Rajiv Gandhi vs Rahul Gandhi

मला किती ही काँग्रेस नको असली तरीही पप्पू का जाना जरुरी है 

Sarang Darshane

ह्यांच्या  ब्लॉगवरील लेख आहे...

राजीव आणि राहुल….

इंदिरा गांधी यांची हत्या ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी झाली, तेव्हा २० ऑगस्ट १९४४ रोजी जन्मलेले राजीव गांधी बरोबर ४० वर्षांचे होते. मातेच्या दुर्दैवी हत्येनंतर काही तासांतच राजीव यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पुढे राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी धानू या मानवी बाँबच्या साह्याने तामिळी वाघांनी हत्या केली, तेव्हा राहुल तुलनेने खूप लहान होते. १९ जून १९७० रोजी जन्मलेले राहुल आणखी काही दिवसांनी आपला एकविसावा वाढदिवस साजरा करणार होते.

राजीव यांची हत्या झाली तेव्हा ते अवघे ४६ वर्षांचे होते आणि त्यांची राजकीय कारकीर्द उणीपुरी दशकभराची होती. राहुल गांधी हे आज ४८ वर्षांचे आहेत आणि यातला गेला चार वर्षांचा नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा काळ सोडला तर त्याआधीची सलग दहा वर्षे संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता होती. दहाही वर्षे डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान होते. इंदिरा गांधी जानेवारी १९८० मध्ये पुन्हा सत्तेवर आल्या. २३ जून १९८० रोजी राजकारणात असणारे धाकटे पुत्र संजय यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर काही आठवड्यांनी इंदिराजींना आपल्या मदतीला आपल्या वैमानिक असणाऱ्या मुलाने म्हणजे राजीव यांनी यावे, असे वाटू लागले. तसे प्रयत्न त्यांनी सुरू केले आणि राजीव अमेठीचे खासदार बनले. १९८२ मधले एशियन गेम्सचे आयोजन वगळता त्यांना पंतप्रधान होण्यापूर्वी फार मोठा प्रशासकीय अनुभव मिळू शकला नाही. तसेच, काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही इंदिराजी पंतप्रधान असताना त्यांना पक्षाच्या संघटनेत फार मोठे निर्णायक काम करता आले, असे नाही.

या पार्श्वभूमीवर राजीव गांधी यांची इंदिराजीचा मृत्यू ते त्यांची स्वत:ची हत्या या काळातील अवघी सात वर्षांची राजकीय कारकीर्द तपासली तर ती क्रमाक्रमाने परिणत होत गेलेली दिसते. विश्वनाथ प्रतापसिंह, अरुण नेहरू, अरुण सिंह, अरिफ महंमद खान आदींनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर त्यांची पहिलीच कमालीची यशस्वी टर्म झाकोळून गेली नसती. बोफोर्स आणि शाहबानो या राजीव यांच्या काळातील दोन प्रमुख चुका. संरक्षण खात्यातील दलाली ही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून चालत आलेली कीड आहे. तसे ते त्यावेळीही झाले. मात्र, शाहबानो यांची पोटगी कायदा बदलून रद्द करण्याची फार मोठी चूक राजीव यांच्या हातून झाली.

या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर राजीव यांनी देशासाठी काय काय केले? असा प्रश्न विचारला तर ‘काय काय नाही केले,’ असा उलटा प्रश्न विचारता येईल, इतके प्रचंड, सर्जनशील काम राजीव गांधी यांनी करून ठेवले आहे. 

राजीव गांधी बुद्धिमान तर होतेच पण त्यांचा इमोशनल कोशण्ट त्यांच्या वडिलांशी आणि आजोबांशी नाते सांगणारा होता. त्यांची जंटलमनशीप मोहक होती. त्यांची वैज्ञानिक दूरदृष्टी दुर्मीळ होती. त्यांचा भारताच्या आकलनाचा झपाटा थक्क करणारा होता आणि त्यांना दिसणारे भारताचे भविष्य त्यांच्या आईलाही कदाचित शेवटच्या कारकीर्दीत दिसू शकत नव्हते. (१९८१ ते १९८४ या काळात वेगाने आर्थिक व तंत्रवैज्ञानिक पावले टाकण्याबाबत इंदिराजी व राजीव यांच्यात झालेले मतभेद नोंदविले गेले आहेत.)

राजीव यांनी सरचिटणीस म्हणून काम सुरू केल्यावर वेगाने वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसे जोडली, त्यांना आपल्या चार्म आणि वॉर्म्थनी कायमचे जोडून घेतले. हीच माणसे ते पंतप्रधान झाल्यावर देशात अनेक गोष्टी झपाट्याने करू लागली. प्रभाकर देवधर आणि सॅम पित्रोदा ही दोन नावे तूर्त वानगीदाखल पुरेशी ठरावीत. तेव्हा विरोधात असणाऱ्या एकजात साऱ्यांनी राजीव यांच्या संगणकक्रांतीची चेष्टा केली. त्यांना नवे जग काही समजतच नव्हते. अशावेळी राजीव यांचा आत्मविश्वास खचला नाही. त्यांनी ती क्रांती तडीस नेली. ती झाली नसती तर आज भारताची अवस्था एखाद्या आफ्रिकी देशासारखीही होऊ शकली असती. दिवंगत प्रमोद महाजन यांनी पुढे काही वर्षांनी ‘संगणक क्रांतीला विरोध करण्यात आमची मोठी चूक झाली..’ अशी निखळ कबुली त्यांच्या उमद्या स्वभावानुसार दिलीच होती! हिंदुस्थान राजीव यांचा या क्रांतीबद्दल कायमचा उतराई आहे…

मुख्य म्हणजे, राजीव यांच्या डोळ्यांत अनेक नव्हे असंख्य स्वप्ने होती. आपल्या भावाला राजकारणात रस आहे आणि आईलाही तोच याबाबत जवळचा वाटतो आहे, हे एकदा लक्षात आल्यानंतर राजीव यांनी कदाचित सार्वजनिक जीवनाचे दार मनातल्या मनात लावून घेतले असेल. पण ते जन्मापासून दिवसरात्र अवघ्या देशाचे राजकारण घडणाऱ्या घरात वाढत होते. त्यांना ते कळत होते. आणीबाणी येताना, आल्यावर आणि उठल्यावर त्यांनी ज्या तीव्रतेते संजय यांच्याबद्दलच्या भावना घरात व्यक्त केल्या होत्या, यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चुणूक दिसते. त्यांच्यात लोकशाही पक्की मुरली होती. म्हणून तर ते दंडवत्यांना माफीची चिठ्ठी पाठवू शकले. वाजपेयींच्या उपचारांसाठी त्यांना अमेरिकेतील शिष्टमंडळात सामील करू शकले आणि दगलबाज व्हीपींचा शपथविधी झाल्यावर, ‘विश्वनाथ, अब तुम सांभालो...’ अशा अर्थाचे दिलखुलास उद्गार काढू शकले होते..

हे राजीवस्तवन आणखी बरेच वाढवता येईल..

तरीही राजीव द्रष्टे होते, हे आपले नशीब. 

राजघराण्यांमध्ये नेहेमी असे अपघात घडत नाहीत…

आता…

राहुल गांधी यांची पन्नाशी आली, पण त्यांचे बाल्य, यौवन, तारुण्य संपून प्रौढत्व यायला तयार नाही. त्यांना काहीतरी टोपणनाव ठेवून हिणवणे, हे सर्वथैव अयोग्य आहे. लोकशाहीच्या परिपक्व संकल्पनेत ते बसत नाही. पण आपल्या वडिलांचा एकतरी सद्’गुण राहुल यांनी घेतलेला दिसतो आहे का? इ. स. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे यूपीएची सत्ता देशावर होती. या काळात एखादी मोठी जबाबदारी हातात घेऊन ती निभावणे खरेच अशक्य होते का? संजय गांधी चबढब करीत, तेव्हा त्यांना चापणारे केंद्रीय मंत्री इंदिराजींच्या मंत्रिमंडळात कमी असले तरी होते. इथे, खुद्द पंतप्रधान व आख्खे मंत्रिमंडळ सोनियांच्या आशीर्वादाने चालत होते. मंत्रिमंडळाने मंजूर केलेला विधेयकाचा मसुदा जाहीरपणे फाडून टाकण्याइतके स्वातंत्र्य राजकुमारांना लाभले होते. मग या सत्तेचा, स्वातंत्र्याचा, ताकदीचा काय उपयोग राहुल यांनी या दहा वर्षांत करून घेतला?

डॉ. मनमोहन सिंह यांचा उचित आदर राखून राहुल यांनी दहा वर्षे आपल्या आवडीचे एक खाते तरी जीव ओतून चालवून दाखवायला काय हरकत होती? शास्त्रीजींचा अपमृत्यू ओढवला नसता इंदिराजींनीही माहिती व नभोवाणी खात्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली केले असतेच की. मग राहुल यांनी असे का केले नाही? त्यांना त्यांच्या आईने किंवा बहिणीने तसे का सांगितले नाही? की महाराष्ट्रातला जबाबदारी न घेता सत्ता उपभोगण्याचा फॉर्म्युला त्यांना आवडत होता? एक जबाबदार, संवेदनशील आणि पूर्णवेळचा राजकीय नेता म्हणून आपली प्रतिमा बनवण्यासाठी यूपीएची राजवट ही उत्तम संधी होती. ती राहुल यांनी पुरती वाया घालवली. ती आता एका वर्षात कशी काय भरून निघणार? देशाचे राजकारण ही अचानक जादू की झप्पी देण्याइतकी किंवा आँखमिचौली खेळण्याइतकी सोपी गोष्ट नाही…

…. यात सर्वांत मोठा दोष काँग्रेस नेत्यांचा आहे. देशात अत्यंत बलवान, सळसळता असा काँग्रेस पक्ष हवाच. आपल्या संसदीय लोकशाहीच्या संकल्पनेसाठी तो आवश्यकच आहे. पण काँग्रेस पक्षाचे नेतृत्व एकाच घरात ठेवण्याचा हट्टाग्रह कशासाठी? १९९१ ते १९९६ या काळात नरसिंहराव पंतप्रधान असताना एका बैठकीत एका मुद्द्याबाबत ’१० जनपथचे म्हणजे सोनिया गांधी यांचे काय मत आहे‘, असा विचार चालू होता. तेव्हा ‘काँग्रेस पक्ष म्हणजे नेहरू-गांधी घराण्याच्या इंजिनाला जोडलेली मालगाडी नाही, असा शेरा नरसिंहराव यांनी मारला. हा किस्सा अर्जुनसिंह यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केला आहे. 

असे जर आजही काँग्रेसनेत्यांना खरेच वाटत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही.. काँग्रेसने तेजस्वी, तरुण नेतृत्व उभे करावे. देशापुढे नवा कार्यक्रम घेऊन यावे. आपली बेगडी धर्मनिरपेक्षता सोडून द्यावी. घराणेशाहीला तिलांजली दिलेला लोकमान्यांचा, बापूंचा, सरदारांचा, पंडितजींचा, सुभाषचंद्रांचा… काँग्रेस पक्ष नव्याने उभा का राहू नये?

काँग्रेस ही मालगाडी नाही. 
स्वातंत्र्याची लढाई खेळलेली ती जगातली एक अद्’भुत संघटना होती... 

तिने एका घराण्याचे बटीक व दासी का व्हावे?

(आपणास हा लेख योग्य वाटल्यास कृपया शेअर करावा.)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved