मराठी राजभाषा दिन २०२०

#मराठीराजभाषादिन
...
= मी आणि माझी मराठी =
...
 "मराठी" - स्वरुप, लिपी एक असली तरीही मराठी माझी वेगळी - तुमची वेगळी आहे - प्रत्येकासाठी ती त्याची त्याची असते... आईचं जागतिक महत्व, स्वरुप जरी एक असलं तरीही आपली आई - आपलीच आई असते... आपल्यासाठीच असते... मराठीचंही तसंच आहे... भाषा प्रत्येकासाठी वेगळ्या रुपात असते, स्वरूप एक, लिपी एक पण भाषा मात्र प्रत्येकाची वेगळी असते... प्रत्येकाला उमगलेली वेगळी असते, भेटलेली वेगळी असते... आपली आपली असते...!
...
हे माझ्या मराठीविषयी...!
...
माझ्या आई-पप्पांनी माझ्या आयुष्यातला पहीला उत्तम निर्णय कोणता घेतला असेल ? - तर मला मराठी शाळेत घालणं... मराठी शाळेत जे मराठी वळण लागलं, ते इतर कुठेही लागलं नसतं. लहानपणी मराठीतून लिहीणं - वाचणं शिकल्याने न आणि ण, ळ आणि ल, श आणि ष, जगातला ज आणि जनावरातला ज यांतला फरक कळल्याने उच्चार स्पष्ट झाले, आणि त्यामूळेच कदाचित गाणंही जमलं...
मराठीतूनच शब्दाचा योग्य अर्थासहित उच्चार होतो, आणि समोरच्यापर्यंत पोहचतो.
.
मातृभाषा कशाला म्हणतात ?
जी आपल्या मनाची भाषा असते... आणि मनाची भाषा असल्यानेच तिला आईचा दर्जा आहे...
ठेच लागली तर आपण "ओहह मॉम" म्हणत नाही - आई गं असंच म्हणतो... आपलं मन मातृभाषेतच विचार करतं... 
कितीही ठरवा - कितीही प्रयन्त करा - कुठल्याही गोष्टीला येणारी पहिली प्रतिक्रीया मनात मराठीतूनच येणार... इंग्रजी-हिंदीतून नाही... अर्थात मराठी तुमची मातृभाषा असेल तरच ! 
...
प्रांतानुसार भाषेची ठेवण बदलते -
ती प्रत्येक ठेवण प्रचंड गोड आहे... ऐकत रहावी अशी - आपली वाटणारी...! 
माझ्या नशिबाने मला ४ वेगवेगळ्या प्रांतातली मराठी जगण्याची संधी मिळालीय... ज्यामूळे भाषेची सरमिसळ होवून वेगळीच मराठी तोंडात बसलीय... अर्थात प्रांतानुसार ती तशीच येते. जन्म-बालपण धुळ्यात त्यामूळे खान्देशी-आहिराणीचा स्पर्श असलेली शहरी मराठी, बायको मराठवाड्यातली - त्यामूळे परभणी-सेलूची हिंदोळे घेत बोलण्याची मराठी, पुण्यातली सदाशिवपेठी मानबिंदू मराठी तसंच पुण्यातल्या पश्चिम उपनगरांतली रांगडी मराठी, आणि मुंबईतली हळूवार मराठी... समृद्ध वाटतं...!
सोप्पं उदाहरण सांगतो - 
"मी मराठीत लिहीतोय"... हे वाक्य 
धुळ्यात असलो तर - मी लिहू ऱ्हायलो...
सेलूत - मी लिहायलो
पुण्यात - मी मराठीत लिहीत आहे...
पुण्यातल्या उपनगरांत - मीलिहतोय 
मुंबईत - मी लिहीतोय मराठीत...
अस्संच येणार.
...
मातृभाषा असली तरीही मराठी फक्त बोलण्याची नसून लिहीण्याची सुद्धा आहे, प्रसंगी ऐकवण्याची सुद्धा आहे... याचा साक्षात्कार चौथीत असतांना झाला... जे थोडंफार लिहीतो - बोलतो त्याचं श्रेय त्या दिवसाला द्यावं असा एक दिवस उजाडला ... वर्गशिक्षिकांनी निबंधाच्या वह्या दिल्या, लिहून आणायला सांगितलं... आणलं - 
दुसऱ्या दिवशी प्रत्येकाची वही घेवून जाहीर मापं काढण्याचा कार्यक्रम होत होता... वर्गात हुशार म्हणवणारी पोरं त्या कार्यक्रमात धारातिर्थी पडलेली, त्यामूळे माझा नंबर येत येत धडधड सुसाट झाली - नंबर आला, पुढ्यात जे येईल ते खायचं म्हणत हिय्या करुन समोर गेलो... आणि मिर्ची ऐवजी रशोगुल्ले मिळाले - कौतूक झालं... अक्षराचं ...! मग तिथून पुढे वर्षभर निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा असली की माझी वारी असायची... आपसूक वाचन वाढलं - रथी-महारथी पुस्तकांतून भेटले... आधी गोडी मग सवय लागली आणि मराठी नव्याने ओळखीची झाली... पुढे नाटकांतून कामं करतांना मराठीचं वेगळेपण, ऱ्हस्व दिर्घ उच्चार, शब्दांची गंमत यांनी गारुड केलं... जितकं वाचलं, अभ्यासलं, अंगिकारलं तितकं कमी वाटू लागलं...!
...
मराठीचं मनातलं श्रेष्ठत्व प्रखर झालं ते फेसबूकवर आल्यानंतर ... खरं तर स्वार्थातून !
एखाद्या गोष्टीसाठी व्यक्त होतांना इंग्रजीचा अख्खा ग्रंथ लिहीला तरीही कुणी ढुंकूनही पाहत नव्हतं... आपण लिहीलेलं कुणीतरी वाचावं, प्रतिक्रीया द्यावी हेच हवं असतं ना ? मग हळू हळू मराठीतून व्यक्त होणं सुरु केलं... तिथे मराठी नव्याने उमगली... आपण जे लिहीतोय ते वाचतांना समोरच्या माणसाला समोर बसून बोलतोय असं वाटायला हवं, अलंकारिक, बोजड शब्द नको, कंटाळवाणं नको - असं सुधारत सुधारत इथपर्यंत येणं जमलंय... मग हातात खऱ्या अर्थाने अवतरली माझी माय मराठी...! मला आता व्यक्त होतांना माझ्या मनातले एकुण एक भाव अक्षरं होवून उतरतात असं वाटतं... आपलं पुर्ण ऐकून घेतल्यावर वाटतं ते समाधान...!
...
मराठीचा विकास वर्षानुवर्षे होत गेलाय...
मला निटसं सांगता येणार नाही, पण महानुभाव पंथाच्या अकराव्या शतकातील म्हाइंभट-कान्होपात्रा यांच्यातील संवाद मराठीतून आहेत, ज्ञानेश्वरी आणि गुरुचरीत्र यांतील प्राकृत मराठी, संत रामदासांचे समास हे मराठीचं समृद्धत्व सिद्ध करतात... वाचतांना ऐकतांना लय लागते... मराठी अभिजात यासाठीच आहे... हिमालयाऐवढ्या चार राशी इतकं व्याकरण - तितकंच वर्षानुवर्ष शतकोंशतके निर्माण झालेलं साहित्य मराठीची संपत्ती आहे... आपण त्यातून कदाचित पुर्ण आयुष्यभर ओंजळभरच घेवू शकतो... एका लेखात मराठीविषयी काय आणि किती लिहीणार ? 
मराठी अभिजात आहे ! 
...
असो,
आपल्यातली आपली मराठी आधिक समृद्ध होत जावो, मराठीतलं प्रचंड वाङमय, साहित्य, रचना आपल्याला वाचावयास मिळो - त्या वाङमयरुपी हिमालयात एक मूठ आपल्याही साहित्याचा पडो, मराठी पद्य, गाणी, दर्जेदार नाटकं यांचा लाभ आपणास मिळो आणि आपलं मराठी - आपली मातृभाषा आधिक बहरत जावो या सदिच्छांसह,
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ....!
..
तेजस कुळकर्णी 
(फेसबुक वरील समुह कुबेर वर प्रकाशित माझा लेख)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved