BooksDay पुस्तकदिन

#पुस्तकदिन
शनिवार-रविवारची निवांत दुपार, गॅलरीमध्ये खूर्चीवर बसून दोन्ही पाय कठड्यांवर ठेवून बाजूच्या टेबलवर "माझा" चा भरलेला ग्लास, आणि हातात पुस्तक...
एक एक घोट गळा तृप्त करतं...
एक एक अक्षर मन समृद्ध करतं... !
त्याला ना भाषेचं बंधन ना विषयाचं...
कधीतरी ती मराठीतली कादंबरी असते, कधी गुजराथीतलं एखादं मासिक, हिंदीतली चित्रकथा किंवा कुठल्यातरी विषयावर इंग्लंडमधल्या कुणीतरी लिहीलेला प्रबंध... ते साहित्य असतं - काव्य असतं - गुढ असतं - विज्ञान असतं किंवा गणित असतं...
हातात पुस्तक आहे ते वाचायचंय... !
तो लेखक समोर बसून त्याचा विषय मांडतो - त्यात जिवंतपणा आणतो, आणि तो विषय आपल्या मेंदूतल्या कुठलातरी कप्प्याची जळमटं काढून तिथे रहायला येतो...
आणि आपण त्या नव्या बिऱ्हाडाचं आनंदाने स्वागत करतो.. !!
...
रोज रात्री भगवद्गीता नव्याने काहीतरी सांगते,
मनाच्या एका श्लोकातून समर्थ काहीतरी देऊन जातात.. !
कधीतरी आपली जुनी डायरी (जे स्वतःपूरतं पुस्तक असतं) भूतकाळातलं पीस अलगद फिरवून जातात...
...
"पुस्तक"... खरं तर खजिना... मी चार मोठी कपाटं हा खजिना जपून ठेवलाय... सॉर्टेड, त्यात हल्ली इ-बूक चे पेनड्राईव्ह सुद्धा व्यवस्थित ठेवलेय.. माझ्याशिवाय कुणीच त्याला हात लावत नाही..
कादंबऱ्या, नोव्हेल्स, मासिकं, विषयवार पुस्तकं, ग्रंथ, अगदी ७ वी ते एम. ई, एम टेक, एम बी ए पर्यंतची जवळपास सगळ्या विषयांची पुस्तकं, गणिताची पुस्तकं तर शेकड्यात आहे,  चित्रकथा, प्रवासवर्णनं, गोष्टी, कवितासंग्रह, प्रबंध...
आणि या अद्भूत खजिन्याचा मालक मी... !
ही फिलींग जबरदस्त आहे..
...
पुस्तकांशी कधी जोडला गेलो ?
खूप आधी ! वाचायला शिकलो तसा .. आजीनं मराठी वाचायला लिहायला शिकवलं.
तेव्हा चित्रकथा वाचायचो, पुढे पहिली दुसरीत अकबर-बिरबलने प्रचंड वेड लावलं, सोबत बालभारती, परीसर अभ्यास वगैरे होतंच... चंपक चं गारूड झालेलं... साधारण तेव्हाच पुस्तकं आयुष्यात आली... ! चौथीत असतांना "मला आवडलेलं पुस्तक" वत्कृत्व स्पर्धेत बक्षिस मिळालं आणि पुस्तकांवर जीव जडला...
पुढे हिंदी आणि इंग्लीश...
जग हातात आल्यासारखं झालं...
वय वाढलं तसं विषयाचा गाभा - वाचण्याचं व्यसन वाढत गेलं..
वाचण्याचं वाढलं - तर लिहीण्याचं वाढलं...
पुस्तकं माझ्यासाठी जीव झाली...
एक दिवसात २०० पानं खाऊ शकेल तसलं काहीसं...
ते वेड आजही आहे !
...
फेस"बूक" ही तसंच एक !
...
पुस्तकदिनी लेखकांचे - प्रकाशकांचे मनःपूर्वक आभार,
"देणाऱ्याने देत जावे - घेणाऱ्याने घेत जावे..."
ते घेण्याची शक्ती प्रत्येक वाचकात मरेपर्यंत राहू दे...
...
शेक्सपिअर ते पु. ल., गालीब ते सुरेश भट, श्यामची आई ते मधुबाला, महाभारत ते काळं पाणी, ब्लॅकहोल टू कौन्तेय, आर्यभट्ट ते आर्मस्ट्रांग व्हाया सबकूछ ... जे समोर येईल ते वाचत रहायचं... भाषेचं बंधन झुगारून... !
हा प्रवास चालू आहे, चालू राहणार
""घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे"...
- कधीतरी या ज्ञानसागरात एक थेंब माझ्याही पुस्तकाचा अर्पण होईल या अपेक्षेसह... !
.... !!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved