Bhagawadgeeta भगवद्गीता

=अनुभूती=
साधारण दोन महिन्यांपूर्वी घरात श्रीमद्भगवद्गीतेचं मराठी अर्थासहीत असलेलं, गीताप्रेसचं पुस्तक सापडलं... श्रीमद्भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करुन शाळेत असतांना बक्षिस मिळालेलं आठवलं आणि अगदी सहज, पण घाईतच त्यातल्या बाराव्या अध्यायाचं रॅपिड रिडीँग सुरु केलं... संस्कृत उच्चार, लहानपणी पाठ केलेले - त्यामुळे अगदी परफेक्ट उच्चार होत नव्हते, पण बरंच आठवत असल्याने छान वाटत होतं... अर्थ वाचतांना इंट्रेस्टीँग वाटत होतं... यात काहीतरी आहे हे डोक्यात वाजलं - तेव्हा घाई होती, ते तिथेच ठेवलं... पण तेच डोक्यात सुरु झालं... यात काहीतरी नक्की आहे...
.
दुसऱ्‍या दिवशी रिकाम्या वेळेत पुन्हा ते पुस्तक घेतलं.... आणि बारावा अध्याय उघडला... एक एक श्लोक आणि त्याचा अर्थ मनात वाचणं सुरु केलं... इंट्रेस्टीँग... त्यातपण संस्कृत...! पण मनात उच्चार नीट होत नव्हते - फील येत नव्हता... तेव्हा आमच्या संस्कृतच्या वियन कॉलनी, देवपूर, धुळे स्थित ऐंशी वर्षीय जोशी मॅडम, त्यांचं घर, थंडी, सकाळी साडेपाचची वेळ, मॉर्टिनची कॉईल, आणि त्या अद्भूत वातावरणात त्यांनी दिलेला गुरुमंत्र जसाचं तसा आठवला... "तेजा, संस्कृत उच्चार व्यवस्थित करायचे असतील तर ते मनापासून मोठ्याने बोलावे, आपले उच्चार आपण ऐकावे- जिभेला वळण लागतं - आयुष्याला वळण लागतं... कानांना सवय होते....'' ! बस ! ते उच्चार मोठ्याने सुरु केले... आणि छानचं - खूप छान वाटणं सुरु झालं...
.
अर्थ वाचतांना एक गोष्ट जाणवत होती, हे साधंसुधं नक्कीच नाही... तंद्री लागत होती... ! इंटरेस्ट वाढत होता... या पुस्तकात बरंच काही दडलंय !... मग पहिल्या अध्यायापासून वाचायचं ठरवलं... रोज अर्धा तास, जितकं होईल तितकं... अर्थही पूर्ण समजून घ्यायचा... आणि उच्चारही व्यवस्थित करायचे...! रोजच्या कार्यक्रम फॉर्मवर B.Geeta Adhyay ठरला...
.
पहिला अध्याय... दुसरा... तिसरा... रोज थोडं थोडं वाचणं, म्हणणं सुरु झालं... पहिल्या दिवसापासून रेकॉर्डर ऑन होतं... शेवटपर्यंत ! आधी जीभ वळत नव्हती,  उच्चार अडखळत येत होते... पण नंतर नंतर फरक जाणवायला लागला... रेकॉर्ड त्यासाठीच केलेलं ! तसंच प्रत्येक श्लोकागणिक अर्थ समजायला लागला... अर्थ मनात उतरायला लागला... आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यात आहे...  प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग अस्तित्वात आहे... तो समुद्र आहे, त्यातून रोज थोडं थोडं घेत होतो... माझ्या विचारांत होत असलेला बदल मला जाणवतोय...
.
आज पूर्ण पुस्तक वाचलं गेलं... सिरीयसली आत्ता या क्षणाला प्रचंड शांती अनुभवतोय... अगदी शांत... ! माझ्या संस्कृत, मराठी उच्चारांत आणि आवाजात प्रचंड स्पष्टता आलेली जाणवतेय... अगदी गाण्यात पण... हा अॅक्टीव चेंज... उघडपणे लक्षात येणारा..! पण, त्यापेक्षा महत्वाचं, मला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचा फिल येतोय... अगदी साधेपणे, पण कुणीतरी आपल्याला शांतपणे समजावतंय... आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं देतंय... असा अनुभव मिळतो... आपण काही गोष्टी किती चुकीच्या पद्धतीने बघतो, आणि त्यातून सहज मार्ग निघत असतांनासुद्धा स्वतःच कॉम्प्लिकेशन्स तयार करतो... बऱ्याच गोष्टींची उत्तरं आपल्या समोरच असतात, पण आपण त्या बाजूंचा विचार करत नाही....!
.
खूप वेगळा अनूभव मिळाला... रोज थोडं थोडं वाचायचो, आणि ते दिवसभर मनात असायचं... आणि जीभेला वळण मिळाल्याचं तर स्पष्ट जाणवतंय ! ... पण एकुण प्रचंड फ्रेश वाटतंय... श्रीमद्भगवद्गीता चमत्कारीक आहे.... ते वाचून मोठे मोठे चमत्कार झाले, लोखंडाचं सोनं झालं असं बिलकूल नाही - पण त्यात प्रचंड ज्ञान आहे... विज्ञान आहे... मानसशास्त्र आहे... गणित आहे... युद्धनिती आहे... जगण्यासाठी-भोगण्यासाठी जे जे हवं ते सगळं यात आहे... जे पटतं ! जे समजतं... आपल्यासाठीच आहे हे जाणवतं... आपण जितकं समजून घेतो, तितकं आपलं ज्ञान वाढतं... आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो हे ही तितकंच खरं आहे... इतरही बऱ्याच न समजणाऱ्या गोष्टी समजू लागल्यात !
.
प्रत्येक श्लोकाला, त्याच्या अर्थाला मनापासून वाss वाss, सुंदर, अद्भूत ची दाद निघतेच ! आपली चक्र जागृत होतात... मन त्यात गुंतलं जातं... प्रचंड मानसिक शांती मिळते...!
.
यात खंड नाही पडू देणार... उद्यापासून पुन्हा पहिल्यापासून सुरुवात... रोज वीस मिनिटं ते अर्धा तास... ! हा समुद्र आहे... दरवेळी नव्याने नवं समजेल.
कारण गीतेचं सार आहे...
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोsस्त्वकर्मणि ॥
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved