बारावीचा निकाल आणि सिट नंबर ...

एखाद्याला किती टक्के मिळाले, पास कि नापास याची गरजेपेक्षा जास्त उत्सुकता दूरच्या / जवळच्या नातेवाईकांना असते... यात काळजी, कौतूक कमी तर फुकट सल्ले वजा प्रवचन देण्याची मळमळ किंवा त्या माणसासाठीची असुया आसूरी आनंदात व्यक्त होते...
..
नातेवाईक किरकिर ही भिक नको पण कुत्र आवर सारखी असते... त्यातही सिट नंबर विचारुन उगाच सलगी साधण्याचा प्रयत्न होतो... अगदी जवळचे जवळचे नातेवाईक अश्यावेळी अंगावर आलेले वाटतात... उपजत स्वभावानूसार अश्यांवर मी जालीम लोशन शिंपडलेलं...
..
माझा निकाल आला २५ मे २०१० ला, दुपारी १ः०० वाजता... पेपर्स चांगले गेलेले, त्यामूळे धाकधूक प्रमाणात होती... पण दोन दिवस आधीपासूनच "तुझा सिट नंबर देऊन ठेव, मी इकडे चेक करेन / मोबाईलवर बीएसएनएलचा मेसेज आलाय / ऑफीसमध्ये नेटवर बघेन " चे कॉल्स सुरू झाले ... कमी मार्क मिळाले तर, मार्क नको पण यांची प्रवचनं आवर गत होईल हे जाणून
"माझ्याकडे घरी बीएसएनएलचं हायस्पिड ब्रॉडबँड आहे. मी बघेन आणि त्याच दिवशी कळवेन"... ही टेप वाजवणं सुरु केलं ... जो सिट नंबर मागेल त्याला हे १२ शब्द म्हणून दाखवायचो ...
..
निकाल लागला... ! बऱ्यापैकी मार्क मिळाले...
सगळ्या उत्सूक्यांना फोनवर कळवलं ...
तरीही परत एक दोघांचं "तुझा नंबर दे, मी इकडे चेक करतो" ची टेप चालूच ... यांना नंबर दिला तर उरलेले १८ टक्के का मिळाले नाहीत यांवर त्यांचा आसुरी भांगडा सुरु होईल हे जाणून -
हा घे (हे प्रगट) घे मेल्या - कर काशी (हे मनातल्या मनात)... म्हणून सरळ दहा आकडी मोबाईल नंबर दिला...
दोन अडीच तास सिट नंबरच्या जागी मोबाईल नंबर टाकून रिट्राय रिट्राय करुन त्या व्यक्तीचं डोकं उठलं - उत्सुकता मेली आणि "नसेल द्यायचा तर नाही सांगायचं सरळ, टेस्ट का घ्यायची उगाच ?, मोबाईल नंबर आहे हा... आपलं म्हणून विचारलं ... .... ...." या चिडक्या कॉलवर नंबर पुराण संपलं .. दोन महिने फोन नाही, भेट नाही ... ! मज्जा आली !
...
पुढे मास्टर्स केलं : चुकूनही परत विचारलं नाही त्यांनी,
सिट नंबर द्या म्हणून !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved