Guru... Guide...

= गुरु =
जन्माला आल्यापासून आपला प्रवास शेवटाकडे सुरु असतो... हा प्रवास जितका आनंदाचा, तितकाच खडतर ! गुबली बूबली करून एक गाल ओढून भलं मोठ्ठं हसू आणणारा तर त्याचवेळी दुसऱ्या गालावर खाsडकन मारणारा... नक्की काय सुरुय हे आपल्याला उमजतही नसतं, ... मंजील कहा - कहा रुकना है... काहीच माहीत नसतं... पण तरीही हा प्रवास सुरू असतो. अखंड... असंख्य अडचणी झेलत, त्यातून वाट काढत, सहज होत असतं सगळं !
कुठून येतं इतकं बळ ? कोण देतं इतकी अक्कल ? कोण आपली नौका पार लावतं ?
...
जिथे आपलं विचार करणं थांबतं, मर्यादा येते - कड येतो तिथे मार्ग दाखवायला निसर्गाने एक अद्भूत शक्ती निर्माण केलीय, गुरु ! आपला रस्ता दूरपर्यंत असतो, त्या प्रवासात मार्गदर्शन करतो अशी व्यक्ती किंवा शक्ती... आपलं बळ, आपली अक्कल, आपले विचार, आपल्या संकटकाळी वाट दाखवणारे आणि चूक झाली तर दोन झापड कम तडाखे लावणारे गुरु...!
आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा, बायको, मित्र-मैत्रीण, बालवाडीत शिकवलेल्या बाई ते पीएचडी गाईड, गाणं शिकवणारे गुरु, भौतीक ज्ञान देणारे शिक्षक हे प्रत्येकालाच लाभतात. कुणी क्षणोक्षणी तर कुणी गरज असतांना आपलं काम करतात, ते दार उघडतात आणि पुढच्या प्रवासासाठी वाट मोकळी करून देतात...
गुरू म्हणजे अनुभूती, गुरु म्हणजे बळ, गुरु म्हणजे अनुभव... शिकवणारे !
.
माझी पाच गुरुपीठ...
माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्यात सापडतं ती भगवद्गीता. फक्त प्रश्न विचारला, की उत्तर सापडतंच. बुद्धीमान लोकांची बुद्धी आणि तेजस्वी लोकांचं तेज भगवद्गीतेत आहे. रोज नव्याने समजते... माझं आयुष्य जे जसं घडतंय त्यावर भगवद्गीतेचा प्रचंड प्रभाव आहे. भगवद्गीता माझा मनात, विचारात, वागण्यात आहे... त्या ग्रंथाचा मला प्रचंड आधार वाटतो...

दुसरं गुरूस्थान बुद्धीबळाचा राजा... !
या आकृतीतच विलक्षण शक्ती आहे... त्या राजाकडे बघीतलं की बळ येतं. माझ्या कंपनीचा सिंम्बॉल बुद्धीबळाचा राजा आहे... !

माझी डायरी - बारा वर्षांपासून आजपर्यंत दररोज न चुकता डायरी लिहीण्याची सवय आहे. डायरी, वर्षभर काय काम करायचं त्याचं प्लान आणि त्यावर उभा असलेला रोजचा क्षण न क्षण... मी या रुपात माझा भूतकाळ त्यातल्या अनुभव, अनुभूती सह आणि भविष्यकाळ येणाऱ्या आव्हानांसह सोबत घेऊन जगतोय... जे खरे मार्गदर्शक... खरे गुरु... एक चूक - त्याचा धडा आयुष्यभर १०० चूका टाळण्यासाठी उपयोगी पडतो...

मुंबई मेरी जान... मुंबई माझी माय...
रोज नवा धडा, नवा अनुभव...
मुंबईत येऊन भलेभले घडले - तेजस कुलकर्णी क्या चीज है... हवेतला माज खाडकन आपटला, डोक्याच्या फुग्याला कुणीतरी पीन टोचावी आणि त्यातली गूर्मी फट् व्हावी, हवेत उडणारा फुगा जमीनीवर यावा, आणि खऱ्या लायकीत पुन्हा उभा रहावा... मुंबईनं हे केलं...
जगणं - वागणं - टिकणं फक्त स्ट्रगल... संघर्ष... !! जगणं शिकायचंय - मुंबईत रहा. ... फक्त पैसा असून उपयोग नाही, जगण्यासाठी जी लायकी लागते, जिगर लागते ती मुंबईतच मिळते... ! पुण्यानं उभं केलं, मुंबईनं बळ दिलं... मुंबईत जितकं धडपडाल तितकं मिळेल,

आणि पाचवं शक्तीपीठ - संघ !
हे मडकं ज्यात भाजलं जातंय ते... संघ ! भगवा झेंडा गुरु आपुला... ही उक्ती लाखमोलाची .... त्यात सगळंच आलं !
...
आध्यात्मीक गुरू नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ, समर्थ रामदास, गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज हे देवस्थानी... जे आपल्या नकळत नैया पार लावतात... !
पण "जगणं" हा प्रवास, त्यातली संकटं, अनुभव हे दर्शन देणारे... प्रत्यक्ष दिसणारे ... घडवणारे ... !
कधीतरी लागलेली एखादी ठेच गुरू होते, कधी रस्त्यावरचा अनोळखी माणूस... !

गुरूंचं मूळ काय ?
आपलं मन... आपण स्वतः...
आपण आपल्यासाठी सदैव गुरुस्थानी आहोत... !
मृत्यूपूर्व... मृत्यूपश्चात... निरंतर !
...
गुरु परमात्मा परेशु ।
ऐसा ज्याचा दृढ विश्वासु
देव तयाचा अंकिला ।
स्वयें संचरा त्याचे घरा...
:-) :-)
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved