भगवद्गीता !
आज गीता जयंती ...!
..
भगवद्गीता... या अद्भूत ग्रंथाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे... माझ्या हॅन्ड बॅगमध्येच भगवद्गीतेचं मराठी - इंग्रजी अर्थासहीत असलेलं पुस्तक कायम असतं. रोज क्रमाने किमान ५ श्लोक आणि त्याचा अर्थ मराठी, इंग्रजीतून वाचण्याची, समजून घेण्याची सवय लागलीय, आणि आता सहा - सात वर्षांनी भगवद्गीतेने माझ्या मनावर आणि विचारांवर जबरदस्त पकड घेतल्याचंही जाणवतंय... प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेच्या अधीन राहूनच सापडणार हे मनावर पक्कं ठसलंय !
..
गीता म्हणजे कर्मकांड नाही, तर शास्त्रशुद्ध शास्त्र (Science) आहे... तुम्ही त्याचं पारायण करुन चमत्काराची अपेक्षा कराल तर हाती काहीच लागणार नाही, गीता समजण्याची - अभ्यासण्याची आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, आणि अंतिम सत्य शांतपणे समजावून देण्याची ताकद गीतेत आहे... गीतेतला प्रत्येक श्लोक दरवेळी नव्या अर्थासह समोर येतो...
..
कृष्णाचं देवत्व कुठाय ?
ते आहे भगवद्गीतेतल्या अठरा अध्यायात - सातशे श्लोकांत... ! कुरुक्षेत्रावर अर्जुनाला विश्वरुपदर्शन घडलं तिथेच "देव कृष्ण" जन्माला आला, भगवद्गीतेच्या रुपानं विश्वगुरु झाला आणि स्वस्थानी गेला... विश्वाला ज्ञान देण्यासाठी कृष्णाचा गोकूळ ते द्वारका हा प्रवास घडला...
श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या शब्दाशब्दात आहे... त्या ज्ञानाचा अवलंब करू शकणाऱ्या प्रत्येक माणसात आहे...
बुद्धीर्बुुद्धीमतामस्मि तेजस्तेजस्वीनामहं...
"मी बुद्धीमानांची बुद्धी आणि तेजस्वी लोकांचं तेज आहे.."
भगवद्गीतेच्या अक्षरांत कृष्ण भेटतो... त्याच्या अर्थात कृष्ण भेटतो... !
...
समोर प्रश्न उभा झाल्यानंतर आपण त्याला सोडवण्यात गुंतत जातो - आणि आहे ते कठीण करतो...
भगवद्गीता त्या प्रश्नाला सरळ उत्तर देते...!
...
१८ अध्याय - ७०० श्लोक
भय, शोक, मनस्ताप, निती, राज्य, सत्य, कर्म, ज्ञान, आत्मा यांवर विजय मिळवतात... ब्रह्मज्ञान याच १८ अध्यायांत आहे...! पाराशर ऋषींसमोर ब्रह्मदेवांनी ४ वेदांच्या ज्ञानाचे महामेरु उभे केले, आणि त्यातल्या प्रत्येकातलं फक्त एक मूठ ज्ञान ग्रहण करायला सांगितलं... जे चार वेद आपण बघतो ते, त्यासाठी पाराशर ऋषींना अनेक जन्म घ्यावे लागले...! ते महामेरू ज्ञान केवळ कृष्णाला होतं, आणि तेच गीतेच्या १८ अध्यायांत आहे... सरळ भाषेत.
यातला प्रत्येक शब्द वेदस्वरुप आहे...!
अर्जुनविषादयोग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यासयोग, कर्मसंन्यासयोग, आत्मसंयमयोग, ज्ञानविज्ञानयोग, अक्षरब्रह्मयोग, राजविद्याराजगुह्ययोग, विभूतीयोग, विश्वरुपदर्शन योग, भक्तीयोग, क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग, गुणत्रय योग, पुरुषोत्तम योग, दैवासूरसंपद्विभागयोग, श्रद्धात्रयविभाग योग आणि मोक्षसंन्यास योग या १८ अध्यायांत वेदस्वरूप ज्ञान आहे...
...
कुणीतरी शांतपणे आपला प्रश्न ऐकतंय, आणि त्याचं उत्तर तितक्याच शांततेत समजावतंय - हा फिल भगवद्गीतेतून येतो... इथे कुणीतरी म्हणजे साक्षात परमात्मा... ! उत्पत्ती - स्थिती - लय हे त्याठीकाणीच आहे, याचीच जाणीव होते.
...
गीता आपल्याला आत्मनिर्भर बनवते,
आपला आत्मविश्वास वाढवते आणि आपली स्वतःची शक्ती निर्माण करते... गीता हे प्रत्येक ज्ञानाचं मूळस्वरूप आहे...
"द सिक्रेट" - माहितीय कां ?
गीता तेच सांगते ! विस्तृत स्वरुपात.
...
गीता "मी" स्वरुपाशी ओळख करुन देते !
गीता अंतरात्म्याला जागृत करते,
आणि त्या अंतरात्म्यात असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन घडवते !
म्हणूनच, गीता म्हणजे कर्मकांड - मंत्रतंत्र नव्हे, त्याचं पारायण नाही -
तर अभ्यास करुन, अंगिकारण्यासाठी गीता आहे !
आणि ती अभ्यासण्यासाठी प्रवास केलेला रस्ता पावलोपावली नवीनच वाटेल, पण शेवट मात्र "परमात्मा हेच अंतीम सत्य आहे" यांवरच होईल..!
..
- तेजस कुळकर्णी