Dada

Happy Birthday Dada... आजोबा... काही माणसांचं आपल्या आयुष्यात असणं हेच खूप महत्वाचं असतं. ... ज्यांच्या फक्त असण्याने सुद्धा आपण निर्धास्त असतो... बाहेर कितीही मोठं वादळ आलेलं असू देत, घरी आल्यानंतर कसं वाटतं ? तोच सेफ फील देणारं माणूस माझ्या आयुष्यात आहे... माझे आजोबा ! दादा !! ... माझ्यासाठी माझं छत ! कुठल्याही प्रश्नाचं शेवटचं उत्तर...! एखादी प्रश्न आपण कितीही उड्या मारून सुटत नसेल तर बाकीचे मंदिरात जात असतील, मी आजोबांसमोर जातो. मंदिरातला देव आरामात लक्ष देईल - मग काहीतरी मार्ग दाखवेल - मग त्यावर चाला....... इथे तसं नाहीय - समोर जायचं, प्रोब्लेम काय आहे तो सांगायचा - पुढच्या मिनिटाला आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं असतं... मग ते उत्तर म्हणजे पैसा असू देत, व्यक्ती असू देत किंवा वेळ असू देत... रिकाम्या हाताने परत फिरत नाही...! ...
मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यावर माझ्या मागे पहिली शक्ती उभी राहिली ती म्हणजे माझे आजोबा... त्या निर्णयाचा मनापासून आनंद होणारे कदाचित ते एकमेव आहेत... ते फक्त उभे राहिले नाहीत तर जिथे सांभाळण्याची गरज होती तिथे सांभाळलंही... त्यांचा स्वतःचा साठ वर्षांपासून उत्तमरीत्या सुरु असलेला व्यवसाय आहे - त्यामुळे आपली तिसरी पिढी सुद्धा कुणाची नोकरी न करता व्यवसाय करतेय याचं त्यांना कौतुक आहेच, पण त्यापेक्षासुद्धा या मार्गावर चालतांना जिथे जिथे मी बिथरलो, अडखळलो तिथे हा साठ वर्षांचा अनुभव माझ्यामागे उभा राहीला... तेजूच्या शाळेची जागा बघण्यासाठी दादा स्वतः गाडी घेऊन फिरले...! साथ देणं, विश्वास ठेवणं यालाच म्हणतात... लहान बाळ जेव्हा सायकल चालवायला शिकतं तेव्हा त्याला जो विश्वास असतो ना कि मागून मला पप्पांनी पकडून ठेवलंय - मी पडणार नाही, आणि त्याच विश्वासाने तो शिकतो - इथे सेम तेच... माझ्या पप्पांच्या पप्पांनी पकडलंय... अजून काय हवंय ? ... पिढीतल्या एकाला पणतू पाहण्याचं नशीब लाभतं - इतरांना नशीब वाटतं, त्या माणसाला वृद्धत्वाच्या यातना भोगाव्या लागतात. आपली माणसं गमवावी लागतात... अनेक आघात होऊन सुद्धा माझ्या आजोबांनी या वृद्धत्वाचं खऱ्या अर्थाने सोनं केलंय - १९९९ ला आजी गेली - अश्या टप्प्यावर जिथे दोघांच्या सुखी सहजीवनाची खरी सुरुवात होती... सावरले - आणि स्वतःला व्यवसायात गुंतवून घेतलं, त्यांचा bags निर्मितीचा व्यवसाय वाढवला, वधु वर केंद्राच्या माध्यामातून हजारो लोकांपर्यंत पोहचले... २०१० मध्ये त्यांचा अमृतमहोत्सव झाला आणि त्या सोहळ्याच्या अवघ्या दोन महिन्यात २०११ मध्ये अहमदनगर जवळ राहुरीच्या कोल्हारला त्यांच्या कारला अपघात झाला... त्यात त्याचं नाक तुटून खाली लोंबलेलं... कपाळावर काच घुसलेले... तेव्हा वय होतं ७५ वर्ष... ! १० दिवस प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या क्लिनिक मध्ये राहिलेले... आणि तेव्हा ११ बाटल्या रक्ताच्या द्याव्या लागल्यात... चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागली... तेव्हा फक्त त्यांची इच्छाशक्तीच कामी आली जिने त्यांना सुखरूप घरी आणलेलं..! २०१३ मध्ये माझी आत्या, आत्याचा नवरा, आणि २५ वर्षांची आतेबहीण दोन दोन महिन्याच्या अंतराने गेले... त्या भयाण काळात सुद्धा दादा एकटे खंबीरपणे उभे राहिलेले...! वाटतं तितकं सोप्पं हे नक्कीच नाहीय. ...
मी गाडीवरून पडल्यानंतर दुपारी निघून एक दिवसात ४०० किमीचा प्रवास करून येणारे दादा, मला आवडणारे फाफडा-रशोगुल्ले उन्हात गाडीवर जाऊन आणणारे दादा, दर सहा महिन्याला नवा मोबाईल शोधून तो घेण्यासाठी सात-आठ दुकानं फिरवणारे दादा, किंवा फक्त मी हट्ट करतोय म्हणून पाच तास बसून दात बसवून घेणारे दादा... त्यांच्यामूळेच माझं आयुष्य समृद्ध झालंय... काही ठिकाणं असतात जिथे आपलं बालपण चिरंतन असतं... माझ्यासाठी माझे आजोबा - दादा ती जागा आहे... ... त्यांची दोन महिन्यापूर्वी थोडी तब्येत बिघडलेली, आणि नेमका तेव्हाच माझ्या ज्योतिष्याचा फोन आलेला...! माझा काळजीचा सूर ऐकून त्यांनी कारण विचारलं आणि मी आजोबांना थोडं ठीक नाहीय सांगितलं... तेव्हा ते ज्योतिष होरा बघून बोलले - "काही होत नाही तुझ्या आजोबांना... ते तुझ्या पोराच्या मुंजीत सुद्धा मज्जेत असतील....! " बस्स ! एवढंच हवंय ! .. त्यांचं हेच छत्र माझ्या पुढच्या पिढीलाही मिळू देत... माझा मुलगा/मुलगी त्यांच्या अंगाखांद्यावरच मोठं होऊ देत... आणि माझ्या आजोबांचं आयुष्य आरोग्यमय राहू देत... ! यातच सगळं मिळालं ! .. (आज ८२ संपून ८३ लागलं... आम्ही मार्च - एप्रिल मध्ये सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा करणार आहोत...) (जो पहिला फोटो आहे सफारी ड्रेस मधला पासपोर्ट साईझ, तो अपघाताच्या आधीचा आहे, आणि नंतर माईक वरचा धुळ्यातल्या एका कार्यक्रमातला, फेट्यातला माझ्या लग्नाच्या दिवशीचा... त्यात त्यांची प्लास्टिक सर्जरी झालेली आहे.)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved