणि संधी तिथेच भंगली... देवाला भेटण्यासाठीची तपश्चर्या अपूरी होती. भेटण्याची संधी गेली, पण प्रत्यक्ष बघण्याचं भाग्य मात्र पुण्यात तीन वर्षाँपूर्वी मिळालं... तेव्हा ओल्या डोळ्यांनी तो विज्ञानऋषी बघत होतो.
.
कलामांच्या स्पर्शाने पावन झालेल्या जागांचं दर्शन घेण्यासाठी दिल्ली, ISRO, चेन्नई ते रामेश्वरम् गेलो. रामेश्वरमला कलामांच्या House of kalaam घरासमोर अक्षरश: साष्टांग दंडवत घातलेला... याच माणसानं मला विज्ञान शिकायला भाग पाडलं...
.
माझ्या आयुष्यातल्या मोजक्या प्रेरणास्त्रोतांपैकी एक खांब निखळला... लहान असतांना मनावर जादू केलेल्या जादूगारांपैकी कलाम एक होते. भावपूर्ण श्रद्धांजली हा शब्द आत्ता अपूर्ण आहे. आम्ही घडवू भारताला महासत्ता, तीच खरी श्रद्धांजली ठरेल डॉ. कलामांना.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved