लॉरेल अॅन्ड हार्डी - भाग १

लॉरेल अॅन्ड हार्डी : भाग १
.
"मला कळू शकेल कां तू काय करत आहेस ?"
- "हे बघ.... आपल्याला ४०० डॉलर्सचा... फायदा झाला आहे..."
"आपण नाश्ता करूया कां ?"
- "आधी आपण घरी जाऊ"
आणि लॉरेन भोकाड पसरतो...
.
मी पाच-सहा वर्षांचा असतांना रोज संध्याकाळी ६ वाजले की सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर वेस्टर्न ट्रामचं संगीत आणि आपल्याकडे घोडागाडीला असतो तसा पॉssss भोंगा वाजायचा... रड्या लॉरेन अॅन्ड जाड, छोटी मिशी असलेला हार्डी अवतरायचे.... १९००-१९२० मधलं जून्या पद्धतीचं वेस्टर्न वातावरण, धडपडे कलाकार, बर्फ (स्नोफॉल), शेकोटी असलेली तिथली घरं यांनी अक्षरशः वेड लावलं होतं.
(ते बघून बघून इतकं सवयीचं झालं होतं, की माझा मागचा जन्म तिथला आहे, आणि मी तिथे सगळं ओळखतो असं एक दोनदा त्या वयात बडबडलो होतो - आई सांगते.)
.
लॉरेल अॅन्ड हार्डी इतके बिंबले कारण मातृभाषेतून मराठीतून या जगप्रसिद्ध कलाकारांशी पहिली ओळख झाली... हार्डीचं माहित नाही, पण लॉरेलचा मराठी आवाज डॉल मेघना एरंडेने दिला आहे, जो आज पण कानात घुमतो आणि अति गोड आहे. दोन वर्ष चालल्यानंतर ती सिरीज बंद झाली, पण तोपर्यंत तिर धनुषसे निकल चुका था... यांचं वेड भिनलं होतं.घरी भांडून, गळा फाडत रडून, हातपाय आपटून मी लॉरेल अॅन्ड हार्डीचं आणि तुषारने मि. बीनचं १२x१२ चं पोस्टर लिव्हींग रुम मध्ये लावलं होतं. ज्यामुळे लिव्हिंग रुमचा शो अति बिघडला होता. आणि येणाऱ्या जाणाऱ्याला बळजबरी मी L&H, तर तुषार मि. बिनचे किस्से ऐकवायचो...
.
चार्ली चॅप्लीन, मि.बिन याप्रमाणे लॉरेन अॅन्ड हार्डी जोडी पूर्णपणेे हास्यपटाला समर्पित होती. इंग्लिशमॅन बालीश स्टॅन लॉरेल आणि जाड शरीरयष्टीचा अमेरीकन ऑलिवर हार्डी या जोडीनं duet कॉमेडीनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आधी कॉमिक रुपात असलेल्या पात्रांना नंतर नाटक आणि चित्रपटात बघून लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. १९२१ च्या द लकी डॉग पासून सुरु झालेला प्रवास १९५४ च्या धिस इज यूअर स्टोरी पर्यंत प्रचंड चालला...
.
लॉरेलची निरागसता, बालीशपणा,  हार्डीच्या समंजसपणाचा देखावा आणि त्या दोघांची जीवापाड मैत्री या थिमवर लॉरेल अॅन्ड हार्डी तब्बल एक शतक जगभराच्या प्रेक्षकांवर राज्य करताय.
.
या अजरामर कलाकृतीला पुढचे काही दिवस दररोज एक लेख लिहून जीवंत करणार आहे... लॉरेल अॅन्ड हार्डीच्या रिअल आणि रिल लाईफवर टाकलेल्या प्रकाशाचे हे पहिले पुष्प :-) :-)
- तेजस कुळकर्णी
#LaurelAndHardy

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved