फसलेला डाव सुटलेला पेच
११ नोव्हेंबरला संध्याकाळी साडे सात वाजता शिवसेनेचा दावा काँग्रेसने मोडीत काढला त्याच्या नंतर काही मिनिटांतच मी पोस्ट टाकली होती..
"फार मोठा गेम होणार आहे."
मला सारखे वाटत होते की युतीचे सरकार स्थापन होऊ शकत नाही हे नक्की झाल्यावर महाआघाडीचे किंवा भाजप राष्ट्रवादी अशी दोनच कॉम्बिनेशन्स पॉसीबील आहेत. महाआघाडीचे प्रचंड घोळ सुरू होते. पण २२ नोव्हेंबरला रात्री बहुतेक सर्व मुद्दे निकालात निघाले असे चित्र निर्माण झाले होते. त्याच रात्री उशीरा भाजपने खेळी केली.
हा डाव डेंजरस होता कारण तो अजित पवार यांच्या भरवशावर होता.त्यांची मलिन प्रतिमा आहे तरीसुद्धा भाजपने हा डाव रचला.पण याहून अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो संख्येवर अवलंबूनच नव्हता तर कायद्याच्या कक्षेत पण पळवाट शोधून खेळलेला होता. याबद्दल मी अंदाज व्यक्त केला होता तो खरा ठरला.
भाजपने हे का केले असावे ? राजकारण आपल्याला वाटते तसेच केले जावे ही अपेक्षा धरणे मुळातच चूक आहे. तिथे वेळ पडली तर अशक्य वाटणारे निर्णय घेतले जातात. कट्टर समर्थक नाराज होतील हे माहिती असूनही घेतले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे राजकारण सत्तेसाठी केले जाते. सर्वाधिक जागा जिंकून जर बाहेर राहावे लागत असेल तर ती दुर्दैवी परिस्थिती आहे. त्यातून मित्रपक्षाने दगा दिल्यानंतर तर जास्तच.
ज्या आघाडी सरकारने १५ वर्षात राज्याची वाट लावली,जी आघाडी निवडणूक हरली आहे तीच जर मागच्या दरवाज्यातून सत्तेत शिरकाव करत असेल तर ते थांबवणे हे गरजेचे असते.अत्यंत संवेदनशील असे गृहखाते यांच्या हातात जाणे हे धोक्याचे आहे. आघाडी सरकारने केलेला वारेमाप भ्रष्टाचार आणि मुंबई महानगरपालिकेत सेनेनी केलेली मनमानी लक्षात आहे की नाही ? या लोकांच्या हातात सत्ता जाणे हे साफ चूकच होते. निराश भाजप समर्थकांनी याचा विचार करावा.अजित पवार यांना सोबत घेऊन हे करणे अयोग्य पण अपरिहार्य होते.
या खेळीचे यश अजितदादा गटनेते आहेत,ते व्हिप काढू शकणार आहेत यावर आणि फक्त यावरच अवलंबून होते.ती खेळी हमखास यशस्वी होणार याची पूर्ण कल्पना शरद पवारांना होती. अजित पवार यांची जी मनधरणी होत होती त्यामागचे हेच कारण होते.
जर जयंत पाटील नवीन गटनेते आहेत, जर तेच व्हिप असतील, जर हयात मध्ये १६२ आमदार आहेत,जर राष्ट्रवादीचे ५२ आमदार सोबत आहेत तर अजित पवार यांची दर तासाला मनधरणी करण्याची गरजच काय ? त्याचे एकमेव कारण म्हणजे भाजपचा गेम फुलप्रूफ होता. तो उध्वस्त करायचा एकच मार्ग म्हणजे अजित पवार यांना परत आणणे. अजित पवार शेवटच्या क्षणी खचले.म्हणून भाजपचा डाव उलटला.
युतीला मिळालेला सुस्पष्ट जनादेश सेनेने लाथाडल्यानंतर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून सत्ता स्थापन करणे हे न्याय्य होते. ज्या प्रकारे ते शक्य होते तो एकमेव पर्याय भाजपने वापरला पण डाव फसला.
यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटला आहे. युती सोडल्यास कोणतेही सरकार अनैसर्गिक आणि अनैतिक असणार हे मान्य आहे.तसे मी चॅनेलवरील चर्चेत जाहीरपणे सांगितले होते. मग ते फडणवीस यांचे असो की उद्धव ठाकरे यांचे.
या सगळ्या घटनांमुळे एक मात्र चांगले झाले.हिंदुत्ववादी विचारांच्या घरात घुसखोरी केलेली सेना (सेक्युलर) रस्त्यावर आली.
राजकारणात कोणत्याही अनैसर्गिक, व्यभिचारी निर्णयाला किंमत असते.ती योग्य वेळी चुकवावी लागते.पेच जरी सुटला असला भाजपला अजित पवार यांना बरोबर घेऊन खेळलेल्या डावाची तर सेनेला अघोरी निर्णय घेऊन पेच सोडवल्याची किंमत चुकवावी लागणार आहे.कोणाला किती ते कळायला वेळ आहे.
- तेजस कुळकर्णी