शिक्षक दिन Teachers Day

= शिक्षक दिन =
एका वळणावर आलो की मागे वळून बघतांना आपल्या आयुष्यातले वेगवेगळे चौक दिसतात. त्या चौकात जर रस्ता बदलला असता तर आज कदाचित Below this or Above this असतं वगैरे गोष्टी उगाच अलंकारिकता आणतात, पण ते होतं, होवू द्यावं... माझ्याबाबतीत सांगायचं तर आजवर आयुष्यात काहीही खास कर्तृत्व नाहीय, पुढचं माहित नाही... पण अगदीच नसल्यापेक्षा जे थोडंफार आहे त्याचं श्रेय शाळेपासून लाभलेल्या शिक्षकांना जातं, जे नाही ते मी माझ्या कर्माने घालवलंय... तरीही शिक्षक दिन हा दिवस केजी टू पीजी नेहमी स्पेशल राहीलाय... शिक्षकच होते ते ज्यांनी हा उधळलेला वारु भरकटू दिला नाही.
.
माझी आजी स्कूल टिचर होती. घरातल्या घरात तिनं मराठी लिहीणं वाचणं, इंग्लीशची तोंडओळख स्वतःचं नाव लिहीता वाचता येईल इथपर्यंत करून घेतलेलं. त्यामूळे सिनियर केजी मध्ये असतांना मी चंपक वगैरे वाचत होतो... पहिली शिक्षिका... ! आज्जी गेल्यानंतर एक दुसऱ्या आज्जी ट्यूशन करता यायच्या... कॉलनीतल्या तीन मुली आणि मी असा क्लास चालायचा, त्या माऊलीनं केजी, पहिली, दुसरी मध्येच गणिताचे पाढे, गुणाकार वगैरे पक्कं करून घेतलं होतं, गणिताच्या प्रेमात तेव्हा पडलो... ते आवडायचं... केजी स्कूल तसं घरचं वाटायचं, कारण तिथल्या टिचर पंडीत आज्जी आमच्या जवळच्या नातेवाईक... ते ज्या संस्थेचं ती संस्था familiar,  त्यामूळे हे उपद्व्यापी कार्ट कुठल्या लेव्हलचं आगाऊ आहे हे त्या ओळखून होत्या आणि तसं घडवलं... शिक्षक म्हणून अग्रस्थानी या तीन आज्या नेहमी असतील... वाचणं लिहीणं शिकवणारी माझी आजी, गणित शिकवणारी बनवारीकर आज्जी आणि न रागावता न मारता शिक्षणाचा अथश्री करणाऱ्या पंडीत आज्जी... पाया त्यांनी दिला... पुढे शालेय शिक्षण, कॉलेज, पीजी पर्यंत चांगली माणसं खूप भेटली. पण मूळ पाया यांनी भक्कम केला.
..
बालपणी अक्कल नसते, आपण वाहवत जातो. त्या पाण्याला योग्य दिशा देण्याचं काम o ते ४ मधले शिक्षक करतात... त्यांचा रोल खूप मोठा असतो. पहिली ते तिसरी तसं मस्त मज्जेत गेली, पण चौथीत असतांना एक दिवस आला जिथून वळण मिळालं... खरं तर ओळख झाली... "रजनी गंगाधर मोरे" या क्लासटिचर होत्या, वर्गात Essay करता नोटबूक्स दिल्या, त्यावर लिहून आणायचं होतं... ते चेक करून परत देतांना जाहिरपणे प्रत्येकाची अक्षर, शुद्धलेखन वगैरेची मापं निघत होती. तिसऱ्या रांगेत फर्स्ट बेंचवर मी आणि Gururaj... तेव्हा वर्गातली हुषार म्हणवणारी पोरं त्या मापं काढण्याच्या कार्यक्रमात धारातिर्थी पडलेली बघून माझी हातभर फाटलेली... नंबर आला, मनाचा हिय्या करून समोर गेलो आणि अनपेक्षितरित्या मापांऐवजी कौतूक झालं... अक्षराचं. आपलं अक्षर छान आहे हे त्यादिवशी समजलं. त्या दिवसाच्या बळावर वर्गात हवा झाली... तिथून पुढे वर्षभर निबंध स्पर्धा, स्कॉलरशिप परीक्षा, वत्कृत्व स्पर्धा यांत त्यांनी बळजबरी पाठवलं, कुठल्याही कामाचा आत्मविश्वास तयार होण्यासाठी ते वर्ष आणि त्या टिचर खूप महत्वाच्या ठरल्या... कथाकथन, गिता पाठांतर, आंतरशालेय नाट्य यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला पुढे केलं... कधी प्रेमानं तर कधी रागावून... ! एक दिवस कुठलसं गणित त्रास देत होतं. जमता जमेना... भर वर्गात वाभाडे काढले गेले, दिवसभर बेंचवर उभं केलं - मधल्या सुट्टीत सुद्धा उभा तर उभाच... टिचर सुद्धा पुर्ण दिवस वर्गात... शाळा सुटली, त्या थांबल्या आणि त्यांनी सावकाश ते समजावलं. तो पुर्ण दिवस मी डब्बा खाल्ला नाही म्हणून त्यांनीही खाल्ला नाही. तेव्हा त्या गोष्टीची महती कळली नाही, आत्ता घडलं असतं तर मी कदाचित ढसाढसा रडलो असतो...
.
पुढे ५ वी ते १० वी मोजकेच शिक्षक व्यक्तीमत्व लक्षात राहीले. त्यापैकी एक म्हणजे तोरणे नावाचे सर. लहान मुर्ती, चेहऱ्यावर शांतता, नेहमी हास्याची लकेर. या माणसाला मी कधीही चिडलेलं बघितलेलं नाही. यांची आणि माझी वेवलेंथ कशी जमली ते कळलं नाही, पण आमचं मस्त जमायचं... ते आमचे क्लास टिचर होते ८ वी ला असतांना... ते क्लास टिचर, मी मॉनीटर. पुर्ण वर्ष मस्त गेलं. वर्ष संपता संपता ८ वी ब चा वार्षिक अहवाल आम्ही दोघांनी मिळून बनवला होता... त्याचा उल्लेख त्यांनी सेवानिवृत्त होतांना केलेल्या भाषणात केला होता... गणित, रिसर्चची आवड वाढवण्यात आणि प्रेझेंटेशनचा आत्मविश्वास वाढविण्यात अजून दोन लोकं बूस्टर ठरली. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान परीषद इ. करता शेंडेफळ म्हणून सहावी ते दहावी माझीच वारी असायची. Vilas Halkare, आर के पाठक यांनी स्कूल लेव्हलवरच स्टेटवर जिंकून येवू अशी तयारी करून घेतली.... मज्जा यायची. आत्ता जे काही चांगलं आहे त्याचं श्रेय यांना जातंच जातं.
..
संस्कृतकरता ८ - ९ - १० निवृत्त शिक्षिका असणाऱ्या एका आजींकडे जायचो. सकाळी ६ ते ७, सुभाषितमाला, विभक्ती प्रत्यय मोठ्यानं म्हणायचं... त्यांची ओघवती शैली ऐकत रहावी इतकी गोड. संस्कृत फक्त स्कोरींग करता नाहीय, गोड भाषा आहे हे त्यांनी बिंबवलं... सुभाषितं पाठ आहेत, गुणगुणले जातात. आवडतं. संस्कृत अस्लखीत बोलता यावं अशी इच्छा आहे. आजपण सकाळी ६ ते ७ त्यांच्या घरी जाऊन बसायची तयारी आहे.
..
सेकंड इयर पर्यंत प्रोग्रॅमिंगची बोंब होती... प्रॅक्टीकलच्या परीक्षेत main() पुढे ; दिलं आणि तासभर इरर शोधत बसलेलो. थेअरी रट्टा मारुन होवून जायचं, तगडा स्कोअर पण व्हायचा पण प्रॅक्टीकल यथातथा. मग दोन देवदूत आले - टिचर्सच्या रुपात. Girish Desale सर, आणि Prasad JoshiSir... अवघ्या वर्षभरात यांनी असं ब्रश अप केलं - बेस पक्का. आज माझ्या कंपनीत मी सॉफ्टवेअर्स बनवतो. आपल्यात काय आहे हे आपल्यापेक्षा त्यांना स्पष्ट दिसतं. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी आवजो कार्यक्रमात त्यांचं पुर्ण स्पीच याभोवती फिरलं होतं.
...
यातली एक जरी लिंक नसती तर ?
मी वेगळ्या मार्गावर असतो.
स्ट्रगल करावं लागलं, अपयश आलं ते माझ्या कर्मानं.
पण हे शिक्षक त्या त्या वळणावर मार्गदर्शक ठरले, वळण मिळालं, बालवाडी ते पीजी हे शिक्षक त्या त्या टप्प्यावर आयुष्याच्या गाड्याचे सारथी ठरले...
नितांतसुंदर क्षण, आठवणी आणि शिक्षण.
आज नावापुढे तीन डिग्री लावतांना या अनेक हातांचं बळ जाणवतं.
भविष्यात जे चांगलं होईल त्याचं श्रेय या हातांना असेल,
हे ऋण फिटणार नाही, फिटायलाही नको...
..

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved