Unfortunate Fact

आमचे जवळचे नातेवाईक असलेले एक आजोबा परवा देवाघरी गेले. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित आणि वेलसेटल्ड प्रकारातली. लग्न ते पोरांची मुंज वगैरे सगळे कार्यक्रम आटोपलेले... पण पोरांच्या विचित्र स्वभावामूळे त्या आजोबांचा मुक्काम गेल्या दोन वर्षाँपासून वृद्धाश्रमात होता... आणि ३ तारखेला त्यांनी तिथेच आवरलं !! वृद्धाश्रम मॅनेजमेँटनं त्यांच्या मुलांना आणि इमरजन्सी कॉन्टॅक्ट म्हणून आम्हालाही कळवलं....
.
अंत्ययात्रा तशी नाहीच... चार पाच फोन केल्यानंतर दोघांपैकी एक मुलगा आला... "मरेपर्यँत म्हाताऱ्‍याचं तोँडही बघणार नाही" अशी प्रतिज्ञा असल्यानं दुसऱ्‍यानं बहिष्कार घातला...! तासाभरातच सगळं आटोपलं... पण नंतर ऑफीस स्टाफ आणि नातेवाईँकासमोर "पितृऋण" फेडण्यासाठी म्हणून दोघांनी लाख रुपयांचं श्राद्ध घालायचं ठरवलंय... १३-१४ तारखेला श्राद्धसोहळ्यानिमित्त शाही भोजन वगैरे ठेवलंय... ज्याचं श्राद्ध आहे तो माणूस मात्र एकटाच, उपाशीपोटीच तडफडून मेला
.
आईबापाला जिवंतपणी पाणीही न पाजणारे पितृपक्षात त्यांच्यानावे शंभर लोकांना जेवण घालतात... तो माणूस उपाशी तडफडतच जातो.... मेल्यानंतरचं खाणं वगैरे सगळं खोटं. पितृपक्षातलं तर्पण भितीपोटी आणि खीर वगैरे आपले जिभेचे चोचले असतात.
.
त्यापेक्षा जिवंतपणीच "प्रेमानं" जे हवं ते खायला घाला. सगळे ऋण इथंच प्रत्यक्ष्यात फेडा... नंतर पितृपक्षात कितीही मोठं श्राद्ध घातलं तरीही तिथे शंभर "लोकं" पोटभर जेवतात आणि तो आत्मा मात्र हताशपणे ते बघत चिरकाळ उपाशीच राहतो...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved