Rahul Dravid

अंडर१९ च्या विजयाचा शिल्पकार राहूल द्रविड.. दरवेळी ठरवतो, या माणसाबद्दल लिहूयात कधीतरी, पण कौतूक आणि श्रेय एखाद्याच्या नशीबात असावं लागतं - राहूल द्रविडचं नशीब याबाबतीत दोन नव्हे तर तब्बल चार पावलं पुढे असावं... ! द वॉल राहूल द्रविड... कितीही चांगलं केलं तरी श्रेय, कौतूक या माणसापासून दूरच राहील्या.. समोरच्या टिममध्ये बॉलर्स याच्या चिकटपणाला मनात शिव्या घालू देत, पण माणूस म्हणून हा देवमाणूस आहे... शांत... संयमी. योग्य निर्णय घेणारा. !
..
२००७ ला वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशनी हरवल्यावर हा कोण ठोंब्या आणून बसवलाय कॅप्टन म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रीया देशाची उमटली होती... सगळीकडून शिव्याशाप खातांनाही तो शांत होता... अबकी बार... म्हणत हारला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा त्याने मोट बांधली... जायला सांगितलं, उमगलं तेव्हा धोनीच्या हाती धुरा देऊन शांतपणे निघाला.. त्याने कधी स्वतःला क्रिकेटचा देव म्हणलं नाही, ना अवार्डस् करता याचक झालेला दिसला... निवृत्तीनंतर तो एक दोनदा दिसला, पण चर्चेत आला नाही... एकदा डॉक्टरेट नाकारतांना, एकदा रांगेत उभा असलेला... ! त्याच्यात टॅलेंट आहे, स्कील्स आहेत... डोळ्याचं पारणं फिटावं अश्या नजाकतीचे शॉट्स तो खेळायचा, तगड्या बॉलर्ससमोर चिकटपणे उभा रहायचा... फास्ट क्रिकेट मध्ये ते टिकले नाही इतकंच... तो जितकं खेळला तितकं प्रामाणिकपणे खेळला... कुठलाही आक्रस्ताळपणा नाही - शिव्या देणं नाही... जंटलमन गेम खेळायचा. हाच जंटलमन गेम त्याला टेन थाऊज्झन्टस् क्लब पर्यंत घेऊन गेला... ते खेळला आणि सन्मानानं बाहेर पडला... भारतीय क्रिकेटला खूप काही देवूनच... श्रेयाची चिंता न करता.
..
आजपण, यू१९ चा चौथा वर्ल्ड कप भारतानं जिंकला... त्या लहान लहान पोरांना घडवणं, खेळवणं वाटतं तितकं सोपं नाही. या माणसानं ते लिलया पेललं... जिंकला... आणि औटघटकीचा कौतूक सोहळा संपवून पुढच्या वर्ल्डकपकरता पुन्हा सज्ज झाला... अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नसतात... !
.. !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved