गुरुचरीत्र
गुरुचरीत्र !
...
नृसिंह सरस्वतींचे समकालीन शिष्य सिद्धमूनी, आणि त्यांचे शिष्य नामधारक (जे नृसिंह सरस्वतींच्या दुसऱ्या समकालीन शिष्यांपैकी एक आहे, सायंदेव - यांचे वंशज) यांतील अद्भूत संवाद म्हणजे गुरुचरीत्र !
...
नामधारक शिष्य सिद्धांना गुरुंबद्दल विचारतात, आणि सिद्ध नृसिंह सरस्वतींचा अवतार, कार्य, त्यावेळी घडलेल्या घटना - ज्या सिद्धांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलेल्या असतात - त्या, एक एक करत सांगतात...!
पुढे नामधारकांना गुरुचरीत्र लिहीण्याची आज्ञा करतात...!
...
सिद्ध - नामधारक संवाद नामधारकांनी गुरुचरीत्राच्या ग्रंथरुपाने बावन्न अध्यायांत, आणि प्राकृत मराठी भाषेत सुरेख बांधलाय !... त्यात काही ठिकाणी संस्कृत, कानडी श्लोकही आहेत. मूळ गुरुचरीत्र ग्रंथ १७००० ते १९००० ओव्यांचा असल्याचं म्हणतात, आणि कालांतराने त्याचा सारांश येत सात हजार तिनशे पंच्याऐंशी ओव्यांचं गुरुचरीत्र आज प्रचलित आहे.
...
गुरुचरीत्रात पहील्या अध्यांयांत गुरुवंदना, अनुसया-अत्री ऋषींकडे दत्तजन्म, मग प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे महिमान आहे. पण ते पहिल्या १० अध्यांयांतच. सिद्ध द्वितीय अवतार नृसिंह सरस्वतींच्या सहवासात असल्याने त्यांचेच चरीत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र दुसऱ्या ग्रंथात आहे. जो मूळ संस्कृत, आणि पारायणासाठी प्राकृत मराठीत मिळतो. १० अध्यांयांत वेदांची निर्मिती, सृष्टी निर्मिती, गोकर्ण महीमा आहे. त्यानंतर ११ व्या अध्यायांत कारंजात नृसिंह सरस्वतीचा जन्म होतो, त्याची कथा आहे. ... ५२ अध्यायापर्यंत त्यांचे कार्य, उपदेश हे वेगवेगळ्या घटनांतून सांगितले आहे... काशी महिमा, श्रीशैल महिमा, गाणगापूर संगम महिमा, अनंतव्रत, गुरुभक्ती, रुद्राक्षमहिमा, भस्ममहिमा, विप्रआचरण उपदेश दिला आहे...! ५३ वा अध्याय - अवतरणीका, हा मूळ गुरुचरीत्रात नसावा. तो मागाहून घातलेला वाटतो.
...
ब्रह्मा-विष्णू-महेश माहूरला अनूसयेकडे बालके होतात, त्यापैकी विष्णू दत्त होतात, ब्रह्मा चंद्र होतात आणि शंकर दुर्वास होतात...! दत्त महाराज नंतर पिठापूरात श्रीपाद श्री वल्लभ रुपाने अवतार घेतात, तिथे कार्य पुर्ण झाले की लौकीकार्थाने गुप्त होवून विदर्भातील कारंजाला नृसिंह सरस्वती रुपाने अवतार घेतात. पुढे नृसिंह सरस्वती श्रीशैल पाताळगंगेतून कर्दळीवनात लौकीकार्थाने गुप्त होतात. पण गाणगापूरात निर्गुण पादुकांच्या रुपाने आहेतच...! दत्त महाराजांची माहूर, गिरनार, काशी ही स्थाने आहेत. पुढे यथा अवतार, तथा स्थान झाले...! जसे पीठापूर, कारंजा, गाणगापूर, श्रीशैल्यम, नृसिंहवाडी...! आणि बहूतांश स्थाने ही त्यांच्या प्रमुख शिष्यांची, पुढील अंशात्मक अवताराची किंवा कार्याची आहेत, जसे कडगंजी, बासर, माणिकनगर, अक्कलकोट, कर्दळीवन वगैरे... !
...
टेंभे स्वामी महाराज - वासुदेवानंद सरस्वती यांनी ही दत्तस्थाने प्रकाशात आणली. दत्तसंप्रदायात प्रचलित करुणात्रिपदी, घोरातकष्टातस्त्रोत्र, दत्त जयलाभ स्त्रोत्र, दत्तबीजमाला मंत्र हे वासुदेवानंद सरस्वतींनीच रचलंय !
...
गुरुचरीत्राचं पारायण संयम शिकवणारं, प्रचंड मनःशांती देणारं आहे...! आधार वाटतो... मनाशी एकरूपता येते... ! भवसागरातील आपली नौका पार लावण्यासाठी साक्षात दत्तप्रभू बळ देतात... त्यांच्या सानिध्यांत असतांना ते कधीच कोसळू देत नाही... अनूभूती मिळतेच !
...
फोटोत दिसतंय ती गुरुचरीत्राची मूळ प्रत.
नामधारकांनी लिहीलेली... हस्तलिखीत ! कर्नाटकात कडगंजीला दत्तप्रभूंचं मंदीर आहे, तिथे पितळी पेटीत ठेवलीय !
#दत्तजयंती #दत्तमहाराज #गुरुचरीत्र
- तेजस कुळकर्णी