डोलची : धुळ्यातली होळी

धुळ्यात होळी म्हणजे प्रेमानं ऑ ऑ करुन चेष्टेनं रंग लावणं नसतं ...
इथल्या लोकांत सुप्त / उपजत आडदांडपणा असतो. जो होळीला उफाळून येतो... !
..
धुळ्यात पिचकारीनं नाही - डोलचीने होळी खेळतात.
डोलची : पत्र्याला शंकूसारखा आकार देउन हातात घट्ट बसेल अशी मूठ बसवतात... आणि त्यात पाणी भरलं की सुरु ... !  इथल्या पोरासोरांत त्याने फटके मारायची कला उपजत असते... पाण्याचाही फटका दिवसा तारे दाखवू शकतो हे दिव्यज्ञान प्राप्त होतं... एकच फटका - "तुम्ही धुळ्यात आहात" ही जाणीव करून देण्यासाठी पुरेसा असतो...!
..
तुमची ओळख असो नसो, इच्छा असो नसो - दिसलात की दोन जण तुमचे हात पाय पकडतील, दोन जण डोलचीत पाणी घेऊन कानफडात मारल्यासारखे दहा-बारा फटके मारतील... मग मोठ्ठ्या हौदात चार वेळा तुमची बुड बुड घागरी करतील... पक्क्या रंगानं भरवतील... आणि है है करुन आहिराणी गाण्यांवर बारापावली नाचवतील... ! पुढच्या चौकात/गल्लीत/खुंटावर/कॉलनीत सेम प्रकार... इतकं असतांनापण भांडण नसतं, मारामाऱ्या नसतात... एरव्ही तगडे दुश्मन पण गळ्यात गळा घालून "भईssss" म्हणत एकमेकांना रंगवतात !
..
ते फुलांची होळी, साध्या रंगाची होळी, पिचकारीची होळी पुचाट वाटते... मुंबईत आल्यानंतर जास्त...! डोलची हातात पकडून एखाद्याला धुतल्याशिवाय, किंवा तो पाण्याचा थरार अंगावर घेतल्याशिवाय होळी - होळी वाटत नाही... !
..

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved