कृष्ण

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय॥

देवातलं नेमकं तितकं घ्यावं, ते समजावं, त्यायोगे आपली उत्तरं शोधावी आणि वेळ आली की रस्ता पकडावा... भक्ती म्हणजे इतकंच. कृष्ण पूजण्यासाठी लग्न, घरदार सोडून आजन्म ब्रह्मचारी होवून इस्कॉनच्या नादी लागू नये, किंवा राम पूजण्यासाठी कारसेवक होवून तावतावानं भांडू नये...
..
कृष्ण गोकूळातल्या बाललीलांत भेटत नाही ... ना त्या लीलांत तो बघावा... प्रत्येक लहान मूल अपने आप मे त्या लीला दाखवत असतं... कृष्ण द्वारकेचा राजा म्हणूनही बघायची इच्छा नसते... कारण तेव्हा आपापसातले भांडणं, राज्य, सोळा हजार राण्या यांत अडकलेला तो सामान्य माणूस असतो... कृष्ण महाभारतातल्या राजकारणात कपट करतांनाही पटत नाही... मग त्याचं देवत्व कुठे ? का पूजा करावी ? ... कृष्णाची पूजा दही दुध चढवून होत नाही... कृष्णाची पूजा भजन करून होत नाही, ना कृष्णाची पूजा चार धाम यात्रा करून होते - कृष्णाचं देवत्व गोकूळात नाही, कृष्णाचं देवत्व द्वारकेत नाही... हस्तीनापूरातल्या राजकारणात तर बिलकूल नाही...
कृष्णाचं देवत्व कुठाय ?
...
ते आहे भगवद्गीतेतल्या अठरा अध्यायात - सातशे श्लोकांत... ! कुरुक्षेत्रावर अर्जुनाला विश्वरुपदर्शन घडलं तिथेच "देव कृष्ण" जन्माला आला, भगवद्गीतेच्या रुपानं विश्वगुरु झाला आणि स्वस्थानी गेला... विश्वाला ज्ञान देण्यासाठी कृष्णाचा गोकूळ ते द्वारका हा प्रवास घडला... त्यातल्या देवत्वाचा साक्षात्कार फक्त कुरुक्षेत्रावरच्या एक प्रहरात घडला... आपलं कर्म आटोपलं आणि तो अवतार तिथेच संपवला. इतर वेळी तो केवळ एक मानवी देह होता... कृष्ण मंदीरात भेटत नाही... शोधूही नाही... ना मंत्रांनी आवाहन केल्यावर तो येतो... त्याला साग्रसंगीत पूजा कधीच नकोय... कृष्ण नवसाला पावणारा देव नाही... त्याला त्यात बांधूही नाही...
कृष्ण ज्ञानरुप आहे, कृष्ण विश्वरूप आहे, कृष्ण चिरंजीव आहे...
..
श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या शब्दाशब्दात आहे... त्या ज्ञानाचा अवलंब करू शकणाऱ्या प्रत्येक माणसात आहे...
बुद्धीर्बुुद्धीमतामस्मि तेजस्तेजस्वीनामहं...
"मी बुद्धीमानांची बुद्धी आणि तेजस्वी लोकांचं तेज आहे.."
भगवद्गीतेच्या अक्षरांत कृष्ण भेटतो... त्याच्या अर्थात कृष्ण भेटतो...
...
गोकुळातला कन्हैया, गायी चारणारा गोपाळ, राधागोपी यांच्यासमवेत खेळणारा केशव, बासरी वाजवणारा माधव, द्वारकेचा द्वारकाधीश, हरी, गोविंद, वासूदेव यांपेक्षा तल्लीन करणारं कृष्णरूप हे जगत्गुरू कृष्ण आहे...
...
भजन, जागरण, दहीहंडी हे आपले खेळ... स्वतःच्या मनासाठी असलेले ... तो जगत्गुरु मात्र त्या निजधामातून शांतपणे हे बघत असेल.. हसत असेल... शांत बसत असेल..
कृष्ण ज्याला समजला त्यालाच प्राप्त झाला... आणि त्यानेच अनुभवला !
राधे राधे बोलणाऱ्यांपेक्षा,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि
हे अवलंब करण्यांना तो प्राप्त होतो. कारण त्याची भक्ती स्विकारण्याची तऱ्हा वेगळी आणि त्याची कृपा करण्याचीही तऱ्हा वेगळीच !
जय श्रीकृष्ण !
#गोकुळअष्टमी
#श्रीकृष्णजयंती
- तेजस कुळकर्णी
 

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved