संक्रांत : समज - गैरसमज

मकरसंक्रांती दिनाविषयी बरेच गैरसमज आहेत. (१) हा उत्तरायण आरंभदिन आहे- अजिबात नाही. सध्या उत्तरायण आरंभदिन २२ डिसेंबर आहे. (२) मकरसंक्रांती नेहमी १४ जानेवारीला येते- सध्या १४ जाने ला आहे. पण ती १५-१६ कडे पुढेपुढे जात रहाणार आहे. मात्र अतिशय मंद गतीने. जेव्हां ती १६ ला जाईल तेव्हां आपण कोणी जिवंत असणार नाही ते पहायला. काही झाले तरी मकरसंक्रांती आता मागे १३ जानेवारीकडे जाणार नाही.
मकरसंक्रांती या सणाचा संबंध सूर्याचे राशीसंक्रमणाशी आहे. तिथींशी किंवा ईसवी सन दिनांकांशी नाही. सूर्य एका राशीतून दुसरे राशीत प्रवेश करतो, तो संक्रांतिदिन. अशा १२ राशींच्या १२ संक्रांती आहेत. पण महत्त्व मकरसंक्रांतीला आलेले आहे. कारण, सुमारे १७६८ वर्षांपूर्वी सूर्याचे उत्तरायण मकरसंक्रांतीला सुरू व्हायचे. आता ते २२ डिसेंबरला म्हणजे सूर्य धनु राशीत असतांना होत आहे. म्हणजे आता आपल्याला उत्तरायण आरंभदिन साजरा करायचा असेल तर खरे तर धनुसंक्रांत साजरी करायला हवी, पण आपण अजूनही मकरसंक्रांतच साजरी करीत आहोत. हा निव्वळ वेडगळपणा आहे.
इथे राशी हा शब्द निरयन राशी या अर्थाने वापरलेला आहे. आपली भारतीय, हिंदू परंपरा जास्त करून निरयन राशी वापरते. (सायन क्वचित). सायन आणि निरयन यांतले अंतर मी मागे एकदा सांगितलेले आहे.
पुन्हा थोडक्यात सांगतो. सायन राशी या केवळ सूर्य व पृथ्वी यांचे नात्यावर आधारित आहेत. तर निरयन राशी सूर्य, पृथ्वी आणि आकाशातले तारेही लक्षात घेते. राशी म्हणजे आकाशातील निरनिराळे तारकासमूह. ते १२ कल्पिलेले आहेत  मेष ते मीन. प्रत्येक राशीविभाग पृथ्वीशी ३० अंश कोन करतो. १२ राशी मिळून एकूण ३६० अंश होतात. म्हणजेच सूर्यप्रवासाचे पृथ्वीभोवती आकाशातील ता-यांमधून एक वर्तुळ पूर्ण होते.
शाळेत आपण पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे शिकलेले आहोत. पण खगोलशास्त्रात सर्रास उलटे मानले जाते. त्यामुळे काही बिघडतही नाही. आपण सूर्य उगवतो. आकाशात चढतो, मध्यान्ही येतो. मावळतो असे सर्रास म्हणतो. खरे तर सू्र्य जागेवरच असतो. पृथ्वी फिरत असते. पण आपण उलटे बोलतो. तसेच हे आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असली तरी पृथ्वीकराचे दृष्टीने सूर्यच पृथ्वीभोवती नक्षत्रांमधून फिरत असतो. याला पृथ्वीकेंद्री ( geocentric) विचारपद्धती म्हणतात.आपल्या व पश्चिमी आधुनिक समजल्या जाणा-या शास्त्रातही हीच पद्धत रूढ आहे.
सायन पद्धतीत मेष राशीचा आरंभ वसंतसंपाताचे दिवशी ( साधारण २१ मार्च ) सूर्य आकाशात जिथे असतो तिथून मानला जातो. तर निरयन पद्धतीत तो आश्विनी नक्षत्राचे आरंभी मानला जातो. आश्विनी नक्षत्राचा आरंभ आणि निरयन मेष राशीचा आरंभ हे आकाशात एकेच ठिकाणी आहेत. आश्विनी नक्षत्रविभागाचा आकाशातला आरंभ ठरवतांना चित्रा ता-याची मदत घेतली जाते. चित्रा तारा, पृथ्वी व सूर्य एका सरळ रेषेत आले की सूर्यापलीकडे आकाशात आश्विनी नक्षत्रविभागाचे आरंभस्थान आहे. हे थोडे ढोबळपणे लिहितो आहे. कीस काढीत गेलो तर वाचकांना फारच गुंता होईल. नि ते थोडक्यात आटपणारही नाही.
संक्रातीचे दृष्टीने हे लक्षात ठेवायचे की संक्रांतिसण सूर्य निरयन मकरराशीत प्रवेश करतो तेव्हां असतो. त्याचा ईसवी दिनांक, तिथी यांचेशी काही संबंध नाही. आत्ता आपल्याला १४ जानेवारी योगायोगाने कायम दिसतो. परंतु तेही पुढे बदलणार आहे. आता मकरसंक्रांती सण साजरा करणेत अर्थ नाही. कारण, त्याचा उत्तरायणाशी काही संबंध उरलेला नाही. जो १७६८ वर्षांपूर्वी होता.
.
साभार
श्री रविन्द्र खपडेकर
(https://www.facebook.com/rkhadpekar)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved