बाप्पा तू ये...

बाप्पा, कानठळ्या बसवणारी विचित्र गाणी, कर्णकर्कश्श डिजे नसेल, विचित्र हावभाव नसतील, धिंगाणा नसेल, फक्त येतांना मर्मबंधातली ठेव असणारी ती गोड गाणी आठवणीनं घेऊन ये ... अशी चिक मोत्याची माळ, गजानना श्री गणराया ही गाणी तू खूप वर्षांपूर्वीच परत नेलीस.
..
बाप्पा, चॉकलेट मोदक, उंदीर मोदक असले प्रकार नसतील... मस्त तळलेले मोदक, उकडीचे मोदक, खिरापत असू देऊ प्रसादात... तूला स्वतःला मोदक आवडतात... एखाद्या लहानग्याच्या साखर खोबऱ्यात अमृत बघणारा तू... ती अमृताची चव येतांना घेऊन ये...
..
बाप्पा, मला माहितीय, तुला पैसे भरून व्हिआयपी एंट्री मागणारी भक्ती आवडत नाही, घरी तुझ्या फोटो समोर मनोभावे हात जोडणाऱ्या निरागस भक्तावरही तुझी कृपा राहते... देवा त्या भक्तीनेच तुला प्रार्थना करतील, येतांना ती निरागसता फक्त घेऊन ये...
..
बाप्पा, तुझ्या मिरवणुकीत दारू पिऊन झिंगणाऱ्या लोकांचा तुला राग येतो, गणपती बाप्पा मोरया म्हणत उत्साहात चालणाऱ्या भक्तांत तू रमतो... तू भावाचा भुकेला आहेस, बाप्पा येतांना तो भाव फक्त घेऊन ये...
.
बाप्पा तुझं देवत्व महाकाय मूर्तीचं मिंधं नाही, सुपारीतही प्रगटणारा तू, मोठ्ठ्या मूर्तीसाठी का अडून राहशील ? तुझं देवत्व आम्हाला कळत नाही, आम्ही ते राजांत, मूर्तीत  शोधतो, आमच्या आंधळ्या नजरेला ते दिसत नाही...  येतांना ती नजर फक्त घेऊन ये...
...
बाप्पा तुला सार्वजनिक स्वरूप मिळालं ते आमच्या आनंदासाठी, पण तुझ्या भक्तीचा बाजार झालाय. तुझ्या देवत्वाचा बाजार झालाय, बाप्पा आम्ही चुकतो तिथे तू आम्हाला मनसोक्त फटकार, हा बाजार तुला आवडत नाही... बाप्पा तू येतांना या बाजारात हरवलेला तो उत्सव घेऊन ये...
..
बाप्पा तू ये... बाप्पा तू ये... बाप्पा तू ये...
- तेजस कुळकर्णी
(blog.tejaskulkarni.com)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved