HajiAli
बरीच स्थानं आहेत जी आशिर्वाद देतांना हिंदू मुस्लीम बघत नाहीत... मनापासून केलेली प्रार्थना तिथे फळाला येते... काही अनुभव येतात आणि ती स्थानं श्रद्धास्थानं होतात... ! "दरगाह" हे मुस्लीम पंथाचं जागृत स्थान... मुस्लीमच नाही तर हिंदू धर्मीयही मनापासून दरगाह समोर नतमस्तक होतात... !
..
"हाजीअली" हे माझं श्रद्धास्थान... मी तीन ठिकाणं माझं घर समजतो... हक्काचं स्थान असावं असं... ! एक : गाणगापूर, दोन : शेगांव आणि तिसरं मुंबईतला हाजीअलीचा दरगाह... !
.
दरगाह हे मूळातच जागृत असल्याची प्रचिती अनेक घटनांतून मिळालीय... हाजीअलीच नाही, तर इतरही अनेक... ! धुळ्यात आमच्या घराशेजारी एका पडक्या वाड्यात दरगाह होता... तिथे ते पिरबाबाका ठाणा म्हणून प्रसिद्ध आहे. पण वाडा पडला तसं ती जागा दुर्लक्षित झाली. वाड्याच्या ढिगाऱ्यात दाबली गेली. नंतर तो वाडा विकत घेऊन टॉवर बांधायचे प्रयत्न अनेकांकडून झाले, पण काहीतरी व्हायचं आणि काम बंद पडायचं... पाच वर्षांपूर्वी एका माणसानं तो घेतला, आधी तो दरगाह शोधून त्याचं व्यवस्थित बांधकाम केलं... एक फकीर सेवेसाठी ठेवला. नंतर त्याचं बांधकाम कुठल्याही अडचणीशिवाय पूर्ण झालं... मोहरमच्या दिवशीच त्यानं वास्तूशांती केली... !
.
वाईट काळात हाजीअलीनं मला बरंच काही दिलंय... दिलासा, शक्ती, उमेद, सकारात्मकता आणि बळ... त्या ठिकाणी गेल्यावर मी श्रद्धा - अंधश्रद्धा, धर्म - अधर्म या गोष्टी बाहेर सोडतो... आणि प्रचंड सकारात्मक उर्जा घेऊन परत येतो. कधी ते माझ्या प्रश्नाचं उत्तर असतं, कधी कुठल्यातरी -ve waves चं +ve energy मध्ये झालेलं conversion असतं, कधी मनाला मिळालेली वाऱ्याच्या थंडगार झुळूकेसारखी शांतता असते... "बाबा खाली हाथ मत भेजना" म्हणून केलेलं आर्जव नेहमी फळाला येतं - कारण तिथून माझ्यात सकारात्मकता तयार होते... ती जागा प्रचंड उर्जाभारीत आहे...
.
हाजी अलीवर विश्वास बसला याचं कारण खूप चमत्कारीक, तितकंच गूढ आहे... ते माझ्या मनातच असेल. पण धर्माच्या भिंती बाजूला ठेवून तिथे नतमस्तक झालो तर कधीच रिकाम्या हातानी परतत नाही हे मात्र खरं... ! "बाबा इस बंदे की मन्नते कबूल करना" म्हणत डोक्यावर मोरपिसाने आशिर्वाद देणारा निस्वार्थी फकीर भेटतो... तो दरगाह समोर दिसला की मनाला हलकं करणारी शांती मिळते... लाखमोलाची शक्ती मिळते.. !
...
हाजीअलीला जातांना मी हिंदू आणि दर्ग्यावर जातोय हा विचार माझ्या मनात नसतो...
तर "हा मुसलमान नाही" तर याला का भरून देऊ असा विचार बाबांच्या मनात नसतो....
धर्म बाजूला ठेवून मी डोकं टेकवतो,
धर्म बाजूला ठेवून ते भरभरून देतात !
...
Last but not least
जानता है ना तू क्या है दिल में मेरे
बिन सुने गिन रहा है ना तू धड़कने
आह निकली है तो चाँद तक जायेगी
तेरे तारों से मेरी दुआ आएगी ....
तो चंद्र, ते तारे आणि तो परमात्मा एकच आहे...
कधी तो गाणगापूरला दत्तरूपात भेटतो,
कधी हाजीअलीच्या दर्ग्यात दिसतो तर कधी शेगांवच्या गजानन महाराजांच्या मंदिरात...!