शंभराची नोट

काही गोष्टी या कालातीतअसतात...
आणि त्या गोष्टींवर माझं खूप प्रेम आहे...
काही नोटा पण...
एक रुपयाची नोट, एक रुपयांचं जुनं जाडसर नाणं, दोन रुपयांची नोट, पाचचं जुनं डबल लेअर्ड नाणं, दहाची काळी नोट, वीस रुपयांची लाल नोट (ही छान दिसते, म्हणून), पन्नासची अशोकस्तंभ असलेली नोट, आणि शंभराची ही नोट...
हे मी जपून ठेवतो... काहीही झालं तरी खर्च करत नाही...  का ते माहित नाही, पण अश्या गोष्टींवर पटकन जीव येतो... त्यांना पुढे पाठवण्याचा विचारही येत नाही... पाठवतही नाही...
...
ही नोट आत्ता फिरत फिरत आली आणि माझी झाली... तिच्यावर साल लिहीलेलं नाही, पण सी रंगराजन गर्वनरची सही आहे... ते १९९२ ते १९९७ गर्वनर होते... त्यामुळे १९९३ ते १९९६ दरम्यानची आहे... २० वर्ष लाखो हात फिरत फिरत आज माझ्यापर्यंत आली... !
.
या नोटा जपून ठेवण्याचं दुसरं एक कारण की शेती, विज्ञान, धर्म हे विषय सुद्धा नोटांवर एकेकाळी होते... हे माहीत असावं, याची आठवण असावी... अर्थव्यवस्थेचं प्रतिबिंब त्यात होतं... या नोटेत शेती, धरण, विजेचे खांब, ट्रॅक्टर आहे... २० वर्षांपूर्वी भारतात होत असलेली कृषीक्रांती, प्रगती यातून अधोरेखीत केली आहे... जे तेव्हाच्या अर्थव्यवस्थेला पूरक होतं, त्याला अर्थही आहे...!
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved