पुढच्या वर्षी लवकर या !

"गणपती अपने गांव चले"... नामक एक व्हिडीओ इतक्यात सरकला डोळ्यासमोरून ! त्यात साधारण साडेअठ्ठावीसीतला एखाद्या प्रायवेट फर्ममध्ये लेखापाल म्हणून काम करणाऱ्या मुलासारखा दिसणारा मुलगा, त्याची माssजी टाईप आई, घरोब्याचे संबंध असलेले शेजारचे कुटूंबवत्सल काका, त्यांची लहान मुलं वगैरे जोरजोरात रडत गणपतीची आरती करत होते...
.
गणपती अपने गांव चले... कैसे न हमको चैन पडेच्या पॅच मध्ये गणपतीकडे बघत हमसून हमसून, जोरजोरात रडणाऱ्या इतरांना काका आपला हुंदका दाबत धीर देतात... पुढे येतात... त्या लेखापालसारख्या दिसणाऱ्या नायकाच्या खांद्यावर हात ठेवतात... "चलो" चा इशारा करतात... तोच माsssजी नही नही करत अजून जोरजोरात रडतात... तो साडेअठ्ठावीस परत हुंदके देत गणपतीच्या अंगावरचे फुल हार वगैरे उतरवतो... त्या माsssजी ते हार जवळ धरुन अजून रडतात... पहिलं कडवं संपलं...
.
दुसऱ्या कडव्यात - माsssजी आणि साडेअठ्ठावीस एकमेकांना धरून परत  रडतात ! काका परत खांद्यावर हात ठेवतात... साडेअठ्ठावीस गणपतीची मुर्ती उचलतो... माsssजी त्या गणपतीबाप्पाच्या मुर्तीला जवळ घेऊन मुके वगैरे घेतात... काका वगैरे मंडळी परत ढसाढसा... साडेअठ्ठावीसला आवरायला चार लोकं लागतात... आता ते दाराकडे निघतात...
.
साडेअठ्ठावीस, कुटूंबवत्सल, एक दोन लहानगे एकमेकांना सावरत गणपती घेऊन निघतात... इकडे कुटूंबवत्सल काकूंच्या खांद्यावर डोकं ठेवून एकमेकांत रडणाऱ्या माsssजी परत धावत दाराजवळ येतात आणि परत गणपतीबाप्पाच्या मुर्तीला जवळ घेऊन मुके वगैरे घेतात... आता साडेअठ्ठावीस खंबीर होतो आणि गाणं संपता संपता फायनली गणपतीबाप्पाला घेऊन निघतो... गाण्याच्या तिहाईत माsssजी आणि इतर लेडीज रिकामं मखर बघून मोठमोठ्याने रडत असतात... पाठमोरा साडेअठ्ठावीस गणपती बाप्पा घेवून जातांना दिसतो ! आणि संपतं !
.
देवाच्या सोहळ्याचा आनंद घेणं दुर, इमोशनल मेलोड्रामा वैताग आणतो... रुखरुख वाटणं ठीक, पण अभद्र्यासारखं रडणं वगैरे जरा अति होतं... लहान मुलांची ही प्रतिक्रीया समजू शकतो, पण मोठे पण ! गणपती विसर्जन हा एक सोहळा आहे, त्याचा आनंद घ्या... नाचा... मज्जा करा... गळे काढत रडत काय बसायचं ?  देवाला "देव" म्हणूनच बघा राजे हो ! लहान बाळ वगैरे म्हणून नको - तो आपला बाप असतो ! याद रखीयो... !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved