खाSSरे
#गोड_गोष्टी
...
तेजू आणि माझं लेकरु तिच्या माहेरी सेलूला आहे... ते पुढच्या महिन्यात येतील...
त्याला मी पंधरा - वीस दिवसांत भेटायला जातो... आणि कधी कधी माझे मम्मी पप्पा सुद्धा सोबत असतात...
लेकराला माझ्या पप्पांचा आवाज, स्पर्श खूप कळतो... आणि कितीही रडत असला तरीही पप्पांनी त्याला एकदा हाक मारली की गप्प बसतो... हसतो...! रडत असला तर पप्पा त्याला "का रे बाळा ... का रडतोय ?'' हे म्हणतात... त्याला ते "का रे बाळा" एकदम ओळखीचं झालंय...!
पप्पा बोलले की तो हाताने ये ये करतो..!
...
आज लस देवून आणलेली तर एकदम गाढ झोपला होता -
तेजूच्या कॉलनीत खारे शेंगदाणे वगैरे विकणारी गाडी आली, तो माणूस "खाsssरे" म्हणत ओरडत होता...
ते "खाsssरे" गाढ झोपलेल्या लेकराच्या कानावर आलं...
त्याला ते "का रे - का रे" ऐकू आलं, आणि वाटलं पप्पा आले... लेकरु खुश होवून हसायला लागलं... हाताने ये ये सुरु केलं ...
तो आवाज जसा जसा कमी होत गेला तसं त्याला कळलं आणि चेहऱ्यावरचं हसू सुद्धा कमी झालं...
आवाज बंद झाला आणि लेकराने जोरदार भोंगा पसरला...
...
आता जेव्हा फोन वर पप्पांचा आवाज ऐकला तेव्हा तो शांत बसलाय...!
...
काही गोष्टी हळव्या असल्या तरीही गोड असतात...!