Nitin Gadkari

नेत्यांमध्ये फार थोडी नावं आहेत ज्यांची भक्ती करावी... ! नितीनजी गडकरी हे त्यातलंच एक नांव... चाणाक्ष, हुशार, कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू माणूस... आपल्याला मिळालेल्या जबाबदारीची जाणिव ठेवून निरपेक्ष भावनेने ते विकासाचं काम करत असतात... इन्फ्रास्ट्रक्चर - रस्तेबांधणीमध्ये या माणसाच्या प्रशासकीय बुद्धीमत्तेची बरोबरी कुणीही करू शकत नाही... सखोल अभ्यास करून, एक एक कडी जोडत ते भव्य, उदात्त कामाची साखळी सहज तयार करतात... आणि काम पूर्ण झालं की त्याचा गवगवा न करता पुढच्या कामाकडे वळतात...
अजातशत्रू असलेला हा माणूस प्रत्यक्षात तितकाच साधा आहे... !
.
सावित्री पुल दुर्घटनेनंतर नव्या पुलासाठी १८० दिवसांचं (६ महिन्यांचं) वचन देऊन कामाची निविदा काढणं ते लोकार्पण हा रुटीन शेड्यूलमध्ये सात आठ वर्षांचा प्रवास यांनी अवघ्या ५ महिने १५ दिवसात (१६५ दिवसात) पूर्ण केला. काम घाईत उरकलं आणि येवून फोटो काढले असं नाही तर स्वतः जातीनं लक्ष घालून संपूर्ण काम प्रामाणिकपणे दर्जेदार, मजबूतरित्या पूर्ण करून घेतलं, पुढची १०० ते १५० वर्षासाठी सोयीचा ठरेल असा भक्कम पूल बांधला आणि दिमाखात त्याचं लोकार्पण केलं...
..
साधेपणा सच्चेपणा त्यांची शक्ती आहे...! गडकरी केंद्रीय मंत्री आहेत, केंद्रात एक महत्वाचं खातं सांभाळतात, भाजपा राष्ट्रीय पक्षाचे जबाबदार नेते आहेत... जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करताय, अभ्यास दांडगा आहे... पण या सगळ्याने थोडाही गर्व किंवा अभिमानाचा लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर नाही... हा सावित्री पूलाच्या उद्घाटनाचा फोटो... आपल्या कामातून घडलेल्या एका भव्य गोष्टीचा सोहळा होतोय असा मीपणा थोडाही त्यांच्यात दिसत नाहीय... राहणीमान तर अतिशय साधं - पायात साधी चप्पल, अंगावरचं कापड फार फार तर ३००-४०० रु मिटर दराचं... कुठलाही डामडौल नाही... प्रसिद्धीची हाव नाही... ना ज्ञानाचा फार मोठा आवेश... साधेपणानं राहणं - शांतपणे काम करणं या बळावर गडकरी देशाच्या केंद्रबिंदूवर विराजमान आहेत...
.
त्यांना पहिल्यांदा भेटलो ते धुळ्यात... भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतांना गडकरी धुळ्यात आलेले.  इनडोअर हॉलमध्ये कार्यक्रम होता... कार्यक्रमापूर्वी ते बॅकस्टेज बसलेले. आणि अगदी हसत खेळत सगळ्यांना भेटत होते, गप्पा करत होते... अगदी साधेपणाने... त्यांच्या घरातले किस्से, पक्षातले किस्से वगैरे सांगत हसत खेळत गप्पा सुरू होत्या... हा माणूस राष्ट्रीय व्यक्तीमत्व आहे असं कुणालाही वाटलं नसतं... त्यांना शुगर अपडाऊन्सचा त्रास आहे, धावपळ झाली तर चक्कर येतात, त्यामूळे दर दोन तासांनी ग्लुकोज घेत असतात... ते ही स्वतःच्या हाताने बनवून... बॅगमध्ये ग्लूकॉनडीचं पॅकेट असतंच... !
त्या दिवशी चहा आणल्यावर त्यांच्या पर्सनल सिक्यूरिटीमध्ये सकाळपासून सोबत असलेल्या पोलीसांना आधी चहा नेऊन द्या, पावसात त्यांचीही खूप धावपळ झालीय हे ऐकून हा माणूस आकाशाला हात टेकवूनही जमिनीवर पाय घट्ट रोवून उभा आहे याची प्रचिती आली आणि मी त्यांचा भक्त झालो... !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved