World's Daughter Day जागतिक कन्या दिन
मुलगी असणं भाग्य समजलं जातं. मुलगी खरं तर घरातली पाहुणी समजावी अशी आपली समाजव्यवस्था, पण घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, माणसं यांना ती असते तोपर्यंत समजूतदारपणे, मायेने जपते, सांभाळते.. जीव लावते... दुखण्यावर तिची एक फुंकर पुरेशी असते... मुलगी घराचा आत्मा असते. स्त्रीरुपाला निसर्गाने उपजत काळजीचं काळीज दिलेलं असतं, त्या काळजीनं घरातली मुलगी आई-वडील-बहिण-भाऊ यांच्यासाठी अदृष्य आधार असते, ती आईला घरात मदत करते - वडिलांच्या मागेही तितकंच खंबीरपणे उभं राहते... मुलगी खरा आधार असते... जिच्यावर घर सोपवून आईवडील निश्चिंत होतात... तिला जबाबदारीचं कोंदण असतं, आई - बाबा दोघंही तिच्याजवळ मनमोकळं रडू शकतात... त्या दोघांनाही समजून घेण्याचं मन तिच्याजवळ असतं... ती पाझरणारं मातृत्व असते - त्या मुलीला कधी आई-बाबांची आई व्हावं लागतं, कधी घरातल्या बाबांची जागा घ्यावी लागते...
..
"त्याग" या शब्दाला पूरेपूर जागण्याऱ्या मुली असतात... आईबाबांच्या मुली... ! एक दिवस त्यांचं घर, आईबाबा यांना सोडून कायमचं दुसऱ्या घरी, दुसऱ्या माणसांत जायचं... ज्या घराचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत मायेनं जपली, सांभाळली ते घर सोडून जायचं, कोवळ्या खांद्यांवर पुर्ण जबाबदारी घ्यायची... अल्लड, थोडीशी आळशी, आईच्या मांडीवर डोकं ठेवून निवांत झोपणारी मुलगी दुसऱ्या दिवसापासून कायमची शहाण्यासारखी वागणार - कठीण असतं ते... ! तिच्या हौसमौज फक्त आई-बाबा, लहान बहिण भाऊ यांच्यासाठी मनातल्या मनात दाबणारी, परिस्थितीची जाणीव असणारी तीच मुलगी असते... ती आपल्या भावनांचा, घराचा, आईबाबांचा, भावंडाचा, आवडी-निवडींचा त्याग करते... !
..
माझा काका बोलतांना सहज म्हणतो, "माझ्या चिमण्या उडून जातील..." .. धस्स होतं त्यावेळी. ! लग्न ठरलेली मुलगी तिचं घर, त्यातल्या वस्तू जास्त काळजीनं सांभाळते... भरभरुन जगुन घेते... तिचा जीव कुठे असेल त्या वेळी ? तिचं तिथलं रुटीन जगतांना, तिच्या आईबाबा, भाऊ-बहिणीसोबत रोजचे हे दिवस पुन्हा कधीही नसतील - आपण कायमची पाहूणी होवू... काय म्हणत असेल तिचं मन ? ... लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी आपलं जीवापाड जपलेलं लेकरु, दुसऱ्या माणसाच्या हाती द्यायचं - दूर पाठवायचं... त्या आईबाबांचा जीव काय म्हणत असेल ? मायेचे पाश तोडून निघणं ... सोप्पं - सहज नाही... मुलगी त्यासाठीच सर्वश्रेष्ठ ठरते !
..
म्हणूनच तिला नेहमी म्हणतो - हे दिवस पुरेपूर जगून घे... तुझा सहवास तुझ्या आई-बाबा-भाऊ-बहिण यांना पुरेपूर मिळू दे... तू त्या घरातले हे क्षण बांधून ठेव. लग्नाचं सगळं छान, पाठवणीचा क्षण आला की धस्स होतं... तो जीव फक्त विश्वासावर माझ्या हाती अख्खं आयुष्य सोपवतोय ... तिच्या आईबाबांइतकंच मी तिला जिवापाड जपू शकेन ना ? ... तिला आदर, काळजी, प्रेम या गोष्टी देईनच, तिचं माहेरही जपेन... पण घर, आईबाबा यांना सोडून येणाच्या तिच्या त्यागापुढे हे पुरेसं आहे ? आजन्माचं ऋण कसं फिटणार ? तिचं समर्पण आणि तिच्याआईबाबांचे उपकार, त्याग शब्दात बांधणं शक्य नाही...
..
आई तिच्या माहेरच्या आठवणीत गुंतते, तासभर तिथे गेलं तरी परत येतांना तिच्या आईबाबांच्या, तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात, त्या घरातून पाय निघत नाही... माया खूप घट्टं असते !
..
प्रत्येक मुलगी श्रेष्ठ आहे,
ती तिच्या आईबाबांची परी आहे... !
त्या मुलीचा, तिच्या भावनांचा, अपेक्षांचा यथायोग्य आदर करण्याची शक्ती मिळावी, हेच तिच्यातल्या आदिशक्तीकडे मागणं.
प्रत्येक मुलीला - आणि तिच्या आईबाबांना समर्पित... !
- तेजस कुळकर्णी