हास्य बांधतोय (Tushar Kulkarni)

= हास्य बांधतोय =
.
चार महिन्यांपूर्वी मी धुळे पंचायत समितीत सिव्हिल इंजिनियर पदावर रुजू झालो. आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला, आयुष्याकडे बघण्याला वेगळा अर्थ मिळालाय.. लोकांचं स्वप्न त्यांच्या डोळ्यातून प्रत्यक्षात उभं राहतांना बघणं ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे... आणि तो आनंद मला रोज अनुभवायला, त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न बघायला मिळतंय.
.
प्रधानमंत्री, इंदिरा आवास, शबरी इ. योजनांच्या खेडोपाडी लाभार्थ्याना शासकीय अनुदानित घरासाठी माध्यम देणे, घर बांधकामावर देखरेख करणे, अनुदानाची प्रक्रिया करणे या कामासाठी मी गावांमध्ये साईट व्हिजीटला जातो. आणि या व्हिजीटस् नी मला जगणं शिकवलंय !
..
तळागाळातल्या लोकांची परीस्थिती खुप वाईट असते. पडकी, कुडाची घरं, एकवेळ जेवायला मोहताज लोकं आहेत... असाच काल घरकुल कामासंबंधी एका गावात गेलो... नेहमी प्रमाणे संबंधीत गावातील सरपंच ग्रामसेवक शिपाई यांना मी येणार आहे हे सांगीतले... आमच्या साईट व्हिजीट सुरू झाल्या... त्या त्या लाभार्थ्याकडे गेल्यानंतर हातातलं काम सोडून साहेब आले म्हणत समोर आले... साहेब आले आहेत आता आपल्याला नवं घर मिळणार... आपल्या घराचं स्वप्न डोळ्यात साठवून, उत्साहात ती माणसं त्या २७० स्के. फुटमध्ये स्वप्नांचा महाल, त्यांचं विश्व बांधतात... इथे आमचा दरवाजा असेल, आम्ही असं करू... आपलं घर होणार.... ! कोणत्या न कोणत्या चिंतेत असलेला त्या माणसांच्या डोळ्यात चमक येते, उत्साह येतो... त्या वेळी ते मला देवासारखं ठेवतात... त्यांची स्वप्न डोळ्यात दिसतात...
...
घर हे घर असतं... २७० स्वे. फुट असो वा २७००० स्के. फुट.. तिथे राहणारा त्या जागेचा राजा असते...
.
गरीब माणसं, त्यांची स्वप्न, त्यांचं मन हे जाणून घेणं, त्यांना दिशा देणं हे देवाचं काम मिळालंय... ती माणसं निरागस असतात.... त्या लोकांच्या चेहऱ्यावर मिळणारं समाधान लाखमोलाचं. त्यांच्या स्वप्नमहालाची एक वीट माझ्या हातून ठेवली जाते... हे परमभाग्य !
इतकंच !
- तुषार कुलकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved