Asha Bhosle
घडण्यासाठी सोसलेले घाव, कोंडी, स्वतःच्या बहिणीकडून होत गेलेली स्पर्धा यातही त्या भक्कमपणे टिकल्या, सहनायिकांची, कुणी फेकलेली गाणी मिळाली त्यांचंही सोनं केलं आणि त्या त्रासाचा लवलेशही न दाखवता, झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत त्या जगल्या... वयाच्या ८५ व्या वर्षातही आशा भोसले ही देवी आपल्याला भरभरून देतेय. कौटूंबिक कलह, करीयरमधले अडथळे, मुलीचं निधन यांसारखे संकटं झेलूनही त्या उभ्या आहेत. गायिका म्हणून त्यांनी जे दिलंय ते अफाट आहे, गेल्याजन्मी मोती दान केला तर आवाज गोड होतो - आशा भोसले या देवानं गेल्याजन्मी मोत्यांनी भरलेला समुद्र दान केलेला असावा... गंधर्वाला जन्म देणारी माता मनुष्य रुपात भूतलावर अवतरली.
.
हजारो एव्हरग्रीन गाणी त्यांनी दिलीत. तीन पिढ्या त्या गाण्यांनी मोठ्या केल्या. वयाच्या ८५ मध्ये पण पंचवीशीतल्या नायिकेला साजेशा मादक आवाज त्या देऊ शकतात, एखादं उडत्या चालीचं गाणं बहरवू शकतात, शांत - गंभीर प्रकृतीचं गाणं गातात, स्टेज शो करतात, अवांतर टाळून फक्त गाण्याविषयी बोलतात.. कुठल्याही प्रकारचं गाणं त्या गळ्यातून समृद्ध होवूनच बाहेर येतं... स्वर्गातून मधाची नितधार बरसतेय आणि आपलं मन तृप्त करतेय असं त्यांचं गाणं ऐकतांना जाणवतं... आशा भोसले या नावाची जादूची कांडी फिरली की ते गाणं फक्त स्वर्गीय होतं... गाण्यामूळे आशा भोसले नसतात, त्यांच्यामूळे ते गाणं असतं. ७५ वर्षांची अमृतमहोत्सवी भव्य कारकिर्द या गोष्टीची साक्ष देते.
.
रेखा, मधुबाला, मुमताझ, स्मिता पाटील या नायिका आणि आशा भोसलेंचा आवाज हा सुरेल संगम अनेक गाणी एव्हरग्रीन होण्यात महत्वाचा फॅक्टर ठरला. नायिकांचं स्टारडम बहूतेकदा गाणीच ठरतात. केवळ गाण्यांमूळे अनेक चित्रपट तुफान चालले होते. आशाताई आणि मो. रफी यांची जवळपास सगळीच गाणी अप्रतिम आहेत, सुपरहिट आहेत. नायिकाच नाही तर संगीतकारांची कारकिर्द देखील आशाताईंच्या आवाजाने बहरली, एकमेकांना पूरक ठरली. ओ.पी. नय्यर यांची सुपरहिट गाणी रेखा, मधुबाला, मुमताझ या नायिकांवर चित्रीत आणि आशाताई - मो. रफी यांची आहेत. रेखा, मधुबाला, मुमताझ, स्मिता पाटील यांची देखील सुपरहिट गाणी आशाताईंनी गायलेलीच आहेत. नय्यर आणि आशाताई यांच्या प्रेमसंबंधाच्या वावड्या उठल्या पण त्याचा परीणाम कधीच कामावर झाला नाही. ओ. पी. नय्यर यांच्याप्रमाणेच खय्याम, एस.डी. बर्मन, शंकर जयकिसन, जयदेव यांच्या दिग्दर्शनातील अनेक गाणी त्यांनी दिली. राहुल देव बर्मन - पंचमदा यांच्या गाण्यांना साज चढवतांनाच सूर जूळले आणि आशाताई सौ. बर्मन झाल्या. पंचमदा यांनी आशाताई किशोर कुमार यांना घेऊन एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली. वेस्टर्न टच गाण्यात आशाताईंनी अक्षरशः जीव ओतलाय. १९९० - २००० मध्ये अनु मलिक, ए. आर. रेहमान, बप्पी लहरी, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या गाण्यांनाही आशाताईंचा आवाज लाभला. अर्थात त्या गाण्यांचही सोनं झालं.
.
मराठीत ऋदयनाथ मंगेशकर, बाबूजी यांच्याबरोबर हजारो गाणी आशाताईंनी दिली. आज "मराठी गाणं" म्हणून जर १० गाणी समोर येतात तर त्यात ८ गाणी आशा भोसलेंच्या निखळ आवाजातली असतात.
.
त्यांचं वैयक्तिक आयुष्य अडथळ्यांचं ठरलं. १६ व्या वर्षी दुपटीच्या वयाच्या गणपतराव भोसलेंबरोबर पळून गेल्या. गणपतराव लता मंगेशकरांचे पी. ए. होते. पण नवऱ्याचा आणि कुटूंबाचा छ्ळ असह्य झाल्यानं पंधरा वर्षात ते नातं संपलं. नंतर १९८o मध्ये पंचमदांबरोबर त्यांचा विवाह झाला, जो पंचमदा यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकला. आशा भोसले यांनी गणपतरावांचं नांव नावापुढे लावलंय. गाता गळा साक्षात अन्नपूर्णा आहे. आशाताई उत्कृष्ठ स्वयंपाकासाठीही ओळखल्या जातात. लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि गीता दत्त यांच्यासारख्या सेट गायिका असतांनाही - बी ग्रेड चित्रपटांत गाणी गाऊन, संघर्ष करुन त्या उभ्या झाल्या. घडल्या. तिसरी मंजिलच्या आजा आजा या प्रसिद्ध पण तितक्याच कठीण गाण्यासाठी आशाताईंनी जीव तोडून मेहनत केली, आणि परफेक्ट रेकॉर्ड झाल्यावर पंचमदानी शंभराची नोट त्यांना बक्षिस दिली. तेव्हापासून कलाकारांना शंभर रुपये बक्षिस देण्याची पद्धत आहे.
.
त्यांना कर्तृत्वाचा अभिमान आहे, तो असावा - पण गायिका म्हणून त्यांनी जे दिलं - देताय ते बहूमूल्य आहे. संगीतक्षेत्रातल्या साक्षात सरस्वतीचा अवतार म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. तीन पिढ्यांचे कान तृप्त करून स्वर्गीय मधाची नितधार मनात उतरवणाऱ्या या देवीचा आज जन्मदिवस. वयाच्या ८५ मध्येही टवटवीत फुलासारख्या आहात, आवाजाचा सुगंध देत आहात... शंभरीतही असंच गात रहा... आयुष्याचा आणि कारकिर्दीचा शतकमहोत्सव साजरा करा... आशाताईंच्या निरोगी आयुष्यासाठी मनापासून सदिच्छा... ! :-) :-)
*touchwood ** #AshaBhosle
- तेजस कुळकर्णी