Rasta रस्ता


=रस्ता=
तीन वर्षांपूर्वीची सत्य घटना आहे. अशीच जून-जुलै मधली. मी, केदार, प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो. तेव्हा आलेला हा भयाण अनुभव.
.
आम्ही चौघं इनोव्हा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहचलो. कारंजा म्हणजे दत्तसंप्रदायातील महत्वाचं स्थान. तिथे तासभर थांबायचं आणि पुढे ११० किमीवर असलेल्या माहूरला निघायचं, असं ठरलं होतं. पण पावसामूळे आणि गाडीने नाटकं केल्याने कारंजात पोहचायला रात्रीचे ८ः३० वाजले. तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत १०:०० झाले...  पाऊस सुरूच होता... गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम... त्यामुळे पुढे जावं की नाही, हा प्रश्न होता. हो हो नाही नाही करत १०ः३० वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं... ड्रायव्हिंगचं तसं टेंशन नव्हतं... पण तो भाग आम्हाला नवा होता, शिवाय पाऊस... ! सुट्टीचं नियोजन असल्याने वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण ट्रिप करायची होती... म्हणून हळू हळू पोहचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच... त्या आधी मंदीराजवळ गाडी पार्क केली तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या दोन गुरुजींनी आम्हाला शेगांवला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली. त्यांनाही बरोबर घेतलं आणि बसस्थानकात सोडलं...
तिथून थोडं पुढे आल्यावरच प्रसादला सिटवर एक बॅग दिसली. त्या एका गुरुजींची बॅग राहील्याने आम्ही ती देण्यासाठी परत बस स्टँडवर आलो, पण त्यांना बहूतेक गाडी मिळाली होती. त्यामुळे त्यात नंबर वगैरे असेल तर फोन करुन कळवू म्हणत ती बॅग केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली.... निघालो. आता आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरु झाला.
वेळ : रात्री ११, पाऊस आणि काळोख...
.
कारंजा ते माहूर हा १५० किमीचा रस्ता तसा आडमार्ग... शांतच ! कारंजा सोडलं की १० किमीपासूनच जंगल सुरु होतं. क्वचितच एखादी गाडी दिसते. चौकातली छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयाण शांतताच सोबत असते. आम्ही निघालो तसं मुसळधार पाऊस पडत होता. थंड वारा, थकवा यामुळे बाकी सगळे ढार झोपले. मी ड्रायव्हिंग करत होतो. पाऊस, काळोख, अनोळखी वाटा आणि भयाण शांतता, त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही... परत अश्यात गाडी बंद पडली तर कल्याण ! थोडी भिती वाटायला लागली... उडी घेतली होती, त्यामुळे या भितीला अर्थ नव्हता... गाण्यांचा व्हॉल्यूम फुल केला, पावसातला शक्य तो टॉप स्पीड गाठला... पण कारंजा ते मानोरा असा ४० किमी प्रवास झाल्यावर मला झोप यायला लागली. म्हणून मानोरात थांबलो... चहा घेतला.
वेळ : रात्री १२
.
आम्ही सरळ रस्त्यावर चालत होतो... किमीचे दगड वगैरे होते. मानोरापुढे २०- २५ कि मी गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते दिसले. त्याठिकाणी थांबलो...
कुठे जायचं ?
तिथे दर्शक फलक नव्हता...
मला कन्फ्यूज झालं.
सुश्याला उठवलं...
एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता. दुसरा जरा तिरपा.
कुणीच नसल्याने विचारता येणं शक्य नव्हतं...
सुश्या - "तेजा कंटिन्यू ट्रॅकच पकड..."
सरळ रस्ता पकडून निघालो...
पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेख दिसेना... ना कुठलं गांव... इतर गाड्यांचा भास पण नाही... फक्त भयाण काळोख, स्मशानशांतता, पाऊस... आणि समोरचा रस्ता... आम्ही रस्ता चुकलो होतो... फिरुन मागे यायचं शक्य होत नव्हतं... (किंवा ते डोक्यात येत नव्हतं)
रात्रीचे दिड वाजले होते... त्या भागात मोबाईललाही रेंज नव्हती... पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी... आणि फूल व्हॅल्यूममध्ये गाणे... एव्हाना सगळे जागे झाले होते... चौघंच असल्याने वैयक्तीक जरी टरकलेली असली तरीही कुणीच दाखवत नव्हतं...
"सुश्या - त्या दोन मध्ये चुकलोय रस्ता... आता सरळ चालू देऊ... फाटा सापडेल"
आम्ही अनोळखी, निर्जन रस्त्यावर चालत होतो.
त्या भयाण वातावरणाचा परीणाम भितीत बदलला होता...
अशात गाडी बंद पडायला नको... हीच मोठी प्रार्थना होती.
.
एखादं गाव येईपर्यंत आहे तोच रस्ता पकडून चालायचं आम्ही ठरवलं. अर्धा पाऊण तास तसाच गेला... पाऊस पडतच होता. त्यामुळे खिडक्या बंद होत्या...
रस्ता संपत नव्हता. अर्धा-पाऊण तास तसंच चालत होतो. गाडी चालवून जाम लागली होती.
पाऊस, थंडी, थकवा आणि भितीचा एकत्रित परीणाम म्हणून निसर्गाची हाक आली... त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता... त्यामुळे फाटा गेला खड्डयात आधी अॅटलिस्ट आडोसा शोधून मोकळं होवू या शोधात असतांनाच...
.
त्या सुमसाम रोडवर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं. त्या शेतातच एक फार्म हाऊस होतं... "फायनली..!"...
इथे मोकळं होवू आणि माहूरचा रस्ता विचारु. आता रस्ता सापडेल आणि पोहचू या भरात मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली...
गाडीतून छत्र्या काढल्या आणि चौघं उतरलो.
केदारने सवयीनं त्याची सॅकही घेतली...
मी आणि सुश्यानं आधी एका बाजूला जाऊन शू केली...
तिथेच पावसात पाय धुतले. कानाला हात लावला आणि घराकडे आलो.
.
जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठ्ठं घर होतं...
शेताच्या एंट्री वर एक लिंबाचं मोठ्ठं झाड,
घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला त्याच्या प्रकाशात बाह्यभाग किमान प्रकाशमान होता.
एक छोटा पोर्च होता.
एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली.... तिच्यापुढे चारा वगैरे पडला होता..
एक कुत्र त्या गाडीखालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेलं...
पाऊस, काळोख
एकुणच भयाण वातावरण...
अचानक सुश्याचं लक्ष कोपऱ्यात गेलं, तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता... त्याचे ते झाकलेले कपडेही पूर्ण कोरडे...
आम्ही चौघं चक्रावलो...
एकुण भयाण वातावरणात ते भितीदायक होतं...
.
रस्ता विचारणं महत्वाचं होतं, आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने
तश्याच चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघं एकमेकांचा हात पकडून त्या पोर्चजवळ आलो...
दरवाजा उघडाच होता, पण आतमधलं दृष्य विचित्र होतं..
आतमध्ये सात ते आठ माणसं तश्याच अवस्थेत डोकं ते पाय पांघरून शांत झोपले होते...
.
घर पूर्ण उघडं होतं... मी आणि सुश्यानं दरवाजा वाजवून ''भाऊ" "दादा" वगैरे हाका मारल्या... पण काहीच फरक पडला नाही.
''तेजा, मध्ये जावूयात कां ?"
.
एखादं प्रेत असावं असं सगळे पडले होते..
मध्यरात्रीच्या झोपेत असावेत बहूदा म्हणून नॉर्मल विचार आला...
त्या भयाण वातावरणात ती विचित्र परिस्थिती अनामिक भिती घालत होती.
पावसात असूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस...
पुतळ्यासारखा स्तब्ध कुत्रा...
खरं तर सगळं समजण्यापल्याड होतं...
.
"बघुयात - एखाद्याला उठवून विचारु म्हणत"
आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्यात
इतक्यात एक गडगडाट झाला... आणि वीज चमकली..
केदारला अचानक काय झालं कळलं नाही...
तो जोरात ओरडला..
"तेजा, सुश्या, प्रसाद.. थांब...."
आमचा पाय ठिकाणीच थांबला...
निघू इथून.. चल... गाडी काढ..."
- काय ? काय झालं तुला अचानक ?
"प्रश्न विचारु नको... गाडीत बस... निघू इथून...
आणि घाईत ओरडत ओढतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं... चल...
आधीच भेदरलेलो आम्ही केदारच्या वागण्याने चक्रावलो..."
याला काय झालं अचानक ?
एकुण प्रकार काय ?
नाटकं करणारी गाडी सहज कशी सुरु झाली ?
.
"सकाळ होईपर्यंत सरळ चालवत रहा... कुठेच गाडी थांबवू नको..."
केदार फक्त बोलत होता... आणि आम्ही कमांड्स ऐकत होतो....
नेमकं काय प्रकरण सुरुय हे उमजेपर्यंत आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो...
सुश्या शांतपणे गाडी चालवत होता...
केदारने गाडीत बसल्या दुसऱ्या मिनिटाला झोप ताणली...
कुणीच काही बोलत नव्हतं..
सगळं कळण्यापलिकडे होतं...
केदारचं वागणंही विचित्र होतं... मी, सुश्या आणि प्रसाद भलत्याच तंद्रीत होतो...
रात्रीचे ३ वाजले होते. पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता...
फूल व्हॉल्यूम म्यूझिक फक्त होतं...
तोच सुन्न रस्ता... काळोख...
.
यात अजून एक गोष्ट होत होती...
ती म्हणजे आम्हाला गोल गोल फिरतोय असंच वाटत होतं...
थकवा असल्याने तंद्रीत असल्याचं वाटून आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो...
पण रस्ता कापणं महत्वाचं होतं. त्यामूळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो. ते गुढ फार्महाऊस, केदारचं वागणं पण डोक्यात होतं...
.
दोन तास आम्ही तसेच सरळ सरळ जात होतो...
किती अंतर कापलं ?
कुठे जातोय ?
काय सुरुय कळत नव्हतं.
एव्हाना पहाट झाली...
पाऊस जवळपास थांबला होता...
५ वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला... "फायनली !"
.
आम्ही तिघं अक्षरशः किंचाळलोच !
(केदार झोपेतच होता)
सुटलो बाबा एकदाचे !
त्या चौकात एकीकडे माहूर, एकीकडे दारव्हा, तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता...
"सापडला रस्ता....!"
माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळलो... आता जरा नॉर्मल वाटत होतं. गाड्या वगैरे ये जा करत होत्या... माहूरचे माईलस्टोन दिसत होते..
हलकं वाटत होतं...
काल रात्रभर डोकं जड झालं होतं...
रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो...
गाडी लावली आणि उतरलो...
खूप रिलॅक्स वाटत होतं... केदारला उठवलं...
चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरु होत्या...
माझी आणि सुशांतची ड्राईव्हिंगमूळे वाट लागली होती...
केदारचं डोकं दुखत होतं..
.
"पण, तुला काय झालं होतं रे अचानक केदार ? का ओरडलास तिथे? काय विचित्र वागत होतास ?"
केदार - "तेजा, आईशप्पथ ! कळतंच नव्हतं रे... अचानक... मी काय बोलत होतो... काय करतोय...  मी करतच नव्हतो... आपोआप होत होतं सगळं..."
केदार खोटं बोलत नसावा... कारण त्याचं वागणं, आमचं ऐकणं चमत्कारीक होतं...
आम्ही जरा चक्रावलो होतो...
तो न संपणारा रस्ता, ते घर, ती माणसं... याच गप्पा सुरु होत्या...
इतक्यात तिथला चहावाला आश्चर्यचकीत चेहऱ्यानं आमच्या गप्पांत पडला..."
" तुमी शेतातल्या रस्त्यानं आल्यात ? तरी वाचलं ?"
..
"क्याय ? काय बोलतोय ?"
"भाऊ, ती माणसं वाचत नसत्यात... भुलभूलैया हाय तो रस्ता... औसच्या राती माणसं गिळत्यात... काल औस आसूनबी वाचल्यात ? पोरांनो.. नशीबवान हायात तुम्ही..."
चहावाल्यानं असं सांगितल्यावर आम्ही पार गोंधळलो... आपलं रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं ?
वाचलं ? काय ?
"एक मिनिट... नीट सांग भाऊ... काय आहे ते ?"...
- "डेंजर होतं भाऊ"... देवाची कृपा समजा... मारुतीला नारळ फोडा.. गुरूंचं दर्शन करा"
चहावाल्या माणसाला बघून खरं तर मी अजून गोंधळलो होतो... त्याचा चेहरा कुठेतरी बघितलेला वाटत होता...
पण चहापुढे ते महत्वाचं नव्हतं...
.
झाला प्रकार भयंकर वाटत होता...
त्यात चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरुन जात होतं.
माहूरला पोहचायची घाई असल्यानं आम्ही या प्रकरणाचा छडा लावणं पुढचं पुढे बघून म्हणून तिथून निघालो...
तासाभरात आम्ही माहूरला सुखरूप पोहचलो.
तिथे दोन दिवसांच्या मजेत झाला प्रवास विसरलो...
रस्ता चुकल्याने १००-१५० किमीचा आम्हाला मोठा फेरा पडला, पाऊस आणि आडमार्ग यामुळे भयाण वाटलं इतकंच डोक्यात होतं...
मग चहावाला काय बोलत होता ?
त्याला आधी कुठे पाहिलं ? या प्रश्नाचं मला उत्तर मिळत नव्हतं... नेमकं आठवत नव्हतं !
.
माहूरहून निघायची वेळ आली.
आम्ही गाडीत बसलो...
मी नेहमी गाडी सुरू करतांना डिझेल, किमी वगैरे चेक करतो... त्या दिवशी पण केली.
कीती कि.मी रिकामं फिरलो याचा हिशोब करायला...
आणि एक मोठ्ठा धक्का बसला...
ज्यामुळे आम्ही सगळेच चक्रावलो...
.
कारंजा ते मानोरा ४० किमी... मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉईंट २० किमी, आणि तो चौक ते माहूर ४० किमी, इतकं जवळपास १००-११० किमीच पुढे सरकलं होतं...  मग रात्री १२:३० ते सकाळी ५ः०० आम्ही अखंड ज्या रस्त्यावर फिरलो ते किमी कुठे गेले ?
त्या रस्त्यावर फिरल्याची नोंदही झाली नव्हती...
ना गाडीतलं डिझेल संपलं होतं...
- " सुश्या भलतीच गडबड दिसतेय..."
- "हो रे ! कळत नाही काय होतंय ते ?
-  चहावाल्याला गाठू..."
- चहावाला काय बोलत होता...
- असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं..
भिती पेक्षा गोंधळ झाला होता... आम्ही जरा चक्रातच प्रवास सुरु केला. यावेळी दिवसाच ! कारण संध्याकाळच्या आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहचायचं होतं... पाऊसही नव्हता...
.
चहाच्या टपरीपर्यंत आलो...
तिथे कुणीच नव्हतं...
हा चहावाला कुठे गेला यार ?
प्रसादनं भैया.. भाऊ करुन आवाज दिला...
रस्त्याच्या दूसऱ्या बाजूनं एक माणूस आलो आलो म्हणत पळत आला...
बोला... काय देऊ ? चहा कॉफी ?
हा कोण चहावाला ?
"ते दुसरे भाऊ कुठेत ?"
तो - कोण दुसरे भाऊ ?
- तेच ! जे परवा होते...
तो - नै तर... परवा पण मीच होता इथं... माझंच हॉटेल हाय... तुम्ही कोणाला भेटलं ?
अजून एक धक्का
परवा भेटलेलं ते कोण ?
चेहरा पण कुठेतरी बघितलेला वाटत होता...
.
रस्ता चुकणं, निर्जन-अनोळखी रस्ता इथपर्यंत ठिक... तसं नॉर्मल होतं. ते घर सुद्धा... म्हणजे विचारांच्या एका चौकटीत बसू शकत होतं..
पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं... केदारचं विचित्र वागणं... तो किलोमीटरचा गोंधळ आणि त्या चहावाल्याने सांगितलं ते सगळं काय होतं ?
तो माणूस गेला कुठे ?
इथे अजून जास्त गोंधळ होत होता...
.
जास्त वाढवण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरू, डोक्याला ताण देण्यानं फायदा होणार नाही... प्रॅक्टीकल विचारांना मनाची साथ नव्हती..
काहीतरी भयंकर नक्की आहे... चौघंही शांत होतो... भिती नव्हती, पण दडपण जाणवत होतं...
.
आम्ही चौकात पोहचलो... चौकातलं दृष्य अजून चक्रावणारं होतं... आम्हाला चक्कर यायचं बाकी होतं... परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो, तिथे एक रस्ता व्हाया मानोरा कारंजाला जातो, एक व्हाया दारव्हा कारंजाला जातो तिसरा रस्ता माहूरकडे जातो... मग चौथा रस्ता ? आम्ही ज्या रस्त्याने या चौकात आलो तो ? तो रस्ता आम्हाला दिसतंच नव्हता...
त्याठिकाणी चौथा रस्ताच नव्हता...
तो रस्ताच गायब झाला होता.
काय प्रकार आहे यार हा ?
याच चौकात आलो होतो ना ? आम्ही सुन्न झालो होतो. 
"हे तीनच रस्ते हाय भाऊ..."
एका वडापवाल्यानं सांगितलं !...
.
डोकं जड झालं होतं. असला प्रकार मन मानत नव्हतं.
कारंजा व्हाया दारव्हा ११० किमी, व्हाया मानोरा १५० किमी...
"सुश्या... आपण बघू काय प्रकार आहे ते ?
दिवस आहे, कोरडा आहे... ४० किमी जास्त तर चालेल..."
.
व्हाया मानोरा हा रस्ता पकडला... सरळ. आणि अगदी नॉर्मल... गाड्या वगैरे होत्या. तो रस्ता गायब असणं ही सीमा होती... गोंधळलेलो होतो...
जिथे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉईंट आता आमच्या नजरा शोधत होत्या... ५०-६० च्या स्पीडनं हळू गाडी चालवत होतो...
मी आणि सुश्या एकही टप्पा सोडत नव्हतो.
आम्ही मानोरात येवून पोहचलो... जिथे मी चहा घेतला त्याच टपरीवर...
चौघं आता सून्न होतो...  शांत होतो...
त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झीट गायब झाले होते...
मग तो न संपणारा रस्ता, ते घर.. हा काय प्रकार होता ?
आमचा भ्रम की अजून काही ?
तो चहावाला.... तो कोण होता ?...
झाला प्रकार अविश्वसनीय होता... पण काय होता ?
.
"भाऊ, ते पुढे २० कि मी वर दोन रस्ते मिळतात ते गांव कुठलं हो ? कुठला रस्ता आहे तो ?" - सुश्यानं चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं !
चहावाल्यानं डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं !
"तुम्हाला तो रस्ता भेटला ? - औसेला ? गेलावता त्यावर ?"
- हो... खूप लांबचा फेरा होता...
- "आगागा... पोरांहो लांबचा नव्हं... मरनाचा फेरा व्हता... त्यावर जो जातो तो परत येत नाय... रस्ता गिळतो त्याला... परत कसं आलंत तुम्ही ?
हे ऐकून आम्ही गोंधळलो... आता इथे बसून काय ते प्रकरण निपटायचंच असं ठरवलं... त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं... ! त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं, स्वतः अनुभवल्यामूळे  ते खोटं ठरवायचा प्रश्नच नव्हता...
"हा भूलभूलैया हाय... चकवा... एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो... अवसेला सापळ्यात अडकतो मानूस... घेरी येते... तुमाला दिसलं कायं ? भायर कसे आले ?  त्या दिसी माझा लेओक व्हता इथं... त्यानं सांगायं राहिलं की आडवी वाट पकडा... औस हाय..."
तो माणूस त्याबाबतीत माहितगार दिसत होता...
मग आम्ही त्या माणसाला ते घर, माणसं, केदारचं विचित्र वागणं वगैरे सांगितलं...
"तुमची घेरी आलीवती, ते घर नाय काळाचं नरडं व्हतं.. आनी ते मानसं नाय म्हडी वती... तुमी तसेच पडले असतां..."
आमच्या पायाखालची जमीन सरकली...  अंगावर शहारे आले...
"औसेच्या राती त्यो रस्ता उघडा होतो... ज्याची घेरी असंल तो त्या वाटंला जातो, आनी फसतो... ज्यानं ती रात काटली तो वाचला... त्यो घरात जो गेला तो मेला... तुमी लै नशीबवान बगा... देवाची किरपा मनून सुटल्यात... लै किस्से ऐकलंत त्या वाटेचं"
...
सगळं चित्र आमच्या समोर आलं...
विश्वास नव्हता, पण नाकारु शकत नव्हतो...
"आम्हीच फसलो कसं ?" यापेक्षा त्या माणसाचा
"तुमी वाचले कसं ?"
हा प्रश्न महत्वाचा होता...
ज्यापुढे कसे फसलो हे गौण होतं...
हादरलो मात्र होतो... आपल्याबरोबर हे कसं घडू शकतं ?
"वाचलो" ! यामुळे आम्ही मनोमन सुखावलो... त्या माणसानं सांगितलं ते खरं-खोटं देव जाणे, पण आम्ही काहीतरी विचित्र, अघटीत अनुभवलं होतं हे खरं होतं..
- तो उंबरठा ओलांडला असता तर ?
- त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर ?
"वाचलो"...
केदारने वेळीच रोखलं म्हणून !
.
यस ! केदार... तूच ! मी, सुश्या आणि प्रशांत केदारकडे थॅंकफुली बघू लागलो... केदार थोडा बावचळला...
केदार - "तेजा, आईशप्पथ ! कळतंच नव्हतं रे... अचानक... मी काय बोलत होतो... काय करतोय...  मी करतच नव्हतो... आपोआप होत होतं सगळं..."
"भाऊ तुमी कारंजात मंदीरात पाठक भटजींना भेटा... समदं सांगतीत ते"
चहावाल्याने सांगितलं...
.
आम्ही कारंजात आलो...
पत्ता विचारून पाठक गुरुंजींकडे गेलो... ते मंदिरातच होते... तिथे जाऊन भेटलो...
माझ्या स्नेहबंध मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली. त्यांनी आम्हाला मंदिरापुढे एका रुममध्ये नेलं... शांततेत बोलू...
आम्ही त्यांना घडला प्रकार, चहावाल्याचं बोलणं सविस्तर सांगितलं...
- "तुमची घेरी आली होती हे खरंय... पण महाराजांच्या कृपेने वाचलात. दैवी शक्ती होती तुमच्यासोबत...
म्हणजे केदारच्या हातून कुठलीतरी चांगली शक्ती आमचं त्या वाईट स्थितीत रक्षण करत होती... मार्ग दाखवत होती  (?)
पाठक गुरुजींनी एक हिंट फक्त दिली... आणि परत गेले...
दैवी शक्ती ? आमच्यासोबत ?
.
आम्ही आधीपासूनच्या एक एक पैलू वर विचार सुरु केला...
रस्ता चुकणं, निर्जन-अनोळखी रस्ता ... ते घर,
पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं... केदारचं विचित्र वागणं... तो किलोमीटरचा गोंधळ, दोन्ही ओळखीचे वाटणारे चहावाले...
यातली बरीच उत्तरं मिळाली. पण नवीन प्रश्न देऊन..
.
दैवी शक्ती कोणती ?
केदारचं विचित्र वागणं होतं ? पण केदारच का ?
याचं उत्तर शोधायला लागलो... कारण त्याशिवाय मूळ सापडणार नव्हतं
आम्ही चौघे मित्र सोबत होतो....
चौघंही उपनयीत...
शाकाहारी...
मी आणि सुश्यानं शू केली होती. केदार नं नाही... पण प्रसादपण तर तिथेच होता...
एक एक गोष्ट पडताळून पाहिली आणि तेव्हा सुश्याला अचानक ट्रेस झालं... "सॅक"... केदारच्या पाठीवरची सॅक... हा एकमेव फरक चौघांत होता...
"केदार सॅक दे..."
मी केदारची सॅक उघडली...
त्यात त्याच्या रोजच्या वस्तू शिवाय आणखी एक वस्तू होती...
एक महत्वाची कडी सुटली होती...
आम्हाला आमची सगळी उत्तरं तिथेच मिळाली...
.
माझे डोळे विस्फारले गेले...
सगळं चित्र माझ्यासमोर आलं... डोळे पाणावले...
.
"फ्रेंड्स.... आपण एक महत्वाची कडी विसरत होतो... ते दोन गुरुजी आठवतंय ? आपण त्या दिवशी त्यांना बसस्टँडवर सोडलं... ! त्यांची बॅग राहीली... केदारच्या सॅकमध्येच ती बॅग होती..."
- पण त्या बॅगचा, गुरुजींचा काय संबंधय ?
- "अरे संबंध आहेच... तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा..."
- "ओहss माय गॉड... यस यस तेजा... यस"
- "मी म्हणालो ना... ओळखीचा चेहरा आहे... तेच गुरुजी.... ! आता मानोरातले ते म्हातारे चहावाले आठवा... हे ते दुसरे गुरुजी ...!"
- "यस... म्हणून चेहरा ओळखीचा वाटत होता..."
आम्ही अनुभूतीच्या उंबरठ्यावर होतो...
मी ती बॅग उघडली...
त्यात "श्री गुरुचरीत्र" ग्रंथ होता. त्या भयाण वाटेवर आम्ही जे निर्णय घेतले,
सरळ चालत राहू
थांबायचं नाही
त्या घरात प्रवेश करायचा नाही...
गाडी सुरळीत चालणं हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता...
त्या शक्तीने अमावस्या संपेपर्यंत आमचं रक्षण केलं...
.
केदारच्या सॅकमध्ये हा ग्रंथ होता, आणि ती सॅक त्याच्या पाठीवर...!
फक्त केदारच कां ? या प्रश्नाचं हे उत्तर होतं...
.
आता चौघांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली...."
"देवाची कृपा समजा... मारुतीला नारळ फोडा.. गुरूंचं दर्शन करा"
"तुमी लै नशीबवान बगा... देवाची किरपा मनून सुटल्यात..."
त्या दोन्ही चहावाल्यांचे शब्द आठवले...
आम्ही सुखरुप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर होतं...
ते कुणीतरी अवतारी असावेत...
त्यांचं गाडीत बसणं,
बॅग विसरणं हे सहज नव्हतं. आमच्यावर पुढे येणारं संकट ओळखून त्यांनी निर्माण केलेलं ते सुरक्षा कवच होतं...
आणि त्या संकटाच्या काळातही त्यांची आमच्यावर नजर होती...
आम्ही चौघं त्याच रुममध्ये पाणावल्या डोळयांनी शांत बसलो...  चौघंही गुरुचरीत्राचं दरवर्षी पारायण करतो,
गुरूंची अश्याप्रकारे अनुभूती मिळेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं
आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला...
.
तो भयाण गुढ रस्ता, चकवा, घेरी, ते घर, ती प्रेतं हे सगळं आजही स्वप्नवत वाटतं... ती रात्र तो प्रवास आमच्या आयुष्यातल्या भयाण रात्रींपैकी एक होती...
तेव्हा काय प्रसंग उभा होता, काय झालं असतं ?
गुरुचरीत्राचा जागृत ग्रंथ, महाराजांवर दृढ विश्वास कवच होवून आला...
तो ग्रंथ माझ्याकडे आहे. दरवर्षी त्याचं पारायण करतो...
.
काळ आला होता... वेळ आली नव्हती...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved