अक्षय_तृतिया

#अक्षय_तृतिया
खान्देशात आखाजीला मुलींना गौराई म्हणुन माहेरी आणले जाते.
गल्लीच्या मधोमध मोठे झोके बांधुन मुली हे गाणं म्हणतात.
माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.
चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय
वैशाखाचं उन्हं
खडक तापुन लाल झाले वं माय
तापुन झाले लाल
आईच्या पायी आले फोड वं माय
पायी आले फोड
आईची बेगडी वाव्हन वं माय
बेगडी वाव्हन
तठे काय कन्हेरानं झाड वं माय
कन्हेरानं झाड
माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्‍या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.
आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना, झुयझुय पानी व्हायं वं
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं
माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो
बन्धु मना सोन्याना सोन्याना, पलंग पाडू मोत्याना
आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना झुयझुय पानी व्हायं वं
झोके घेत मुली गाण्यातुन आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.
वाटवर हिरकनी खंदी वं माय
संकर राजानी खंदी वं माय
वाटवर जाई कोनी लाई वं माय
संकर राजानी लाई वं माय
जाईले पानी कोनी घालं वं माय
संकर राजानी घालं वं माय
जाईले फुल कोनी आनं वं माय
संकर रानाजी आनं वं माय
गौराईना गयामां माय कोनी घाली वं माय
संकर राजानी घाली वं माय
इथे एखादी हळुच एखादी सखीच्या कानात कुजबुजते आणि सासरची व्यथा मांडते.
गौराई नारय तोडी लयनी
वं माय तोडी लयनी
इकाले गयी तं देड पैसा
वं माय देड पैसा
सासुनी सांग्या मीठ मिरच्या
वं माय मीठ मिरच्या
सासरानी सांगी तंबाखु
वं माय तंबाखु
देरनी सांगा झिंगी भवरा
वं माय झिंगी भवरा
ननिन्दनी सांगा ऐन दोरा
वं माय ऐन दोरा
पतीनी सांगा पान पुडा
वं माय पान पुडा
या संसारले हात जोडा
वं माय हात जोडा
आखाजीचे दिवस निघुन जातात. आता सासरी परतायची वेळ येते. गौराईचा नवरा तिला घ्यायला सासुरवाडीला येतो. माहेरचा पाहुणचार घेउन गौराई सासरी निघते. नवर्‍याच्या रथाबद्दल सांगतांना कौतुकाने म्हणते.
गडगड रथ चाले रामाचा
नि बहुत लावण्ण्याचा
सोला साखल्या रथाला
नि बावन्न खिडक्या त्याला
बायनी लावली खारीक
बापसे बारीक
बायनी लावली सुपारी
बापसे बेपारी
गौराईला सासरी धाडण्याकरता एकच लगबग सुरु होते. आईबाबांची लेकीला माहेराहुन देण्यासाठी पापड, कुरड्या, शेवया,लोणचं अशा सामानाची बांधाबांध. इकडे आपली गौराई पण हुश्शार! ती स्वत:च शिंप्याकडुन साड्या आणते, सोनाराकडुन हार विकत घेते, वाण्याकडे जाउन नारळ घेउन येते.
काया घोडानी काय मन्ही गौराई
इन्हा प्रताप चालस ठाई ठाई
प्रताप कोन्या वाडी गेला
प्रताप शिंपी वाडी गेला
शिंपी उठला घाई घाई
साड्या काढल्या नवलाई
सोनार उठला घाई घाई
नवसर हार लयी येई
वाणी उठला घाई घाई
नारय लयी पयी पयी
सासरी जातांना निरोप घेतांना गौराईच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाणी तरारतं. आता भेट दिवाळीनंतरच म्हणजे सहा महिन्यांनी. दाटुन आलेला कंठ आणि भरल्या आवाजात ती आईला म्हणते, "धाकट्या भावाला घ्यायला नको पाठवुस गं. घनदाट आंबराईत त्याचा जीव घाबरतो. म्हणुन मोठ्या भावाला मला घ्यायला पाठव."
आखाजी दिवायी सहा महिनानी लाम्हन
भाऊसे पाव्हन मझार दसरा जामिन
धाकला मुराई नको धाडजो
माय बाई आंबानी आमराई
राघो मैनाना जीव भ्याई
(साभार)
अमित सोनवणे, नंदुरबार
(https://www.facebook.com/amitpso)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved