Rafi - The God

रफी साहेब...
स्वर्गातले गंधर्व अवतार घेतात, कार्य करतात, देणं देतात... आणि स्वस्थानी परत जातात... त्यांना ना जन्म असतो ना मृत्यू... मानवी मर्यादा त्यांना आड येत नाही, ना ते कधी संपतात... मोहम्मद रफी नावाचा देव होऊन गेला... त्या देवाने आपल्या स्वर्गीय आवाजाने भरभरून दिलं, मागच्या चार आणि पुढच्या शेकडो पिढ्यांवर आजन्माचं ऋण देऊन १९८० मध्ये याच दिवशी स्वर्गात स्वस्थानी प्रस्थान केलं... रफी साहेबांच्या आवाजाने प्रत्येकावर जादू केलीय... प्रत्येकजण त्या आवाजाचा भक्त आहे...
खुशनसीब है वो लब्ज़
जिनको तुमने छुआ,
जन्नत मिले उस गाने को
जिसे रफी ने गाया..
..
वयाच्या सातव्या वर्षी लाहौरमध्ये एका फकीराच्या मागे फिरुन ते त्याच्यासारखं गात असत, त्या फकीराने हा अवलिया जगाला दिला.. त्यांची गानप्रतिभा त्यांच्या भावाने ओळखली आणि उस्ताद वाहीद खान यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवलं... हे सुरु असतांना प्रख्यात गायक कुन्दनलाल सहगल यांचा कार्यक्रम लाहौर रेडीओकरता होत होता, लाईट गेले आणि गोंधळ झाला. त्यावेळी जमाव शांत करण्यासाठी रफींच्या मोठ्या भावाच्या विनंतीने त्यांना गाण्याची संधी मिळाली. त्या प्रेक्षकांत श्यामसुंदर यांनी त्यांना ऐकलं आणि रफींच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात झाली... श्यामसुंदर समवेत पंजाबी गाणं आणि पुढे मुंबईत येऊन नौशाद यांच्यासमवेत पहले आप या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं... मोहम्मद रफी नावाचा हिरा जगाला गवसला, त्या स्वर्गीय आवाजाने हजारो हिंदी-मराठी-पंजाबी गाणी गायली, आणि आपलं आयुष्य समृद्ध केलं...
.
यशाच्या शिखरावरचा हा देव प्रत्यक्षात शांत स्वभावाचा, प्रामाणिक आणि व्यसनांपासून खूप दूर होता... आपल्या यशाचा लोभ, पैशांविषयी आकस त्यांना कधीच नव्हता...
"गाणं" हा धर्म समजून रफी साहेब गात राहीले...
गाण्याच्या रॉयल्टीवरुन त्यांच्यात आणि लता मंगेशकरांमध्ये वाद झाले होते... गाण्याच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या रकमेतला एक हिस्सा गायकाला मिळावा असा लतादिदींचा हट्ट होता, पण रफी साहेब या वृत्तीच्या विरोधात होते... एकदा गाणं रेकॉर्ड झालं, त्याची ठरलेली रक्कम मिळाली की गायकांनी अजून पैशांची अपेक्षा ठेवायला नको असं त्यांचं मत होतं... यावरून वाद टोकाला गेले आणि रफी साहेबांनी पुढे खूप मोठा काळ लता मंगेशकरांबर काम केलं नाही, बऱ्याच वर्षांनी नर्गिस यांच्या मध्यस्थीनं ते वाद मिटले, पण मनोमनी शेवटपर्यंत होतं...
..
३१ जुलै १९८०, अवघ्या ५५-५६ च्या वयात मोहम्मद रफींचं निधन झालं ... निधन नव्हे, या गंधर्वाचं पृथ्वीवरचं अवतारकार्य संपलं... !
..
२५००० वर विविध भाषेतील गाणी, प्रत्येक गाणं अत्युच्च दर्जाचं, हजारो एव्हरग्रीन गाणी, काळजात भिडणारा आवाज आणि त्या आवाजाचे करोडो भक्त... पण ग्लॅमरचा लवलेशही त्या माणसानं दाखवला नाही... सुंदर आवाजाचा, निर्मळ मनाचा गंधर्व तितकंच सुंदर, निर्मळ आयुष्य जगला ...
देव आहे, तो असा दिसतो...
रफी साहेब त्यांचा आवाजातून अजरामर आहेत...
त्या आवाजाने स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारे
त्यांचे आपल्यावर असलेले ऋणही अजरामर आहेत... !
कुछ लोग आते है, खूदाके एहसानोसे
इन्सानकी तरह रहते है, पर होते है भगवान
आ के धरती पे, यहाँ स्वर्ग बनाते है,
भगवान कभी मरते रही,
उन मे ही खो जाते है इन्सान... !
..
आजच्या दिवशी या माणसाची आठवण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही...
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved