श्रावण बाळ

श्रावण बाळ
कालची रात्रीचीच घटना....
आमच्या घराजवळ एक रुग्णालय आहे. एक आई आणि मुलगा त्या रुग्णालयातून बाहेर आले. मुलगा मध्यमवयीन, अगदी बारीक, अशक्त वाटावा असाच त्याचा चेहरा होता. आई तशी वयस्कर आणि ती ही बारीकच. नुकताच चांगला पाऊस पडून गेला होता त्यामुळे त्या रुग्णालयाच्या बाहेर पाणी जमलं होतं. ते दोघे बाहेर आले, मुलाच्या हातात कुठलेतरी कागद होते.
बाहेर आल्या आल्या ती आई थोडी घाबरली आणि एका जागी एकदम थांबली.
तसा मुलगा म्हणाला, थांब आपण हळूहळू जाऊ. माझा हात धर.
तिने मुलाचा दंड धरला आणि लहान मूल कशी छोटी छोटी पावलं टाकत दुडूदुडू चालतं, तशी हळूहळू मुलाबरोबर जायला लागली. पाच सहा पावलंच ती दोघं पुढे आली असतील तेवढ्यात खाली रस्त्यावर पाणी साचलेलं त्या आईला दिसलं. ती परत एकदा थबकल्यासारखी थांबली.
जोराचा पाऊस येऊन गेल्यावर जसं पाणी साचतं, तसंच आणि तेवढंच पाणी तिथे होतं पण ते पाणी पार करणंही त्या आईसाठी कठीण होतं.
मुलगा म्हणाला, काही नाही होणार. माझा दंड असाच घट्ट धर, आपण हळूहळू जाऊयात.
आईने मुलाचा दंड तर धरला होताच पण पाय पुढे टाकता येईना.
हे पाहिलं आणि मी भराभरा पुढे गेले. विचार केला, त्या आईंचा दुसरा हात धरावा. त्यांच्या मुलालाही जरा मदत होईल.
मी तिथे पोहोचलेच आणि तेवढ्यात त्या अशक्त दिसणाऱ्या मुलाने आपल्या आईला उचलून घेतलं. उचलताना ती आई, अरे अरे उचलतोस काय असं काहीतरी बोलत होती. आईला संकोच वाटत असावा किंवा आपल्या मुलाची कुठे कंबर बिंबर लचकेल असं काहीतरी वाटलं असावं. मी ऑ..... करत तिथेच स्तब्ध झाले. रस्त्यावरची वाहनं सिग्नल नसूनही जागच्या जागी थांबली. रस्त्यावरची लोकं ते दृश्य बघत तिथल्या तिथे उभी राहिली. एखाद्या चित्रपटाचं चित्रीकरण बघण्यासाठी कशी लोकं जमतील तसे बघे तिथे दिसायला लागले.
मी माझा ऑ.... लगेच आवरत त्या दोघांच्या मागून हळूहळू जायला लागले. म्हटलं, गरज भासली तर मदत करू...
रस्ता मोठा होता आणि पाणी पूर्ण रस्त्यावर साचलेलं नव्हतं पण तरीही त्या मुलाने आईला दुभाजकापर्यंत उचलून नेलं. दुभाजक आल्यावर त्याने हळूच आईला खाली उतरवलं. आईच्या एका डोळ्यात गंगा आणि दुसऱ्या डोळ्यात यमुना अवतरली होती. एका भाबड्या सश्रद्ध वारकऱ्याला विठू माऊलीचं दर्शन झाल्यावर, हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतर एखाद्या ऋषीमुनींना त्यांच्या ईष्टने दर्शन दिल्यावर त्या मुनींचा चेहरा कसा असेल तसा त्या आईचा चेहरा होता. मुलाला एवढा त्रास झाला ही व्यथा आणि त्याच वेळी मुलाची काळजी, आणि आज आपल्याला आपल्या मुलात साक्षात श्रावण बाळाने दर्शन दिले याची कृतकृत्यता होती त्या आईच्या चेहऱ्यावर....!
मी मागेच होते हे बघून गंगा यमुना धारण केलेल्या डोळ्यांनी चेहऱ्यावर एक चमक आलेली ती श्रावण बाळाची आई माझ्याकडे बघून हसली. मुलगा मला म्हणाला, धन्यवाद... आम्ही जाऊ इथून पुढे. काळजी करण्यासारखं काही नाही. 
मला गहिवरून आलं होतं. ते दृश्य बघून माझा कंठ दाटून आला होता. माझ्या तोंडातून शब्द फुटू शकले नाहीत. आकाशातून जलधारा वहात नव्हत्या पण माझ्या डोळ्यात आता या धारा वहायला हळूहळू सुरुवात झाली होती. मी फक्त होकारार्थी मान हलवली. त्या दोघांनी सावकाश ती दुभाजकाची पायरी ओलांडली आणि हळूहळू ते दोघे पलीकडचा रस्ता ओलांडून पुढे जाऊ लागली. मी दुभाजकावर त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृती बघत तिथेच उभी राहिले. माझ्या डोळ्यातल्या वाहणाऱ्या धारांनी डोळे भरत डोळ्यांची सीमा ओलांडली...
...आणि हा हा म्हणता ती दोघं तिथून निघूनही गेली.  
बारा तास उलटून गेलेत या घटनेला, पण अजून डोळ्यांसमोरून तो प्रसंग हालत नाहीये...
आईला उचलून घेतलेला तो अशक्त मुलगा आठवला तरी अंगावर रोमांच उभा राहतो...
त्रेता युगातला श्रावण बाळ नेहमी गोष्टीतच भेटला पण मी काल कलियुगातल्या एका श्रावण बाळाला पाहिलं आणि या श्रावण बाळाला पाहून मी धन्य झाले...
- मंजुषा थत्ते जोगळेकर
(साभार)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved