मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग १
दैवी म्हणाल तर माझी गजानन महाराजांवर प्रचंड - infinite - आभाळाएवढी श्रद्धा आहे... कितीही मोठे प्रश्न असू देत ज्यांच्यापुढे गेल्यावर माझं अंतर्मन खऱ्या अर्थानं शांत होतं, शक्ती मिळते... त्यांचं मंदिर माझं घर असल्यासारखं वाटतं, ते प्रश्न मनात घेऊन त्यांच्यासमोर जातांना कधीच रिकाम्या हातानं परत येणार नाही हा विश्वास असतो. माझं सगळं काम त्यांच्यावर विश्वास ठेवूनच करतो, गजानन महाराज जळी स्थळी काष्टी पाषाणी सदैव माझ्या सोबत असतात... त्यांचं माझ्यावर पूर्ण लक्ष असतं याची जाणीव असते. कधी जर माझ्या मनातली नकारात्मकता वरचढ होत असेल तर महाराज त्यांचं अस्तित्व तिथे दाखवतात... दर्शन देतात - ते माझ्या सोबत असल्याची जाणीव करुन देतात... कधी प्रेमाने, चुकलं तर तडाखा देऊन, कधी कुठल्या ना कुठल्या रुपानं दर्शन देऊन... त्यांनी बोलावलं तर क्षणाचीही विसंब न घेता शेगांवला जायची ओढ लागते, कधी ती ओढ समजून घेत ते स्वतः बोलावणं पाठवतात... "अशक्य ही शक्य करतील स्वामी" या उक्तीचा ते प्रत्यय देतात... अशीच एक अनुभूती काल मिळाली, "मी आहे ना" त्यांनी ही जाणीव करुन दिली... एकदा नव्हे - अनेकदा... ! कधी समजलं, कधी समजलं नाही. पण जाणवलं हे नक्की... त्या अद्भूत, मातृतूल्य अनुभूती इथून पुढे सात भाग - दत्तजयंतीपर्यंत मांडणार आहे...
..
माझा पूर्ण व्यवसाय, आयुष्य हे महाराजांनी दिलेला आशिर्वाद आहे... कुठल्याही प्रसंगात आधी ते आठवतात... कालची गोष्ट, शेगांवला जाऊन एक - दिड महिना झाला... आणि त्यानंतर व्यवसायात काही मोठ्या उड्या घ्यायच्या होत्या. टेंशन आलेलं. "महाराज तुम्ही आहात नां ?" मनात चलबिचल आणि येस - नो मध्ये असतांना संध्याकाळी ओळखीतले एक काका काकू घरी आले... घरात समोरच महाराजांचा मोठ्ठा फोटो लावलेला. विषयामागून विषय निघाले, आणि त्यांनी महाराजांचे त्यांना आलेले अनुभव सांगितले... शेवटचं वाक्य होतं... "ते कधीच एकटं सोडत नाही, आपल्यावर त्यांचं लक्ष असतंच..." - "महाराज तुम्ही आहात नां ?"... याची अनुभूती लग्गेच मिळाली... आणि काहीतरी सापडावं तसं थंडगार झुळूक डोक्यातून गेली... एक मिनिटात त्यांनी मला जाणीव करून दिली... आता त्या कामात अडथळा, अपयश हे दूरदूरपर्यंतही फिरकणार नाही... !
..
विश्वासांती अनुभूती... अनुभूतीपुढे साक्षात्कार ! ...
त्यांच्यावर सोपवलं की अडथळे दूर होतात, प्रत्यय येतात...!