महालया
.
एकवेळ दैवी अस्तित्व नाकारेन, पण मृतात्मे, पितृ, मृत्यूपश्चात असलेलं जग यांवर माझा ठाम विश्वास आहे. माणसाचा मृत्यू हा फक्त शरीराने होतो, तिथे त्याचं केवळ भौतीक अस्तित्व संपतं, पण ती व्यक्ती आत्मरूपाने (पितृरुपाने) सदैव आपल्या आसपासच असते. मी या गोष्टीवर १०० टक्के विश्वास ठेवतो. आपला आत्मा ही एक शक्ती आहे. आणि The Law of Energy, states that energy can neither be created nor destroyed; energy can only be transferred or changed from one form to another. शक्ती निर्माण होत नाही, नष्ट होत नाही. ती फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात जाते. माणसाच्या मृत्यूनंतर शरीर संपतं, आत्मा जिवंत असतो. त्यामुळे मृत्यूपश्चात पितृविश्व आहे. भूत, आत्मा वगैरे गोष्टी सत्यात आहेत ! त्या आत्म्यांनाही तहान- भूक, इच्छा आहेत... आणि त्या इच्छा पूर्ण करण्याची अपेक्षा ते त्यांच्या वंशजांकडून ठेवतात. आपण खूप भूक लागल्यावर खायला मिळत नाही तोपर्यंत चवताळतो तसं या आत्म्यांच्याही या इच्छा तिव्र होतात आणि ते याची जाणीव वंशजांना करुन देतात. "पितृदोष" म्हणतात तो हाच ! एकवेळ देवाच्या पूजेला टाळाटाळ चालेल, पण श्राद्ध-कर्म व्यवस्थित व्हायला हवं !
.
पितृपक्ष म्हणजे या मृतात्म्यांची दिवाळी ! वर्षभराची भूक-तहान ते याच पंधरा दिवसात भागवतात. आणि त्यांना ते खाद्य विधिवत पोहचते करणं ही आपली जबाबदारी आहे. तर्पणाचा विधी बघितलाय कां व्यवस्थित ? गूढ, रहस्यमयी आणि अर्थपूर्ण ! आधी सव्य करुन कूळ देवांना आवाहन करतात ! देवांचा वाटा देवांना देतात. नंतर ऋषींना, म्हणजे पूर्वजांतले मूळपूरुष बोलावतात. त्यांना तृप्त करतात. आणि शेवटी अपसव्य करुन मातृवंशातले, पितृवंशातले एक एक मृतात्मे आवाहन करतात, त्यांची पूजा करतात. त्यांना कावळ्याच्या माध्यमातून जेवायला बोलावतात. अग्नीच्या माध्यमातून त्यांची भूक भागवतात. काकस्पर्श होतो. त्र्यंबकेश्वरला त्रिपींडी श्राद्ध करतात. ते पण याच अर्थाचं असतं. या विधींना जबरदस्त अर्थ आहे. प्रत्येक विधीमागे सत्यशास्त्र दडलंय !
.
महालयापक्षात कंटाळा न करता आपल्या पूर्वजांचे यथाशक्ती श्राद्ध कराच. त्यांच्याविषयी आपले ऋण, कर्तव्य असतात. ते पूर्ण करायला हवे. पितृदोष हा अनेक व्याधींचा मूळ असतो. तो केवळ श्राद्ध केल्यानेच दूर होतो. महालयापक्ष अशूभ समजला जातो. पण खरं तर हाच काळ जास्त सकारात्मक असतो. कारण मृत झालेले आपले पूर्वज या काळात सक्रीय असतात. ते एका अपेक्षेने येतात, ती अपेक्षा पूर्ण झाली की भरल्या मनाने, तृप्त मनाने आशिर्वाद देऊन स्वस्थानी जातात. आणि तेच त्यांना उपाशी ठेवलं तर तळतळत आपल्या तहान भूकेची जाणीव करुन देतात. ऋण व्यक्त करायचा आणि मानसिक शांती मिळवण्याचा हा पितृपक्ष असतो.
.
कितीही अंधश्रद्धा बोंबला, ही गोष्ट आहे - मानो या ना मानो ! विश्वास ठेवावा लागेल. एकतर आत्ता किंवा स्वतः मेल्यावर !
- तेजस कुळकर्णी