शुक्रतारा अस्तला...
सकाळी अरुण दाते गेल्याची बातमी आली आणि जवळचं माणूस गेल्यावर येतं ते पाणी आलं डोळ्यात... ज्या माणसाची गाणी ऐकत लहानाचं मोठं झालो, प्रेमातल्या गुजगोष्टी ज्यांच्या गाण्याने बहरल्या, ज्यांच्या आवाजाने कितीही मोठ्या संकटात जन्मावर जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, ज्यांच्या आवाजाच्या सानिध्यात शेकडो किमीचा प्रवासही जवळचा वाटायचा त्या आवाजाचं असं शांत होणं चटका लावणारं आहे... हि बातमी खोटी ठरो म्हणून मनातल्या मनात देवाचा धावाही झाला. पण अवतार सुद्धा संपतात, आणि अरुण दाते आपल्या दुर्दैवाने अमर नाहीत.
.मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळे काकांचे संगीत आणि शब्दांना-संगीताला लाभलेला अरुण दातेंचा मखमली आवाज... त्रिमूर्तीने केवळ गाण्यासाठी अवतार घेतलेला असावा असा सुरेल संगम... किती भरभरून द्यावं एखाद्याने ? आपली झोळी भरली, पण त्या त्रिमूर्तीचा हात आखडला नाही. आज फक्त दाते गेले नाहीत, तर मराठीचं पितृत्व हरवलंय, मराठी गाण्याचा आवाज शांत झालाय... खळे-दाते-पाडगावकर त्रिमूर्तीमधला शेवटचा देवही आज निजधामाला गेला... या तिघांचे एकमेकांशी खरंच स्वर्गातले संबंध असावेत... एकमेकाच्या मनातलं गाणं ओळखून ते सुंदर समन्वायासह फुलवणं सोप्पं नाही...
.
मराठी गाणी म्हणल्यावर पटकन काय वाजत कानात ? किंवा तुमचं आवडतं मराठी गाणं कोणतं ? या प्रश्नाचं चटकन समोर येणारं उत्तर कोणतं ? अगदी मनस्वी मराठी असेल त्याच्या मनात येईल शुक्रतारा मंदवारा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली, येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील, दिवस तुझे हे फुलायचे... फक्त गाणी मनात येत नाही तर अरुण दातेंचा गोड स्वर कानात घुमायला सुरुवात होते, आणि मायक्रोसेकंद मध्ये आपण त्या गाण्याच्या भावविश्वात पोहचलेलो असतो... शंभरात एखादा गायकच या स्तरावर पोहचतो, त्याला देवत्व प्राप्त होतं. प्रेमगीत, भावगीत, आर्त हाक, दु:ख व्यक्त करणारी गझल, युगलगीत, भक्तीगीत,,, गीताचे जितकेही प्रकार असतील त्या सगळ्यांना अरुण दातेंनी साज चढवला.
.
मी चार वर्षांचा असेल, तेव्हाचा एक प्रसंग मी घरात खुपदा ऐकलाय... माझी आई - पप्पा अरुण दातेंचे गाणे रेडीओ, टीव्ही कुठेही लागले तरी हातातलं काम सोडून ऐकत बसायचे... तीच सवय मलापण लागलेली... अर्थ काळात नसला तरी या जन्मावर या जगण्यावरची एक दोन कडवी मला बऱ्यापैकी म्हणता यायची... आणि एकदा ऐकलं कि मी तेच म्हणत बसायचो. एकदा पुण्याला अरुण दातेंचा कार्यक्रम होता, मला आईपप्पा घेऊन गेले... तेव्हा ग्रीन रूम वैगेरे प्रकार नव्हते, आणि आयोजक पप्पांचे खूप चांगले मित्र असल्याने अरुण दाते आल्यानंतर ते त्यांना भेटायला घेऊन गेले. ओळख वैगेरे झाल्यानंतर "तू जे गाणं ऐकत असतो तो आवाज यांचा आहे" अशी माझी आणि दातेंची पहिली ओळख पप्पानी करून दिली... माझ्यातला झोपलेला "या जन्मावरचा" चाहता जागा झाला. आणि मलापण हे गाणं गायचं, स्टेज वर गायचं यासाठी हातपाय आपटण सुरु झालं... शेवटी आईपाप्पा फटका देणार तेवढ्यात दातेंनी माझा हात पकडला, स्टेज वर नेलं आणि ते दोन कडवे गायला सांगितले... गाऊन झालं, आणि मला तिथेच बसवून त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात "या जन्मावर" गाण्याने केली... त्यांचं गाणं झाल्यावर स्टेज वरून खाली येण्यापूर्वी हातात शंभर रुपये दिले...! तेव्हा समजलं नाही, पण आत्ता जेव्हा ते ऐकतो तेव्हा त्या क्षणाची किंमत कळते... अरुण दाते इथे पहिल्यांदा समजले.... तिची नि माझी पहिली भेट झाल्यावर परत येताना हेडफोन वर "पहिलीच भेट झाली" ऐकत ऐकत आलो होतो... शुक्रतारा, येशील येशील राणी हजारो वेळा ऐकलं असेल... गाणी, त्यांचा आवाज, हरकती प्रत्येक गाण्याचं तोंडपाठ आहे, तो आवाज कानावर पडला कि मनातले विचार शांत होऊन फक्त गाण्याच्या भावविश्वाची सुरेल सैर होते... त्यांचा भक्त होणं, वेडं होणं म्हणा...
.
भक्ती करावी अशी थोडीच माणसं शिल्लक आहेत, अरुण दाते त्यातलेच एक होते... शरीराने गेले... मनाने, आवाजाने अमर आहेत... निसर्गाच्या हातात असतं तर त्याने हि रत्न कधीच वृध्द केली नसती. कारण यांच्यासारखे दुसरे होणार नाहीत, त्यांनीच पुनर्जन्म घेतला तरीही नाही... !! आज तीन गोष्टी संपल्या... त्रिमूर्ती संपली, अरुण दाते नावाचा हळवा माणूस संपला आणि मराठी गाण्यातला महत्वाचा दुवा, खांब, अध्याय किंवा सुरेल सोनेरी पान... ते हि संपलं... कवी माणसाचा मेंदू, संगीतकाराचे कान आणि जाण्याऱ्या गायकाचा गळा जतन करायची सोय कदाचित होईल पुढेमागे, पण तेव्हा पाडगावकर नसतील, खळे नसतील आणि दातेही नसतील...!!
.
अरुण दाते यांना भावपूर्ण श्रध्दांजली... गाण्यातून ते अमर आहेत, सदैव जिवंत आहेत ... त्यांनी भरभरून दिलंय, फुलवलंय...
जाता जाता कदाचित त्यांच्या मनात त्यांच्याच आवाजातली गझल ऐकू येत असेल...
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गुज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यातून माझ्यासाठी लाव दोन ज्योती...!!
- तेजस कुळकर्णी