अक्षय_तृतिया
#अक्षय_तृतिया खान्देशात आखाजीला मुलींना गौराई म्हणुन माहेरी आणले जाते. गल्लीच्या मधोमध मोठे झोके बांधुन मुली हे गाणं म्हणतात. माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते. चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय वैशाखाचं उन्हं खडक तापुन लाल झाले वं माय तापुन झाले लाल आईच्या पायी आले फोड वं माय पायी आले फोड आईची बेगडी वाव्हन वं माय बेगडी वाव्हन तठे काय कन्हेरानं झाड वं माय कन्हेरानं झाड माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात. आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं ...